स्वप्न या विषयावर खूप लिहिता येईल अगदी एक पुस्तक देखील होऊ शकेल.जागेपणाची स्वप्न झोप तर उडवतात तसंच ही अनुभवातांना वेळही कशी सरली हे ही लक्षात येत नाही.
ही स्वप्ने साध्य करताना तुम्ही झापड लावलेल्या घोड्याप्रमाणे सरळ रेषेत लवकर, वेगात पूर्ण करण्याच्या नादात इतरत्र असलेले भावविश्व अनुभवण्यास विसरलात,तर जीवनाच्या मोठया आनंदासाठी मुकाल हे मात्र नक्कीच खरे,. मग जीवन जगायचेच राहून गेले,अशी भावना मनी येईल आणि पश्चातापाचे धनी व्हाल.उदाहरणं द्यायचं झाल्यास.. व्यवसायाच्या व्यस्थतेच कारण देऊन आप्त व मित्रांच्या, सुख..दुःखा साठी तुमच्या कडे वेळ नसणं. वेळ हा सर्वात बिझी माणसाकडेही असतो.. फक्त्त तो काढावा लागतो.
जागेपणी झोप उडवणारी स्वप्ने ज्यांना पडली ती मोठे थोर व्यक्ती झालीत, टिळकांचे स्वराज्य मिळवण्याचे स्वप्न सामूहिक स्वप्न बनले आणि ते साकारही झाले. अशी खूप उदाहरणे देता येतील.आपल्या या मंचावरही,असे अनेक भाग्यवंत आहेत .
पण मला कधी जागेपणाची अशी स्वप्ने पडली नाही,म्हणून खूप मोठाही झालो नाही, कारण “ठेविले अनंते तैसेचि राहावे “ही विचारसरणीचा काहीसा जास्त प्रभाव होता आणि वाचनाने, निष्काम कर्मयोग गीतेचा अंगात भिनला होता त्यामुळे जे मिळेल ते आपले हीच भूमिका आणि त्यामुळे सहजच समाधानाचीआणि पर्यायाने आनंदाची प्राप्ती. बारावीला फिजीक्स पार्ट दोन मध्ये चक्क पंधरा मार्कांचे चुकल्यावर मेडिकल इंजिनीरिंगला प्रवेश मिळेल की नाही ही शंका आल्यावर, त्यावेळेलाही वकील व्हायची मानसिक तयारी ठेवून मी सुटी अगदी मजेत आनंदात घालवलेली आठवते. उद्दिष्ट ठरल्यावर प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत,
“जे होते ते चांगल्या करताच..”असे समजलं की कोणताही स्वप्नभंग होत नाही, आणि म्हणून दुःख ही नाही.
औरंगाबादला २००९ मध्ये आयोजित केलेले COEP चे स्नेह संमेलनात नगरकरांनी भेट म्हणून सर्वासाठी पांढरे टि शर्ट आणले होते त्या मागे माणसाचे स्वप्न कसे बदलतात हे दर्शवणारे उत्तम लाल रंगात चित्र होते, “१९८४ ला एक तरुण हातात BE ची डिग्री घेतलेला त्याच्या डोक्यात सुंदर पत्नी , डॉलर्समध्ये कमाई आणि मोठी गाडी असे स्वप्नरूपी दाखवले आणि बाण दाखवून त्या तरुणाचा २००९ साली पोट सूटलेल्या गृहस्थात झालेला बदल आणि त्याच्या बदल झालेल्या स्वप्नात ‘औषधं आणि पांडुरंग’ असे मार्मिक वास्तवतेच दर्शन होते .”
*स्वप्न नसावीत या मताचा मी नाही, पण उर फुटे पर्यंत स्वप्नपूर्ती साठी धावणे हे कितपत योग्य आहे, वेळेवर, तुम्हाला स्वप्न साकारण्यासाठी ती बदलणेही तेवढेच आवश्यक आहे.*
आयुष्यभर आई वडीलांचे , स्वतःच, मुलाचं, सौं च, असे अनेकांची स्वप्ने पूर्ण करतांना ओढाताणीत आयुष्य संपून जात आणि जगायचं राहून जाते.
*यशस्वी जगण म्हणजे फक्त्त स्वप्नपूर्ती का?*
हा पण एक संशोधनाचा विषय आहे.कारण सर्व स्वप्नपूर्ती नंतरही, काहीच मिळवणे शिल्लक नसल्याने निराशे च्या गर्ततेत गेलेली माणसे या जगात आहेत, म्हणूनच भलेही त्याचे रूप बदलेल, पण स्वप्न बघणं कधीच सोडायच नसतं..
*याचा अर्थ अपूर्णतेत सुख आहे का?*
नक्की हो.. अपूर्णतेचच ..दुसरं नाव आपले जीवन आहे, आणि या अपूर्ण जीवनातच आपण पूर्णत्वाचा शोध घेत आनंद उपभोगत असतो. खरे पूर्णत्व म्हणजे प्रभू चरणी पूर्णतःलीन होणे. कृष्णत्व प्राप्त होणे, ज्याने जन्म दिला त्याच्याशी एकरूप होणे आणि हेच सर्वांचे एकसारखं अंतिम स्वप्न असतें. सॉरी, अजाणता थोडं आध्यात्मिक लिहिलं जातंय..कारण मी अजून तरी त्या प्रांतात नाही.
“सहज मिळे, त्यात जीव तृप्तता न पावे
जे असाध्य, जे सदूर… तेथे मन धावे”
बहुतेक यालाच आपण स्वप्न म्हणतो. या शांता शेळके यांच्या कवितेतील ओळी प्रमाणे, “जे असत त्यांची किंमत नसते आणि जे नसतं आणि मिळणार आहे की नाही याची खात्री नाही.. याच्यासाठीचे प्रयत्न आणि ते प्राप्त झाले की होणारी भावना म्हणजे आनंद..यात अपेक्षाभंग झाला तर दुःख. कधी कधी असाध्याच्या मागे धावून असलेल्याचा आनंद उपभोगणंही राहून जातो ..”
“लाथ मारीन तिथे पाणी काढीन” किंवा “प्रयत्ने वाळूचे कण रागडीता तेलही गळे” ही वाक्ये स्फूर्ती देणारी म्हणून नक्कीच आहे पण त्यात वास्तवता नाही. पूर्वी अस्तित्व टिकवणे म्हणजे जीवन, कारण साध्या अन्न पाणी निवारा प्राप्तीसाठी सुध्दा खूप झगडावे लागत असे, आता तेवढी कठीण परिस्थिती नाही. म्हणूनच जीवन एक युद्ध आहे. फायटींग स्पिरिट जन्मजात असतें पण कुठे, कोणाशी, आणि किती वेळ लढायचं याच मात्र तारतम्य नक्कीच हवे. डार्विनच्या थेअरी ऑफ एक्झिस्टंस प्रमाणे सोप्या भाषेत ,” तुम्ही सबल असाल तर तराल नाहीतर अस्तित्वासाठी बदल अनिवार्य आहे आणि म्हणून बदला आणि जमवून घ्या.” होमो सेपीयन अर्थात मानव हा माकडा पासूनच्या बदल होत होणाऱ्या उत्क्रांतिचे उत्कृष्ट उदाहरणं आहे. तरुण मंडळीना हे पटणारे नाही पण जसे ते अनुभवाने समृद्ध होतील तेव्हा त्यांनाही पटेल.
“थोडक्यात जागेपणीची स्वप्न जरूर बघावी पण ती स्वप्न आहेत… भंग पावू शकतात आहे,याचीही जाण असू द्यावी ..तुमच्या सुखी जीवनासाठी “
*स्वप्न पाहणे.. स्वप्नभंग होणे अथवा पूर्ण होणे.. आणि परत नवीन स्वप्न पाहणे..आणि हे करत असताना इतरांच्याही स्वप्नात रस घेऊन ते पूर्तीसाठी त्यांना मदत करणे..हेच खरे जीवन!!*
स्वप्नात रंगले कैक आहे
कधी कधी जागेपणाच्या
आनंद मिळाला खरा तेव्हा
साध्य होता स्वप्नाच्या पूर्तीचा
नवीन क्षितिज रुंदवणारी
स्वप्न मोहक मोहवणारी
धावतो त्या पुन्हा का मागे
जीवनाची सोडवया कोडी
धावता शेवटी कळते
इच्छेला अंत तो नाही
मृगाजलासम ती आहे
तृष्णा पूर्ण होत नाही
लेखका स्पप्नं लिहिण्याचे
लिहितो मनातले काही
वाचतील रसिकजन हो
हसले तरी त्यास पर्वा नाही
🙏🙏🙏🙏
.. हेमंत नाईक
#सुरपाखरू#३०दिवसात३०#प्रयोग जुलै २०२६