*वर्तुळ*
✍️ हेमंत नाईक
लहानपणी शाळेत कंपासने जेव्हा कोऱ्या कागदावर पहिलं वर्तुळ काढलं तेव्हा त्याची दोन टोक जुळतानाचा आनंद अजूनही मला आठवतो आहे. आज तोच विषय घेऊन लिहितो आहे.
जस सूर्याच्या कक्षेत युगान युगे पृथ्वी गोलाकार फिरत आहे… वर्तुळाचा आणि जीवनाचा खूप निकटचा संबंध आहे.
सूर्य चंद्र तारे हे सर्वही गोलाकार आहेत
पावसाचे जमिनीवर पडून पाण्याचे पुरात वाहून जाऊन सागरास मिळणे आणि त्याची वाफ होऊन मेघाद्वारे परंत येणे हे जीवन चक्र परत परत अनुभवतो.
पूर्वी जुनाट म्हणून हेटाळणाऱ्या फॅशन्स हल्ली लेटेस्ट म्हणून पुन्हा डिमांड मध्ये आहे.
राजकारणात कधीकाळी ३६ चा आकडा असणारे आज गळ्यात गळा घालून आहेत.बरं परत पुढे पुन्हा ते केव्हा काडी मोड घेतील याची शाश्वती नाही .
या व खूप साऱ्या घडणाऱ्या गोष्टी चक्राकार आहेत परत परत घडणाऱ्या. अगदी आयुष्यातही बऱयाच वेळा हा अनुभव येतो.सुख दुःख हे क्रमश:एकामागे एक नियमीत येत असतें.
पुनःरुपी जनन
पुनःरूपी मरण
असे जीवन मृत्युंचे देखील एक वर्तुळाकार चक्र आहे असे पुनर्जन्मात विश्वास ठेवणारे मानतात.
स्वतः गोल फिरून देवास नमन केल्यावर मंदिरात देवाभोंवती आपण वर्तुळाकार गोल प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे.बारस्याच्या वेळेपासून पाळण्यात नाव कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या असे म्हणून लहानपणीच गोलगोल फिरण्यांची ओळख होते. पुढे लग्न करताना एकमेकांना सातजन्म सात देण्यासाठी अग्निभोंवती जोडीदारासोबत घेतलली सप्तपदीही वर्तुळकारच. अगदी शेवटी चितेभोंवती गोल फिरून मडके फोडण्यापर्यत या वर्तुळाची साथ असते.
भात्यातील बाण सुटला की सुटला तो परत येत नाही हे त्रिबाधित सत्य असलं तरी जीवन मात्र बुमरॅग सारखं नित्य वर्तुळातच चालत.
पंचभूतापासून निर्माण झालेला मानवी देह हा शेवटी त्यातच विलीन होतो.
म्हणूनच दुनिया गोल आहे असे आपण म्हणतो.
*वर्तुळ*
_गोल किती सुंदर_
_वर्तुळ दिसें गोल.._
_चक्रामुळे गती रे_
_सांगे त्याचे मोल.._
_एका टिपक्यापासून_
_जेथे होते सुरवात.._
_तेथेच तयास अंत_
_तसाच जीवन प्रवास.._
_प्रश्न शोधतो उत्तर_
_उत्तरातून निर्मितो प्रश्न.._
_आम्ही खूप हा खेळतो_
_जीवनी गोल तोच खेळ.._
_दगड जर पडला_
_अथांग जलाशयात_
_वलंय ते जन्म घेई_
_गोल गोल वर्तुळाकार_
_अनुभवाच्या कक्षा_
_जणू वर्तुळाचे परीघ_
_परीघ कुणी ओलांडले_
_तर लागे नव्याचा शोध_
_चाकोरीबद्ध जीवन_
_जगणारे बहुसंख्य सारे.._
_चक्रव्युह ओलांडणारे_
_अभिमन्यू ते मोजके.._
_गोल वर्तुळाची आहे_
_तिचं तिचं रे कहाणी.._
_त्रिज्या त्याची रुंदवा_
_नाहीतर कंटाळवाणी.._
ही वर्तुळाची कहाणी इथेच थांबवतो.
✍️ हेमंत नाईक
सोमवार