Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

देंव बरें करूं……१

गौरीबाई गोवेकर जुलै 11, 2026 1 minute read
0
gumohor-water
गोव्याची भूमी. उफाड्याची कांती असलेली तांबडी लाल माती. आपलं अंग हिरव्या गर्भरेशमी वस्त्रात नेटकेपणे चापून नेसून, मोठ्या अंबाड्यात मावळतीच्या रंगाचा अबोलीचा ‘वळेसर’ माळून, पायातील नूपुरांच्या निनादात निळ्याशार फेसाळणाऱ्या समिंदरात आपलं देखण रूप न्याहाळत डौलदार चालणारी रूपगर्विता म्हणजेच गोव्याची भूमी. निसर्गाने गोव्याला भरभरून दिलं. सुंदर स्वच्छ समुद्र, भरपूर हिरवीगार वनश्री, सर्वात महत्त्वाची कलेला आपल्या हृदयात स्थान दिलेली देवभोळी माणसं. हिरव्या माडांच्या गर्दीतून निळ्या आकाशाच्या दिशेने डोकावणारे गोव्यातल्या देवळांचे कळस, दीपमाळा, चर्चेसचे मनोरे हे गोव्याचं वैभव आजही दिसतं.


कुण्या एका काळी आकाशमार्गे जात असता, गोव्याच्या या सुंदर भूमीच्या प्रेमात पडून आपला पुढचा आकाशपंथ विसरून या भूमीवर उतरलेला स्वर्गस्थ रमण-रमणींचा मेळा आपल्या स्वर्गीय सुरांनी गात गात या भूमीवरून चालत जात असता, त्यांचा तो दिव्य सूर गोंयकरांच्या कानावर पडला असला पाहिजे. त्या स्वराने लुब्ध होऊन गोव्यातल्या माणसांनी मोठ्या भक्तिभावाने तो सूर आपल्या कंठात धारण केला असला पाहिजे आणि त्या अप्सरांना विनवलं असलं पाहिजे की, ‘बायांनो जाता तर जा. पण तुमच्या कंठातल्या या सुराचा मागमूस असू द्या आम्हां गोंयकरांच्या गळ्यात अन कानात’. त्या स्वर्गस्थ वाटसरूंनी हसून ‘तस्थास्तु’ म्हटलं असेल. कुणी सांगावं! सुरांबरोबर आपल्या सौंदर्याचं प्रतिबिंबसुद्धा जाता जाता गोव्यातल्या भूमीला, माणसांना बहाल केलं असेल. तेव्हापासून गोव्यातली माणसं, संगीत आणि सौंदर्य यांचं अतूट नातं निर्माण झालं असलं पाहिजे.

देवळांच्या सभामंडपांमधून त्याची स्तुती करणाऱ्या ह्या सूर-संगीताने हळूहळू सभामंडप ओलांडला, अवघं विश्व व्यापलं आणि अबोलीच्या ताटव्यांबरोबर गोव्याच्या मातीतून असंख्य गाते गळे फुलत गेले. कलावंतांची मांदियाळी निघाली. आपापल्या उपास्य दैवताच्या साक्षीने नांदली. केरीच्या सातेरीच्या उत्सवातल्या गाण्याची किर्ती मंगेशीच्या देवळात चर्चिली जाऊ लागली. शांतादुर्गेच्या पालखीचे कान मंगेशीच्या बनातल्या सुरांकडे लागायला लागले, रामनाथीच्या पालखीसमोर पडलेल्या कलावंतिणींच्या पदन्यासाने अवघ्या गोवेकरांच्या माना डोलू लागल्या आणि म्हार्दोळच्या महालसेच्या सभामंडपातल्या मंजुळ गाण्याचा आवाज दशदिशांत गेला. गोयं संगीतमय झालं.

गोव्यातली मंदिरं, त्यामधून गायिली जाणारी स्तुतिस्त्रोत्रं, त्यांचे उत्सव, देवाच्या पालख्या या साऱ्यामधून देवाच्या या गान–नर्तन सेवेला वेगळं काढताच येत नाही. ते त्यांचं अविभाज्य अंग आहे. या परंपरेला टिकवलं ते देवासमोर गाणं म्हणणाऱ्या, प्रसंगी नर्तन करणाऱ्या देवाच्या सेवेकरणींनी – म्हणजेच कलावंतिणींनी. त्यांनीच ही कला वाढवली, जोपासली, गायन-वादन-नर्तनाला शास्त्राची जोड दिली. या कलांचं शास्त्र शिकण्यासाठी त्या शिकवणाऱ्या गुरूंच्या शोधात बाहेर पडल्या, त्यांच्याकडून मोठ्या कष्टाने या कला हस्तगत केल्या. त्यात पारंगत झाल्या. अप्सरांचा आशीर्वाद फळला. यासाठी या कलावंतिणींनी जिवाचं रान केलं. फार हालअपेष्टा सहन केल्या, दारिद्र्य भोगलं, पण कला टिकवली. एकीकडे ‘देवाच्या सेवेकरणी’ म्हणून प्रसंगी अत्यंत मान, तर दुसरीकडे समाजाचा हिणकस दृष्टीकोन अशा दुटप्पी व्यवस्थेला त्यांनी धैर्याने तोंड दिलं.

उत्तरेतून वैशिष्ट्यपूर्ण गायनशैली घेऊन विविध घराण्यांचे गायक आले, त्यांच्याकडे अत्यंत कठीण अशा गुरुशिष्य परंपरेत राहून या कलावतींनी ही अमूल्य कला हस्तगत केली. ग्वाल्हेर, आग्रा, किराणा, जयपूर, पतियाळा, भेंडीबजार, रामपूर मेवात अशा अनेक घराण्यांची वैशिष्ट्यपूर्ण गायकी त्या शिकल्या आणि आपल्या गानकर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी आपलं दारिद्र्य, हालअपेष्टा नाहीशा केल्या. विविध घराण्यांची गायकी टिकवली. पुढच्या पिढीपर्यंत संक्रमित केली. हे या कलावतींचं हिंदुस्तानी संगीतातलं योगदान निव्वळ अपूर्व असं आहे. माझी आई आणि मी स्वत: या परंपरेतीलच एक झालो, याचा मला अत्यंत अभिमान आहे. माझ्या आईची आई नार्व्याच्या सप्तकोटेश्वर देवाची परंपरेने सेवेकरीण होती. देवाच्या उत्सवात ती देवासमोर गायन आणि नर्तन करीत असे. प्रत्येक समाजव्यवस्थेला जशा काही जमेच्या बाजू असतात, तशा गडद बाजूही असतातच. आईची आई शास्त्रीय संगीत फार शिकलेली नव्हती, पण जन्मजात कला तिच्या अंगात होती. आईला मात्र गाण्याचं शास्त्रशुद्ध शिक्षण मिळावं अशा ध्येयाने तिने गोव्यातून दक्षिण महाराष्ट्रात स्थलांतर केलं. त्या वेळेस माझी आई अकरा वर्षांची होती. माझ्या आईलाही सुरेलपणाचा आणि सौंदर्याचा जन्मजात वारसा मिळालेला होता. गुरूंच्या शोधात असताना तिने अनेक मोठ्या मोठ्या गायकांची गाणी ऐकली. माझ्या आईच्या शिक्षणाच्या दृष्टीने त्यातील काहींकडे याचनाही केली. परंतु त्या काळी संगीतकलेत गुरू मिळणं इतकं सोपं नव्हतं. उत्तरेतून आलेले हे संगीतकार गायक, दिलदार उदार होते खरे, परंतु त्यांच्याकडे शिक्षण घेत असलेल्या शिष्य-शिष्यिणींचं त्यांच्यावर बर्‍याच प्रमाणात वर्चस्व चालत असे. आपल्या गुरूची विद्या आपल्यापेक्षा इतरांकडे जाऊ नये असा त्यांचा प्रयत्न असे. अशा परिस्थितीत आजीच्या वाट्याला प्रारंभी आली ती निराशाच; परंतु तिने आपली चिकाटी सोडली नाही. आईसाठी गुरूंचा शोध घेत असताना भेंडीबाजार घराण्यातील एक स्वतंत्र विचाराचा घराणेदार गायक आपली विद्या आईला देण्यासाठी तयार झाला. आणि खांसाहेबांचा रीतसर गंडा बांधून आईची तालीम सुरू झाली. त्या वेळेस आईचं वय तेरा-चौदा वर्षांचं असेल. खांसाहेबांनी गाण्याच्या निमित्ताने अवघा हिंदुस्तान पालथा घातला व ते मुंबईत स्थायिक झाले. त्यांच्याबरोबर आई आणि आजीदेखील मुंबईत येऊन स्थिरावल्या. खांसाहेबांनी हातचं राखून न ठेवता आईला गाणं शिकवलं. पुढे आईच्या वाढत्या गाण्याला आणखी विविध अंगाची तालीम हवी, हे ओळखून त्यांनीच आईच्या पुढच्या शिक्षणाची सोय केली. प्रचंड मेहनत, जिद्द, चिकाटी, गुरूंवर श्रद्धा याच्या जोरावर आईने विद्या घेतली. निरनिराळ्या घराण्यातल्या उत्तमोत्तम गोष्टी ती कष्टपूर्वक शिकली. हे शिकताना आपल्या घराण्याच्या मूळ गाण्याला कुठेही बाधा येणर नाही हे पाहिलं. लयकारी, सरगम, ताना, अतिजलद किंवा अतिधिमी लय यापैकी कुठल्याही एका अंगाचा अतिरेक टाळणारं भेंडीबजार घराण्याचं समतोल अस्सल गाणं तिने जपलं, म्हणूनच ती एक यशस्वी कारकिर्द करू शकली. आपल्या आईचं स्वप्न पूर्ण करू शकली. तिने भारतभर आणि विदेशातही आपली कला सादर केली. आईचे हे अपार कष्ट पाहताना मला नेहमी वाटायचं की आपण गाणं न करता शिक्षण घ्यावं. शिक्षणाच्या आधारावर कुठे चांगलीशी नोकरी करावी. सर्वसामान्य स्थिर जीवन आपल्या वाट्याला यावं. पण तसं व्हायचं नव्हतं. माझा सुरेल गळा आणि गायकीची पार्श्वभूमी यांना मी इतर काही होणं मंजूर नसावं. माझ्या शास्त्रीय गाण्याच्या शिक्षणासाठी आईनेही तिच्या आईप्रमाणे खूप कष्ट घेतले. मला घराणेदार उत्तम गुरूंकडे कशी तालीम मिळेल याकडे तिने लक्ष पुरवलं. सुरुवातीला तिच्याचकडे माझं शिक्षण सुरू झालं, पण त्या वेळेस ती स्वत: मैफली करत होती. त्या व्यग्रतेत मला नियमीत शिस्तीची तालीम देणं काही तिला शक्य नव्हतं. मग आपल्याच घराण्याच्या प्रसिद्ध खांसाहेबांकडे माझं शिक्षण सुरू राहील याची तिने खबरदारी घेतली. हे खांसाहेब तिचे गुरुबंधू होते. गाण्याच्या शिक्षणासाठी माझ्या आजीने जरी स्थलांतर केलं असलं, तरी आयुष्याच्या शेवटापर्यंत तिची प्रकृती साथ देत असेपर्यंत उत्सवप्रसंगी ती गोव्यातील आपल्या परंपरागत दैवताची जमेल तशी सेवा करीत राहिली.

क्रमशः 

गौरीबाई गोवेकर

लेखक

  • गौरीबाई गोवेकर
    गौरीबाई गोवेकर

Post navigation

Previous: स्वप्न
Next: लक्ष्मणराव आणि कुटुंब – १० ‘संजयची मन-अस्वस्थता आणि लक्ष्मणरावांची मागणी’
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.