Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

तपोवन चा सिमला बाबा

मोहन जोशी जुलै 4, 2026
0
gumohor-water

हिमालयीन भटकंती हे एक गूढ प्रेम प्रकरण असते,असा माझा अनुभव आहे . एकदा तुम्ही हिमालयात फिरायला गेले की , हिमालय तुम्हाला वारंवार मोहवत असतो . अश्याच एका वारीत मी आमच्या काही निवडक मित्रांसोबत तपोवन ला जायचे ठरविले. नेशनल एडव्हेंचर फाउंडेशनचे माझे मित्र अविनाश देऊस्कर ह्यांनी त्यासाठी लागणारे साहित्य पुरवठा आणि योग्य मार्गदर्शन केले होते . नागपूर, दिल्ली, हरिद्वार, उत्तरकाशी मार्गे आम्ही गंगोत्रीला वाहन प्रवास करीत पोहचलो . गंगोत्री हे उत्तराखंड राज्यातील १३,५०० फुट उंचीवर वसलेले एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे. येथून शिवलिंग, मेरु आणि भागीरथी पर्वतरांगा अगदी जवळून पाहता येतात. गंगोत्री हे गंगेचे उगमस्थान म्हणून ओळखल्या जात असले तरी मुख्य गंगेचा प्रवाह गोमुख पासून आपण पाहू शकतो. गंगोत्री पासून चिलबासा , आणि नंतर भोजबासा असा १० किमी चा ट्रेक आहे. येथून १४,६४० फूट उंचीवर असलेल्या तपोवन ला जायचे असते.बाजूने खळखळणारी भागीरथी गंगा, पाईन आणि चील चे घनदाट जंगल आणि समोर सतत दिसणारी हिमशिखरे आपल्याला स्वर्गीय आनंद देतात. गोमुख हे भागीरथी ग्लेशियर मध्ये पडलेले खूप मोठे छिद्र असावे , असे दिसते. भोजबासा ला आम्ही तंबू लावले आणि गोमुखाजवळ भगीरथी नदीत आपण आंघोळ करावी , अशी भन्नाट कल्पना काही मित्रांना सुचली.माझ्या मित्रांना मी तसे करू नका , असेही सांगितले पण कधी ऐकतील तर ते मित्र कसले! गोमुखातून मधून मधून फ्रीजच्या आकाराच्या बर्फाच्या लाढ्या एकसारख्या बाहेर येत असतात, आणि तिचे खळखळणारे पाणी धो धो वाहत असते. तरीही आमच्या एका मित्राने “ हर हर भगीरथी “ म्हणत अगदी काठाजवळच डुबकी मारली आणि एखादा विजेचा धक्का लागावा , तसा आवाज करत काठावरून तो थेट तंबूकडे पळत सुटला . अरे ,बापरे बाप , म्हणत केव्हा एकदाचे कपडे बदलतो असे झाले.त्यानंतर तो जवळपास अर्धा तास नुसता कुडकुडत बसला होता.आम्ही आपले तंबू लावून अंधार होण्याआधी रात्रीचे जेवण घेतले आणि विश्रांती घेतली. 

दुसरे दिवशी सकाळी लवकर उठून आम्ही तपोवन कडे निघालो. येथून तपोवन सहा किमी दूर असले तरीही गोमुखापासून १२०० फूट उंचीवर आहे आणि रस्ता म्हणजे जवळजवळ पडलेले विशालकाय दगड, त्याला मोरेन म्हणतात, त्यामुळे पाय ठेवायला जागा सापडणे अवघड . समोर उभे असलेले भागीरथीचे ते उंच मनोरे सतत तुम्हाला खुणावत असतात. आम्ही तसे पाहिले तर आम्ही तपोवन गिर्यारोहणाच्या बेस कॅंपलाच जाणार होतो. मला पर्वतारोहणाचा बऱ्यापैकी अनुभव होता, पण माझ्या साठी सुद्धा हे जरा जास्तच वाटत होते. कसेतरी एकेक देव आठवत आम्ही एकदाचे तपोवन ला पोहचलो. माझी तर पूर्ण दमछाक झालेली होती , पण समोरचे ते स्वर्गीय सौंदर्य पाहून आम्ही काही वेळातच स्वतःला विसरून गेलो. आणि येथे माझी भेट झाली ह्या सिमला बाबांशी. 

अश्या ठिकाणी वास्तव्य करणारे हे बाबा लोक आपल्याला अचंबित करणारे असतात. त्यांचे खरे नाव कोणालाच माहीत नसते. पण ते तेथे दगडाच्या कपारीत राहतात आणि तेथे आलेल्या प्रत्येक माणसाला गेल्या गेल्या गरम चहा देतात , जेवणाची वेळ झाली की गरम खिचडी देतात , खूप आस्थेने बोलतात, गप्पा टप्पा करून प्रवासाचा क्षीण दूर करतात .आणि ह्या सर्व सेवांसाठी त्यांची काहीही अपेक्षा नसते .येथे सर्व व्यवहार विनापैसा सुरू असतात, आपण आपल्याकडे असलेले खाण्याचे पदार्थ तेथे देवाजवळ ठेऊन द्यायचे आणि ते आपल्याला जेवण देतात. आपल्या नंतर येणाऱ्या प्रवाशाला आपण दिलेल्या वस्तू वापरून त्यांना ते जेवण करून देतात. 

थोडा वेळ स्तिरावल्यानंतर आमच्या गप्पा एव्हाना रंगात आल्या होत्या. मी व्यवसायाने डॉक्टर असल्याचे जेव्हा मी सिमला बाबांना सांगितले , तेंव्हा त्यांनी माझ्याशी वैद्यकीय सल्ला मसलत सुरू केली . आपली औषधे आणि उपचार फाइल मला दाखवली. ती पाहून तर मी स्वतःच अस्वस्थ झालो , कारण मी अगदी धडधाकट असूनही तेव्हा माझी प्रकृती मला खूप स्थिर वाटत नव्हती आणि हे बाबा उच्चदाब, डायबिटीज आणि हार्ट ची औषधी मला हसत हसत दाखवत होते. हे इतक्या उंचीवर सर्व सामनासह एकटे कसे पोहचले, हेच मला पडलेले आश्चर्य ! त्यांना येथे त्यांच्या जिवाला वैद्यक शास्त्रानुसार किती मोठा धोका आहे , हे मी त्यांना सांगत होतो आणि ते तितकेच शांतपणे सर्व ऐकत होते. त्यानंतर त्यांनी दिलेले उत्तर मला जन्मभर लक्षात राहील असे होते. ते म्हणाले, डॉक्टर साहेब, मला या ठिकाणी माझ्या जिवाला असलेला धोका मी जाणतो , पण जेथे माझ्या जिवाला काहीही धोका नाही , असे एक स्थान तुम्ही मला सांगा, मी तेथे जाऊन रहायला तयार आहे. मी अवाक आणि निरूत्तर होतो. 

परतीच्या प्रवासात मी हा एकच विचार करीत होतो, की खरेच अशी जागा कोठेतरी असेल काय ? आणि जर नसेल तर आपण आपल्या मनासारखे बिनधास्त जगत मृत्यूचा हा विचार नेहमीकरिता आपल्यासाठी तरी काढून टाकणे गरजेचे नाही काय !

लेखक

  • मोहन जोशी

Post navigation

Previous: #30 दिवसात 30# प्रयोग 2026
Next: माझी सायकल- एक प्रेमकथा
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.