- त्यांचे संवाद – १
- त्यांचे संवाद : २
(श्वेता)
[तो (३०-३२) , ती(२८-३०) ]
तो: उन वाढलंय नाही?
ती: हं!
तो: फोन बिलचं बर असतं.. ऑन लाईन पण भरता येतं.. हा म्हणजे वैताग आहे
ती: —
तो: तुम्ही जॉब करता का?
ती: हं!
तो: अरे व्वा! कुठे?
ती: पुढे सरका…
तो: अं?
ती: पुढे सरका..रांग पुढे सरकलीय..
तो: अरे.. लक्षच नाही माझं.. तुमच्याशी बोलत होतो ना..
तो: लंच मधे आलात का?
ती : नाही.
तो: मग? सुट्टी घेतली?
ती: (मानेनेच नकार)
तो: मग उशिरा असतं का ऑफिस?
ती: नाही. उशीर ‘होतोय’
तो: पहिल्यांदा आलात का बिल भरायला ?
ती: हं!
तो: म्हणूनच… ! नेहमी कोण मिस्टर भरतात?
(चैतन्य)
ती – तुम्हाला काय करायच्याय फुकटच्या चौकश्या? दिसली सुंदर मुलगी की लागले चान्स घ्यायला.
तो – अहो हे काय बोलताय?…
ती – हो हो. सहज सहज म्हणणारे तुमच्यासारखे चिडिमार..
तो – माफ करा! पण तुमचा काहीतरी गैरसमज होतोय.
ती – काय गैरसमज? चान्स घेत नव्हतात का तुम्ही?
तो – अहो तो गैरसमज नाही. तुम्ही म्हणालात ना की ‘दिसली सुंदर मुलगी की लागले चान्स घ्यायला’. त्यात तुमची गफलत झाली बघा.
ती – म्हणजे?
तो – तुम्ही अजीबातच सुंदर नाही हो.
(तुषार)
ती: (फणफणता चेहरा त्याच्यावर स्थिरावून, नाकाने जोरात निश्वास टाकते… रोखून बघणे सुरूच)
तो: (ओशाळत) नाही तश्या रागात येताना तुमचा चेहरा देखणा वाटतो नाही असे नाही…
ती: शट अप. पुढे चला. माझ्याजवळ पूर्ण दिवस नाही इथेच उभे राहायला.
तो: अरे हो पुन्हा रांग पुढे गेली नाही का, हे बघा तुमच्याशी बोलण्याच्या नादात कसे काळाचे भानच स्थिर राहत नाहिये.
ती: अजून किती पंच लाईन्स गोळा करून ठेवल्या आहेत वापरायला?
तो: (गालात हसत) किती प्रेडिक्टेबल असता तुम्ही स्त्रीयां, सर्वांना फंडामेंटल एट्रीब्युशन चा आजार असतो
ती: (गोंधळून..) कसला आजार?
तो: अहो, फंडामेंटल एट्रीब्युशन चा ! हो तुम्हाला मराठीत सांगावे लागणार नाही का. अहो दोरीला साप ठरवण्याचा, थोडे वेगळे मनाविरूद्ध कोणी वागताना दिसले तर त्याला ठार पापी ठरवण्याचा.
ती: म्हणजे?
तो: अहो मी थोडी अधिक चौकशी केली तर तुम्ही नाही का मला थेट कोर्टात नेऊन चिडीमार ठरवून निकाल लावून टाकलात ते. त्याला म्हणतात फंडा..
ती: (त्याला कापत) पुरे काय प्रोफेसर वगैरे आहात की काय कोणत्या कालेजात?
तो: नाही हो फक्त अवांतर वाचन दांडगे आहे, (ती संवादात शेवटी गुंतली हे बघुन गालातल्या गालात हसत पुन्हा, विषय बदलतो) .. मग नेहमी मिस्टर भरतात का बिल, तुम्हाला आज उगाच त्रास झालेला दिसतोय?
ती: जाऊदे हो समोर रांगेकडे लक्ष द्या जरा. माझी हेरगिरी पुरे झाली आता… तशीही तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी सुंदरही नाही मग कशाला एवढा उपद्व्याप? काय?
तो: सॉरी हं. तसं मी गमतीने म्हणालो होतो, फार मनाला लावून घेऊ नका.
ती: त्याची तुम्हाला काळजी नको. मी कशी आहे आणि मी कशी दिसते याची..
ती आणि तो दोघेही एकदम: (एकाच वेळी) परवानगी मी कुणालाच दिलेली नाही आणि त्यामुळेच माझ्या परवानगीशिवाय मला कोणीहौ दुखावू शकत नाही.
ती आणि तो: (काही काळ एकमेकांकडे बघतच राहतात…)
ती: (शांतता तोडत…) तुम्ही पण काळे सरां…
तो: (मधेच कापत) हो २००० ची बॅच
ती: अरे वा, मी २००२ च्या बॅच मधे होते
(श्वेता )
तो: स्मॉल वर्ल्ड!!
ती: खरंच!
तो: २००२…म्हणजे ती स..
ती: समिक्षा राजवाडे ..हो माझ्याच बॅचला होती..
तो: मनातलं वाचता की काय? तुम्हाला कसं कळलं मी तिच्याबद्दल विचारतोय?
ती: तुम्ही तिच्याच विषयी विचारणार..
तो: म्हणजे?
ती: तेव्हा ती एकमेव ‘पीस’ होती ना! हेच म्हणायचे ना तुम्ही लोक…. ‘पीस’ ?
तो : [ओशाळून] हां… ते म्हणजे असंच! कुठे असते..?
ती: लग्न झालं तिचं..न्यू जर्सीला असते..
तो: आणि तुमचं..?
ती: अं?
तो: तुमचं झालं?…लग्न??
ती: काळे सर कुठे असतात हल्ली?
तो: का? सरांना सांगणार का?
ती: काय?
तो: हेच की तुमचं लग्न झालं का?
ती: तुम्ही पुन्हा पुन्हा…. ओह नो! बंद केली..
तो: अं? मी ? मी पुन्हा पुन्हा काय बंद केली?
ती: अहो ..तुम्ही नाही..त्याने..त्या माणसाने खिडकी बंद केली..
तो: लंच झाला..! (खळखळून असतो) १ ते दीड ! आत अर्धा तासाने उघडणार….
ती: अर्धा तास!!!
तो: हो ना..बिचारा..! घाईघाईत जेवाव लागेल त्याला.. नाहीतर दुपारचं जेवण कसं व्यवस्थित व्हायला हवं..
ती: तुम्हाला सगळीच गंमत वाटते का हो?
तो: चीडचीड करून तो १० मिनिटे आधी खिडकी उघडेल असं वाटतंय का तुम्हाला?
ती: तुम्ही गप्पा न मारता नीट पुढे सरकला असतात तर..
तो: कमाल आहे तुमची! समोरच्या माणसाच्या पाठीला अगदी चिकटून उभा राहिलो असतो तरी एका माणसाला लागतो तितका वेळ लागलाच असता…आणि तुमच्याशी बोलताना..
ती:पुरे! एकतर ह्या उन्हापायी काही सुचेनासं झालंय.. उशीर होतोय आणि अर्धा तास..
तो : गप्पा मारूया ना..
ती: मला नाही मारायच्या गप्पा.. मला उशीर होतोय, मी जातेय..
तो: ए थांब… हे ठरलं नव्हतं आपलं…
ती: हे असं.. एक एक तास उन्हात उभं राहणं हे ही ठरलं नव्हतं
तो: तू आलीसच का? मी येत होतो ना बिल भरून? तू बसायचं होतं आपल्या ‘स्पॉट’वर जाऊन..
ती: तू म्हणाला होतास १५ मिनिटात काम आटोपेल
ती: नेहमी तसंच होतं..पण आज जास्त लोक आलेत हा माझा दोष आहे का?
तो: उगाच आले मी !!
ती: असं काय करतेस! किती छान रंगलाय आपला खेळ..!
ती: मला नाही खेळायचा..
तो: पण तूच सुचवलास ना?
ती: तरीही नाही… ( चालू लागते)
तो: अगं… अगं एक मिनिट… लग्न झालं का.. ते तरी सांगून जा ना…