आता घराचा दरवाजा दिसायला लागला होता. तसे ते मुद्दाम हळू हळू पावले टाकत चालत होते. जरी मास्तरांचे घर त्यांच्या घरापासून १० मिनिटांच्या अंतरावर असले तरी घरी पोहचायला लक्ष्मणरावांना जरा जास्तच वेळ लागला.
शेवटी गुरुजी घरी पोहचले. आणि पोहचल्या पोहचल्या सुमनबाईंनी विचारायला सुरुवात केली.
जरा श्वास घेऊ देता का मला? सगळं अहवाल वाचन करतो तुमच्याजवळ मी. थकलेले लक्ष्मणराव दम टाकत बोलत होते.
अहो मी पाणी पण नाही आणले म्हणत सुमनबाईंनी लक्ष्मणरावांसमोर पाणी ठेवले.
चला जरा आपण जेवण पण करून घेऊया. नंतर आरामात बोलूया. तसेही मी यशोदेला टेलिफोन केला होता, तर माझे बोलणे झाले तिच्यासोबत. पण तिने काही सांगितले नाही. तुमच्या ह्यांना सर्व विचारून घ्या म्हणाली.
ही यशोदा वहिनी जीव घेणार माझा… लक्ष्मणराव स्वतःशीच पुटपुटले.
लक्ष्मणराव स्वतःशीच काही पुटपुटत आहे हे बघून सुमनबाई लक्ष्मणरावांना म्हणते,
काय बडबड करताय स्वतःशीच.
काही नाही वहिनींनीच सांगितलं असतं तर चांगलं झालं असतं.
दोघांचेही जेवण झाल्यावर लक्ष्मणराव सुमनबाईंना सांगायला सुरुवात करतात..
ते काय झालं राकेश ची आई की, मी मास्तरला त्या मुलीविषयी विचारायला लागलो. तर तो सांगायलाच तयार नाही. तो कसा म्हणतो, अरे माझी हिम्मत नाही होत रे सांगायची लक्ष्मणा तुला.
लक्ष्मणरावांचे बोलणे थांबवून सुमनबाई बोलायला लागतात, अहो कसं असतं ना.. कधी कधी आनंदाची गोष्ट सांगण्याची सुद्धा हिम्मत होत नाही हो लवकर. जरा माफ करा, तुमचं बोलणं थांबवून बोलले मी मधात..
नाही चांगलं केलं ते, कारण मी जे पुढे तुला सांगणार आहे त्यानंतर मला तू कुठे बोलूच नाही देणार.. लक्ष्मणराव थोडं गंभीर होऊन म्हणाले.
काय झालं? गोत्र वगैरे एक आहे की आणखी काही. सुमनबाईंच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.
आणखी काही वेगळं आहे सुमन. लक्ष्मणरावही आता सुमनबाई न म्हणता आयुष्यात फक्त दुसऱ्यांदा पत्नीला सुमन म्हणाले. त्यांना वाटले की त्यामुळे सुमनबाई जास्त तिखट प्रतिक्रिया देणार नाहीत.
आणखी वेगळं काय ते तर सांगा हो.. की लावू यशोदेला फोन आता. तिलाच विचारते एकदाचं, तुम्ही जरा सिनेमा सारखा सस्पेन्स ठेवताय.
ती मुलगी पळून गेली सुमन दुसऱ्या मुलासोबत. शेवटी लक्ष्मणरावांनी सुमनवाईंना सदर प्रकार सांगितला.
पळून गेली म्हणजे काय? अशी कशी पळून गेली ती..
जरा ऐक तर माझं. लक्ष्मणराव सुमनबाईंना थांबविण्याचा प्रयत्न करतात..पण सुमनबाईंचा पारा आता चढलेला असतो.
त्या मास्तराने अशी कशी मुलगी आपल्या संज्यासाठी सुचविली. यांना काही कसं वाटत नाही हो. मोठी ती यशोदा म्हणत होती ना, तुझा मुलगा माझ्या मुलासारखा आहे वगैरे. मग हे असं स्थळ सुचवितात का. म्हणून मी नेहमी म्हणते, आपले ते आपले आणि मित्र ते मित्रच शेवटी. काही कामाचे नसतात हे मित्र. फालतू लोकं कुठले
सुमनबाई, शब्द जपून, विचार करून वापरायचे जरा. चिडक्या स्वरात लक्ष्मणराव म्हणाले.
हो का? तुमच्या मित्राला आणि त्या तुमच्या यशोदा वहिनीला विचार नाही करता आला का, असं दळभद्री स्थळ सुचविण्याआधी.
सुमनबाई, आता यापुढे त्या देवमाणसांविषयी एकही शब्द वाकडा तिकडा वापरला तर संजयचे लग्न जुळेपर्यंत माझ्या कडून संवादाची अपेक्षा करु नकोस.
अहो, असं कसं बोलताय तुम्ही. त्या लोकांनी आपल्या मुलासाठी काही पण स्थळ सुचविले तरी तुम्ही त्यांना देवमाणूस म्हणताय.
हो आहेतच ते देवासारखे, हे तुलापण माहीत आहे. पण काही मनाविरुद्ध झाले की, तू खूप जास्त मर्यादा पार करते. आता मी काय बोलतोय ते जरा डोकं शांत ठेऊन ऐकून घे. लक्ष्मणरावांना पण राग आलेला असतो, पण ते तो व्यक्त न करता सुमनबाईंना समजावू लागतात.
हे बघ, त्या लोकांना त्या मुलीविषयी खरचं काही सुद्धा कल्पना नव्हती. असं कसं आपण म्हणू शकतो की काही पण स्थळ सुचविले म्हणून. त्यांना काही स्वप्न नव्हते पडले, ती पळून जाणार की काय.. त्यांनी फक्त आपल्याला स्थळ सुचविलेलं होतं. पुढे सगळ्याच प्रकारे आपण माहिती काढून काय ते ठरवायचे होतेच.
तू तर अशा अविर्भावात म्हणत आहेस की, जसे संजयचं आणि तिचं लग्न ठरलेलं होतं. आणि ठरलं असतांना अशी घटना घडली असती तर आपण मुलीकडील लोकांना जाब विचारला असताच, मास्तरांना नाही. जरा जिभेवर ताबा ठेवा.. तुझ्या याच स्वभावापायी माझ्या लेकीसारखी सून वेगळी राहायला लागली.
ओह गुरुजी.. ती नौकरीकरता शहरात गेली. सुमनबाई सुनेचं नाव काढताच पुन्हा सुरु होतात.. पण त्या विषय पुढे नेत नाही.
सुमनबाई, तिला नौकरी करायची होती हे मान्य. पण ती यासाठी आग्रही मुळीच नव्हती. तिने तर इथे राहून काही छोटा व्यवसाय करण्याचे ठरविले होते पण तुम्हाला काही मान्यच नव्हते. जरा शांत राहायला आणि समजून घेत चला. फक्त देवपुजा, पोथ्या वाचून आणि देवासमोर साखर ठेऊन प्रश्न नसतात सुटत. स्वतःचे कर्म आणि भाषा सांभाळा जरा.
अहो, पण तुम्ही मला थांबविण्याचा का प्रयत्न नाही केला.. एवढे सगळे बोलून गेले हो मी. आता मला स्वतःलाच फार वाईट वाटतयं. लक्ष्मणरावांना आलेला राग बघून जरा कापऱ्या स्वरात सुमनबाई म्हणतात.
मी तुला थांबविण्याचा प्रयत्न केला. पण तोल सुटला की तुझं लक्ष कुठं असतं, त्यात तुझे कानही बधीर झालेले असतात. तू निवडणुकीमध्ये उभी असल्यासारखी हात वारे वगैरे करून तोऱ्यात भाषण सुरु केलं. जरा खोटं हास्य चेहऱ्यावर आणून लक्ष्मणराव म्हणाले.
संध्याकाळी आपला संजय येतोय त्याच्या मित्राच्या लग्नाहून. त्याच्या दुकानाची चावी घेऊन जातोय मी. माझी काही पुस्तके ठेवलेली आहेत तिथे. ती घेऊन येतो.
लक्ष्मणराव चावी घेतात, देवाला नमस्कार करून म्हणतात.. सांभाळ रे बाबा विठ्ठला.
बाकी पुढील भागात…