तर एकीकडे मुलीकडचे रविवारी येणार म्हणून लक्ष्मणराव आणि सुमनबाई यांची तयारी सुरु होती. त्यांनी जेवायलाच यावे असा आग्रही फोन समुद्रपूरकरांना केलेला होता.संजयचे लग्न जुळले व मुलीकडील लोकं रविवारी येणार म्हणून मोठ्या उत्साहाने शनिवारच्या रात्री सर्वजण झोपी गेलेले असतांना, संजय मात्र मनावरचे ओझे दूर न करताच झोपण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्याला आवडलेली व्यक्ती आपल्या तत्त्वांमुळे न भेटता आयुष्यातून चालली तर जाणार नाही ना, ही भीती त्याच्या मनात घर करून गेलेली असते. पण असा विचार करून आपण बाबांवर अविश्वास दाखवत आहोत असेही त्याचे मन त्याला सांगत असते. हे विठ्ठला हे असं का होतंय? मला आज झोप लागू दे आणि जे काय उद्या होइल ते चांगले असेच होऊ दे असे म्हणून तो झोपी जातो.
सकाळी लवकर उठण्याची सवय असलेल्या संजयला रविवारी मात्र जाग आलेली नसते. मुलगा दुकानातील व्यस्ततेने थकला असेल म्हणून त्याला कुणी झोपेतून उठवत नाही. जसे लक्ष्मणराव देवांची आरती सुरु करतात तसा त्या सुमधुर आवाजाने संजयला जाग येते. तो पाहतो तर काय सकाळचे ७.३० झालेले असतात.
अरे देवा ते लोकं येतील आणि मला उशीर झालाय उठायला, म्हणून तो स्वतःशीच बडबड करत असतो.
अरे भाऊराया, कात्यायनी आलेली आहे. ती आली असती तुला जागवायला. संजयची बहीण प्राजक्ता संजयला म्हणते.
एवढ्या लवकर आलेत ते लोकं, ११ पर्यंत येणार होते ना. तू गम्मत तर करत नाहीस ना ताई, असे तो प्राजक्ताला म्हणतो.
नाही आले रे, जा जरा बघ वाट तुझ्या होणाऱ्या बायकोची, असे म्हणत पुन्हा प्राजक्ता ही संजयची गंमत घेते.
११ ला मुलीकडचे येणार म्हणून, १०.३० पर्यंत सर्व आटोपायला हवे या उद्देशाने सर्वजण तयार असतात.
तर एकीकडे समुद्रपूरकर आणि कुटुंब गावाच्या सीमेवर पोहचलेले असतील या अंदाजाने कुळकर्णी मास्तर आणि लक्ष्मणराव त्यांना घ्यायला जातात. यावेळेस कुळकर्णी यांचे मित्र ज्यांच्या ओळखीने समुद्रपूरकर यांचे स्थळ आलेले होते ते सुद्धा येणार होते. ११ ते ११.१५ पर्यंत पाहुणे येणार या अंदाजाने दोघेही वाट बघत असतांना त्यांना पाहुण्यांची कार गावाच्या दिशेने येतांना दिसली. त्यांनी हात दाखवून त्या कारला थांबवले आणि आमच्या मागे या म्हणून त्यांना सांगितले. तेथून लक्ष्मणरावांचे घर ३ किमी अंतरावर होते. लक्ष्मणराव हे मास्तरांच्या दोनचाकीवर बसले आणि त्यांच्या मागे कार येत होती. आजूबाजूने हिरवीगार शेत डोलत होती आणि मधल्या तुटक्या डांबरी रस्त्याने हळू हळू कार मास्तरांच्या गाडीच्या मागे मागे येत होती.
गावातील ती हिरवीगार शेती, रस्त्याच्या आजूबाजूने गायी, वासरे, बकऱ्या चरायला घेऊन जाणारी लोकं हे सगळं कात्यायनी गाडीच्या खिडकीतून बघत होती. आता काही महिन्यात आपल्याला इथलेच व्हायचे या विचाराने नकळतच तिच्या डोळ्यात अश्रू आलेले होते. तिच्या आई वडिलांच्या नजरेतून ते सुटणार ते कसले.
मने, जरा पाठवणीकरता राखून ठेव ग ते अश्रू. असे तिची आई म्हणते तेव्हा, कात्यायनीच्या चेहऱ्यावर हलकेसे हास्य उमटते.
तेवढ्यात त्या अरुंद रस्त्याच्या दुसऱ्या दिशेने एक वेगात येत असलेला ट्रॅक्टर मास्तरांना दिसतो. तेव्हा ते लक्ष्मणरावांना त्याला हात दाखवायला लावतात. आणि ट्रॅक्टर जवळ आल्यावर त्याला गावच्या भाषेतच मास्तर समज देतात.
ओय, कुबडे च्या पोरा मरशील ना बावा, नायतर लोकाईले मारशील सकाय वकाय.. एव्हडी फाष्ट चालवत असते काय राजा टॅक्टर.. बरं झालं आमी हात दाखवला तुले नायतर त्या आज बावन बावन कराल लावले असते आमाले..
हे सर्व होतं असतांना समुद्रपूरकर आणि त्यांचे जावई कारमधून बाहेर उतरतात. सगळं काही व्यवस्थित आहे अजयराव असे म्हणून लक्ष्मणराव त्यांना पुन्हा कारमधे बसायला लावतात.
काका जी, माफ करा .. मायीत नवत आमाले सामोरून कुणी येत हाय मनून, कुबडे चा मुलगा मास्तरांना म्हणतो…
हळूच ट्रॅक्टर पुढे नेत असतांना जाता जाता तो म्हणतो..
पावणे इथले नाय दिसत काका जी.. कुणाकडं आले..
आरं ते गुरुजी कडले व्हयं..असे मास्तर म्हणतात आणि दोन्ही स्वाऱ्या आपापल्या दिशेने जातात.
घरं आता जवळ आलेलं असतं. गावातून कार जात असताना, गावातील बाया बापडे, शाळेत जाणारी मुले, रस्त्यावर दुकान लावून बसलेले लोकं गाडीकडे मोठ्या कुतुहलाने बघत असतात.
शेवटी लक्ष्मणरावांचे घर येते आणि घराच्या एका बाजूने कार लावून सगळे कारच्या बाहेर उतरतात.
सर्वजण आता घरात येऊन सर्वांनी पहिले भोजन करावे असे ठरते. भोजन आटोपल्यावर बाकी चर्चा करायची असे ठरते.
ह्या सर्व गोष्टीत मात्र संजयच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता कात्यायनी बरोबर ओळखते. मात्र त्याला नेमके झालेलं असाव हे तिला जाणून घेण्याची इच्छा असतानाही ती काही करू शकत नाही.
काही वेळाने जेव्हा लग्नाच्या बाबतीत मोठ्या लोकांची चर्चा सुरू होणार असते, तेव्हा कात्यायनी आणि संजय यांनी सुद्धा आपसात एकदा बोलून घ्यावे असे घरातील वरिष्ठ म्हणतात, तेव्हा संजय या गोष्टीला नकार देतो व म्हणतो,
बाबा, पहिले आपण सर्वांनी चर्चा करून घेऊया. नंतरच मी आणि कात्यायनी आपसात बोलून घेऊ.
तर मग अजयराव आपल्याला काही बोलायचे होते ते आपण आता इथे सुरू करूया असे लक्ष्मणराव म्हणतात.
तर असे आहे परांजपे गुरुजी, आमच्या घरचे हे शेवटचे लग्न. प्राजक्ताचे कसे केले तसेच छान आणि संपूर्ण वैदिक पद्धतीने आणि धडाक्यात ते आम्ही करू. फक्त जे मी आमच्याकडून काही देण्याचे आहे आणि आपल्याला काय हवे तसे सांगा. मी माझ्या ऐपतीप्रमाणे अवश्य देईल असे समुद्रपूरकर म्हणतात.
आता बाबा काय बोलणार याकडेच संजयचे लक्ष असते. तर एकीकडे कात्यायनी मात्र संजयकडे अधून मधून बघत असते. त्याच्या चेहऱ्यावरील बदलत जाणारे हावभाव, त्याच्या मनात नेमके काय सुरू आहे हेच तिला जाणून घ्यायचे असते. जो संजय तिने दोन दिवसांआधी बघितला तो असा नव्हता. आजचे एवढे आनंददायक वातावरण असतांना तो असा का? आई जगदंबे, दत्तगुरु जरा माझ्या प्रश्नाचे उत्तर मला मिळू दे म्हणून कात्यायनी मनोमन प्रार्थना करते.
एकीकडे देण्याघेण्याची चर्चा सुरू असतांना, लक्ष्मणरावांच्या काय मागण्या आहेत हे ते बोलू लागतात.
अजयराव तुम्ही एकीकडे म्हणता, आपल्याला काय हवे ते सांगा आणि एकीकडे असेही म्हणता, आम्ही आमच्या ऐपतीप्रमाणे देऊ. तर माझ्या मागण्या मी आपल्याकडे ठेवतो बघा जमत असेल तर.
संजय हे ऐकून वडिलांना थांबवतो, तेव्हा माझे बोलणे झाले की तू बोल असे म्हणून लक्ष्मणराव त्याला शांत राहायला सांगतात.
अशावेळेस कात्यायनीला नेमका काय प्रकार असू शकतो याचा अंदाज ती बांधते.
बघा अजयराव, मला माझ्या संजयसाठी एक चांगल्या कंपनीची दुचाकी, एक फ्रिज, काही रोकड कॅश, थोडेफार सोने, आता काय ते कलर टीवी आले म्हणतात ते … यातले आम्हाला काहीही नको राव. एवढे म्हणून लक्ष्मणराव काही क्षण थांबतात. समुद्रपूरकर काही बोलणार एवढ्यात.
पुढे ऐका अजयराव,
तुम्ही जे हे कन्यारत्न इथे पाठवणार आहात ते इतके अमूल्य आहे की, त्यासमोर कोणत्याच गोष्टीची काही किंमत नाही. तुम्ही तुमच्या ऐपतीपेक्षा खूप जास्त देणार असूनही आम्हाला काही द्यायचे आहे असे कशाला म्हणता.
हे सर्व ऐकल्यावर संजयला रडावे की हसावे हे कळत नाही तर एकीकडे कात्यायनी जेव्हा लक्ष्मणरावांची ती यादी ऐकत असते तेव्हा तिला पण नवल वाटते.. पण पुढे ती आणि बाकी सर्वजण जे पुढे ऐकतात त्यामुळे सर्वचजण लक्ष्मणरावांकडे बघतच राहतात.
घाबरविले होते हो परांजपे गुरुजी तुम्ही, असे म्हणून जेव्हा समुद्रपूरकर लक्ष्मणरावांच्या पाया पडायला जातात तेव्हा मात्र ते देवाकडे हात दाखवून, मी याचा हकदार नाही हो.. ते पांडुरंग त्यांच्या पाया पडा.
आपण एवढ्या चांगल्या आणि सुसंस्कृत कुटुंबात आपली मुलगी देणार आहोत याचा अजय यांना खूप अभिमान तेव्हा वाटतो. म्हणून आमच्याकडून स्वखुशीने आम्ही काहीतरी देऊ असे जेव्हा ते म्हणतात, तेव्हा आता तुम्ही संजयशी बोलून घ्या असे लक्ष्मणराव म्हणतात.
संजयसुद्धा यावर स्पष्टपणे बोलतो, आम्हाला आणि व्यक्तिगत रित्या मला सुद्धा काही नको. पण समुद्रपूरकर काही केल्या ऐकत नसल्याने, संजय सुद्धा आपण जर ऐकणार नसाल तर मला हे लग्न मान्य नाही हे तो सर्वांसमोर म्हणतो तेव्हा संजय म्हणजे एक वेगळेच व्यक्तिमत्व आहे हे कात्यायनीच्या लक्षात येते.
नंतर काहीवेळाने ठरल्याप्रमाणे संजय आणि कात्यायनी चर्चा करतात. पण तेही फक्त काही क्षणांची अबोल अशी चर्चा. खरं म्हणजे त्यांनी आपसात न बोलताच एकमेकांना ओळखले असते.
आता पुढे साखरपुड्याचा आणि लग्नाचा मुहूर्त कधी काढायचा हे आपण फोनवर बोलून घेऊया असे दोन्ही कुटुंबाचे ठरते. बराच वेळ झालाय म्हणून समुद्रपूरकर लक्ष्मणरावांची परवानगी मागतात.
आता कात्यायनी तिच्या घरच्यांसोबत घरी जायला निघते. ती आणि फक्त तिचे कुटुंबीय नाही तर तिचे काही स्वप्न जे लग्नानंतर पूर्ण होणार असते ते स्वप्न घेऊन ती निघालेली असते. तेव्हा तिला तिचे होणारे सासरे आठवतात ज्यांनी तिला तिच्या स्वप्नांना जगण्यासाठी आश्वस्त केलेले असते. तिला आठवतो तो संजय जो आपल्या तत्त्वांसाठी लग्नाला सुद्धा नकार द्यायला तयार झालेला असतो. आणि आठवतात त्या तिच्या सासूबाई, ज्यांनी तिला म्हटले होते की तुला बघून माझ्यामध्ये परिवर्तन झाले. अशात एकदम ती भानावर येते. माझ्यामुळे… छे.. ही तर त्या आई जगदंबेची कृपा.. मग पुन्हा त्या स्वप्नात ती हरवून जाते. अशात तिचा डोळा कधी लागतो तिलाही कळत नाही.
तेवढ्यात, मने ये मने.. गाव आलेय बेटा!