तू ठेव मला जपून तुझ्या वहीच्या पानांत
तुझ्या शब्दाशब्दातून तर मीच व्यक्त होते…
एखाद्या व्यक्तीच्या सतत सोबत रहावंसं वाटणं, त्याचा सहवास आपल्याला लाभावा म्हणून जमेल तितके प्रयत्न करणं ही नव्याने प्रेमात पडल्याची काही प्रमुख लक्षणं. अशावेळी अबोल प्रेमाचे अनेक अलवार क्षण बहरत जातात. शब्दासारखे कुठल्यातरी वहीच्या पानात कौतुकाने जपलेही जातात आणि मग प्रेयसीच प्रियकराच्या मनातील भावना बोलून दाखवण्यासाठी त्याच शब्दांचं बोट पकडते आणि व्यक्त होऊ लागते. नागपूरच्या कवयित्री प्रीती जामगडे यांच्या लेखणीतून शब्दबद्ध झालेल्या तरल, साध्या पण तितक्याच मोहवून टाकणाऱ्या या ओळी प्रेमाची सात्विकता प्रगट करत मनाचा सहजपणे ठाव घेतात. यांच्या कवितेतून प्रेमाचे अनेक रंग फार सुंदररित्या साकारले गेले आहेत याची प्रचिती त्यांच्या अनेक रचना वाचल्यावर लक्षात येते.
मला फक्त सोबत करायचीय तुझी
तुझ्या सुखदुःखात
तू चालून दमशील तेंव्हा
तुझं हक्काचं घरटं व्हायचंय
तुला विसावण्यासाठी...
तुझं-माझं या पलीकडे जाऊन “आपलं” असं म्हणत प्रेमाने अनेक सुखं आपल्यात ओंजळीत दिली. निस्वार्थी हेतूने सुखदुःखाच्या क्षणी एकमेकांना साथ देता यावी इतक्या माफक अपेक्षेने प्रेयसी जेंव्हा प्रियकराकडे आपली भावना व्यक्त करते तेंव्हा तिला त्याच्यासाठी फक्त एक विसाव्याचं ठिकाण बनायचं असतं, आयुष्याच्या अनेक वळणांवरुन एकटेच चालत जाताना यापल्या माणसाचा निव्वळ हात हातात असणं ही कल्पनादेखील आपला प्रवास सुखावह करू शकते ही गोष्टच फार आनंददायी असते. अबोल प्रेमाचा अजून एक रंग दाखवताना त्या असंही म्हणतात की,
प्रेम नाही म्हणतेस मला
तरी काळजी माझीच करत असतेस...
कितीही नाकारलं तरी प्रत्येक क्षणाला काळजीतून व्यक्त होणारं प्रेम हे प्रत्येकानेच कधी ना कधीतरी नक्कीच अनुभवलेलं असतंच.!
पुढे त्या म्हणतात की,
जीवनाच्या या काटेरी झुडुपात
सुगंधी फुल व्हावेसे वाटते
दुःखाच्या या महासागरात
सुखाच्या लाटा व्हावेसे वाटते…
आयुष्याकडे पाहण्याचा प्रचंड आशावाद आणि सकारात्मक दृष्टीकोन जेंव्हा कवीकडे असतो तेंव्हा तो ती सगळी ऊर्जा आपोआप त्याच्या शब्दातून वाचकापर्यंत पोहचवत असतो, सतत नैराश्याच्या अधीन झालेल्या माणसाला आशेचा किरण दाखवणं ही आजच्या काळाची आणि समाजाची गरज बनलेली असताना खूप हळवं काहीतरी लिहिणाऱ्या कवयित्रीचे हे शब्द बरचं काही सांगून जातात. दुःखाचे कितीही घाव सोसले तरी काट्या-कुटयांच्या मार्गावर प्रसन्न, सुगंधी फूल बनून उमलण्याची प्रचंड इच्छाशक्ती कवयित्रीच्या शब्दात भरलेली आहे हे या काव्यपंक्ती वाचल्यावर मान्य करावेच लागते.
खुली आहेत सर्व दारे तुझ्यासाठी इथे
बंद असणारी ती खिडकी उघडता येईल का?
चौकटीत राहून बंदिस्त आयुष्य जगणं आजच्या तरुणाईला मान्य नाही, अन्यायाविरुद्ध बंड करायला, आपले हकक मिळवण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून आवाज उठवायला सगळेच अग्रेसर असतात.मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं करून यशाचे शिखर गाठत असताना कितीतरी वर्षापासून समाजासाठी बंद असलेल्या अनेक खिडक्यांपैकी एखादी तरी खिडकी उघडण्याचं धाडस आपण करतो का असा खडा सवाल कवयित्री आपल्या कवितेतून करत आहे.
जिंकण्यासाठी संघर्ष
सुरु असतो सर्वांचा
हासण्यासाठी मात्र कंबर कसणे
जरा कठीण आहे...
स्पर्धेच्या आणि विज्ञानाच्या या युगात आपण कुठेच मागे राहू नये अशी सुप्त इच्छा मनात बाळगून जो तो आपापली लढाई लढत असतो, पहिल्या क्रमांकावर येण्यासाठी प्रत्येकाचा आपापल्या पातळीवर संघर्ष सुरू असताना दिवसभरात दोन निवांत क्षण शोधून आपल्या प्रियजनांशी हसत खेळत वेळ घालवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते, कळतं पण वळत नाही अशी ही मनोवस्था या चारोळीतून मांडताना वास्तवाचे यथार्थ चित्रण कवयित्री करतात.
हृदयाच्या अगदी तळाशी
कुठेतरी खोल रुतून बसली आहे
एक जखम...
प्रत्येकाच्या तळमनात दडून बसलेला एक सल, एक चिरतरुण जखम जी कधीच कोणापुढे उघडी पडत नाही ती जखम कधीकधी कशी शब्दातून भळभळत राहते आणि हृदय पिळवटून टाकते हे सांगणाऱ्या प्रीतीताईच्या या ओळी थेट वर्मावर घाव घालतात.
किती उभे रहावे आडोशाला सुखाच्या
तरी दुःखाच्या झळा लागतच आहेत...
सुखामागून दुःख आणि दुःखामागून सुख हे दबक्या पावलाने चालत येत असते पण, कधीकधी सुखाचा इतका भडिमार होत असतो की त्याचवेळी दुःखाची झळ आपल्या मनाला कधी लागून जाते काही कळतच नाही, मग याची सवय करून घेत सुख-दुःखाचा लपंडाव याआपण आयुष्यभर खेळ राहतो.
मानवी मनाचे अनेक कंगोरे आपल्या साध्या आणि ओघवत्या लेखनशैलीतून व्यक्त करणाऱ्या प्रीतीताईचे जगण्यावर असलेले निस्सीम प्रेम त्यांच्या वेगवेगळ्या रचनेतून प्रकट होत असते.
ध्येप्राप्तीच्या या वाटेवर
अपयशाचेही मान आभार
मागे आलेल्या अनुभवातून
पुढील मार्ग कर साकार...
असं अगदी आत्मविश्वासाने लिहिणाऱ्या या कवयित्रींच्या पुढील अनेक रचनांना यशाची वाट मिळून लेखनक्षेत्रातील त्यांचे प्रत्येक स्वप्न साकार होवो हीच सदिच्छा.
– पूजा भडांगे