व्हाट्सअपवर काल एक इंग्लिश कथा वाचण्यात आली, एव्हरेस्ट वर चढाई करणाऱ्या या चार मित्रांबरोबर अजून बरेच गिर्यारोहक होते. रात्री चढाई सुरु झाल्यावर दुपारी एकच्या आत सर्वांनी परत येणे गरजेचं होत. कारण दुपारी एक नंतर वातावरणात खूप बदल होतो तेथे. त्याच्या लीडरचे तसें सर्वाना सक्त आदेश होते.
नियोजित वेळी चढई सुरु झाली रात्री बर्फ भुरभूर पडणे सुरु होते.. सकाळी नउ वाजता लक्षात आले की आता एक वाजेपर्यत एव्हरेस्ट शिखरावर जाऊन परत निघणे अशक्य आहे,हे बघून गियारोहकाबरोबर चार पैकी तिन मित्रांनी परतण्याचा निर्णय घेतला. तें माघारी निघाले. एक मित्र मात्र जिद्दी निघाला त्याने चढाई चालूच ठेवली. शिखरावर थोडा उशिरा पोहचलो खरा पण न परतण्यासाठी. बर्फाच्या वादळात एव्हरेस्ट शिखरावर तो कायमचा विसावला.
शेवटी लेखक विचारतो यात कोण बरोबर माघार घेणारे की शिखर जिंकणारा???
यावर दोन्ही बाजूनी बोलणारे असू शकतात . “जान है तो जहाँन है ” या उक्ती प्रमाणे अशावेळी माघार घेणे उचित ठरते.
जेव्हा लढाईत जन्मभूमीच्या रक्षणासाठी लढाताना जीवाची परवा न करता सैनिक आपले बलिदान देतो माघार घेणे त्यांना माहित नसते.
वर्तमानात युक्रेन रशियात तीन वर्षाचे युद्ध कोणीच माघार घेत नसल्याने सामान्य जनतेचे हाल आणि युक्रेन सारख्या सुंदर देशाची वाताहात होत असल्याचे टीव्ही चॅनेल वर आपण पाहतो . असो.
कधी कधी माघारही ही यशस्वी ठरते. रणछोडदास म्हणून कृष्णाला गुजरातमध्ये ओळखले जातें त्या मागे पौराणिक कथाही असतील. जेथे साक्षात देवही माघार घेतो तर माणसाने घेतली तर काय फरक पडतो. निर्णय घेणे आवश्यक आहे. माघार अपयशाची निशाणी नसते ती भविष्यातील यशाची नांदी असतें म्हणूनच तिला यशस्वी माघार असे आपण म्हणू शकतो. जास्त मोठी झेप घ्यायची असेल तर दोन पाऊले मागे यावे लागते.
एक किस्सा आठवतो माझ्या मित्राचा मुलगा अभियांत्रिकीला दाखल झाला खरा पण गणिताचा आणि त्याचा छत्तीसचा आकडा असल्याने इंजिनिअरिंगचे गणित M1,M2,M3,M4 हे पार करणं त्याच्या समोर मोठे आव्हान होते. त्याने प्रामाणिकपणे प्रत्येक परीक्षेत लढण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. शेवटी एकच वर्गात तीन वर्ष गेल्यावर त्याने माघार घेतली. नंतर बी फ़ार्म ला प्रवेश घेऊन आज मोठी एजन्सी चालवतोय त्याच्या क्षेत्रात तो शिखरावर आहे.त्याने अभियांत्रिकीतून घेतलेली माघार यशस्वी ठरली होती. कधी वाटाणारे अपयश त्याला नव्या यशाच्या क्षितिजाकडे नेत होते.
माघार केव्हा घ्यायची हे ज्याला कळतंय तो हुशारच म्हणावा लागेल. खूप चढ असेल तर क्षणिक विसावा घेऊन पुढे जावे आणि तरीही तें शक्य नसेल तर मार्ग बदलला तरी काही फरक पडत नाही… फक्त लढावू वृत्ती हवी.
हल्ली बरेच विदयार्थी अमेरिकेत खर्चिक उच्च शिक्षण घेऊन आवश्यक व्हिसा वा नोकरी न मिळाल्याने भारतात परत येताय, आईवडिलांनी केलेला मोठा खर्च आणि तेथे व्यतित केलेला बहुमूल्य वेळ, त्यांना कदाचित वैफल्यग्रस्त बनवत असेलही, आज त्यांना ती आज मोठी माघार वा सेट बॅक वाटतं असली तरी,त्यात त्यांचे आणि आपल्या भारत देशाचे उज्वल भविष्य दडले आहे हे मात्र नक्की.
माघार घेतली म्हणुनी
नाव कुणाला ठेवू नये
जमिनीवर आलो जरी
उडायचे विसरू नये..
प्रयत्नांनी म्हणता म्हणे
वाळूतूनही तेल गळे
वास्तव काय जाणुनी
अविरत ते कार्य करे..
मोठा धोंडा मार्गामध्ये
मार्ग बदलवा वेळेवर
डोके आपटणे तेंथे व्यर्थ
खुशाल घ्या यशस्वी माघार..
..हेमंत नाईक
#सुरपाखरू#३०दिवसात३०#प्रयोग जुलै २०२६