माझ बालपण , हे अमरावती जिल्ह्यातील शेंदुरजना घाट गावातील, १९६० ते १९७० चा तो कालखंड, तेथे आम्हाला सायकल चे खूप अप्रूप वाटायचे. पोस्टमन, शिक्षक,सरकारी नोकरी करणारे किंवा तत्सम काही लोकांकडेच सायकल असायची.आणि ती सुद्धा उंच नियमित सायकल, जी दीड पायाने कैची मारत आम्हा लहान मुलांना चालवायला मिळत असे. मी त्यानंतर नागपूरला आलो,तेव्हा लहान मुलांना लहान सायकल असते,आणि ती काही पैसे देऊन भाड्याने मिळते,हा शोध लागला .मग आम्ही तशी सायकल भाड्याने घेऊन सर्व मित्रमंडळी आलटून पालटून चालवायचो.
माझी पहिली सायकल मला माझ्या मोठ्या भावाकडून मिळणार होती , पण मला त्यासाठी सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण व्हायचे होते , आणि मी त्यात उत्तीर्ण झालो,आणि मग मी सायकलसाठी हट्टाला लागलो. शेवटी मला एक जुनी सेकंड हैंड सायकल मिळाली. ती काही मला आवडली नव्हतीच, पण तसे बोलण्याची सोय नसल्याने , मी त्या सायकलला रंग देऊन नवीन करण्याचे ठरविले, पण त्यालाही खूप खर्च करावा लागणार होता. मग काय , मीच ते काम उन्हाळ्याच्या सुट्टीमधे स्वतः करायचे ठरले . आणि त्याचे सर्व भाग वेगवेगळे करून रंगविले, पण मला ते परत एकत्र करून काही केल्या सायकल उभी करणे ,जमत नव्हते. मग मी सर्व भाग एकएक करून चौकातील सायकल दुकानात नेले आणि सायकल चालती करून माझे उन्हाळी प्रोजेक्ट कसेबसे पूर्ण केले.त्यानंतर माझी ही सायकल प्रेमकथा आमचे ओळखीचे धनजीकाकाना कळली आणि त्यांनी त्याखातर मला त्याच्याकडे असलेली एक सायकल दुरुस्त करून बक्षीस म्हणून दिली .अशी ही माझी दुसरी सायकल , जीने मला नंतर मेडिकल कॉलेज पर्यंत साथ दिली.
त्यानंतर मला माझी तिसरी सायकल मी प्रचारक म्हणून कार्यरत असताना खामगाव येथे मिळाली. मी जळगाव जामोद जवळील सातपुड्यात असलेल्या वसाली, टूनकी, सोनाला आणि सोनदला ह्या गावांमध्ये वैद्यकीय सेवा देत असे .ह्या पहाडी भागात प्रवासाचे साधन म्हणजे सायकल होती . खामगावला संघ कार्यकर्ते श्री नारायणसिंह बैस आणि बाळासाहेब खेकाळे माझे तिथले पालक होते. त्यांनी मला एक नवीन सायकल घेऊन दिली आणि ती खामगावहून जामोदला एसटी बसने टपावर ठेऊन घेऊन जाण्याचे सुचविले . मला ते पटले आणि मी एसटी डेपोत गेलो . तेव्हा त्या कंडक्टरने मला त्या सायकलचे पायडल काढून आणल्यानंतर ती टपावर ठेवता येईल , असे सांगितले. म्हणजे परत दुकानात जाऊन, पायडल काढून,परत डेपोत येऊन टपावर सायकल चढवा आणि ती बिचारी नवनवीन सायकल ६० किमी अंतर टपावर बसून एकटीच कशी प्रवास करणार , मला काही पटत नव्हतं . तेव्हा दुपारचे बाराच वाजले होते आणि मी सायंकाळी सहा सात वाजे पर्यंत जामोदला पोहचू शकत होतो . झाले , निर्णय पक्का आणि मी आणि माझी नवनवीन सायकल लाँग ड्राईव्हला निघाली . सायंकाळी ह्या सायकल प्रवासानंतर मी जेव्हा गुपचूप जामोदला पोहचलो , तेव्हा तेथील कार्यकर्त्यांनी माझे मॅरेथॉन सायकल स्वाराचे करावे , तसे स्वागत केले .
माझी चवथी सायकल सुद्धा मला सप्रेम भेट मिळाली. माझ्या मुलाचा पहिला पगार झाला म्हणून , मला ही भेट होती. ती आम्ही दोघे त्याच्या मोटर सायकलवर बसून सीताबर्डीला गेलो होतो आणि सायकल घरी आणतांना रिक्षात टाकून आणण्याचे मुलाने सुचवले. पण माझे सायकल प्रेम काही ते मानत नव्हते, आणि मग मुलगा मोटरसायकलवर आणि वडील सायकल चालवत , असे आम्ही घरी आलो . ती सायकल आजही मी सुट्टीच्या दिवशी घेऊन फिरत असतो.आता पर्यंत मी एकही सायकल विकत घेतली नाही,तरीही मला सायकलच का भेट मिळते,हे मला पडलेले कोडे आहे. बहुतेक आमच जन्मोजन्मीचे काही प्रेमाचे नातं असावे, असेच मला वाटते.