||श्रीराम समर्थ||
साधारण गेल्या दोन वर्षात काही परिचित लेखकांचे 30 दिवसात 30 लेख वाचण्याचा योग आला. याच काळात दिल्लीत स्थायिक झाल्यानंतर आपले दिल्लीतील अनुभव नोंदवून ठेवावे आणि आठवड्यातून एक लेख लिहत जावा, असा संकल्प मनाने केला. त्यानुसार चार-पाच लेख अनुभवकथन स्वरूपाने फेसबुकवर लिहिल्याही गेले आणि लेखनातील सातत्य टिकवून ठेवणे किती कठीण आहे, याची प्रत्यक्ष प्रचिती आली. मनात एक धास्ती ही निर्माण झाली. त्यामुळे त्यानंतर या विषयावर किंवा इतर कुठल्याही विषयावर लेख लिहिल्या गेला नाही.
लेखनाचे सातत्य टिकवण्यासाठी बऱ्याच बाबी महत्त्वाच्या ठरतात त्यात वेळ मानसिक संतुलन कामाची प्राथमिकता आणि इच्छाशक्ती इत्यादी घटक कारणीभूत असतात गेल्या वर्षभरात हे सर्व घटक अनुकूल असले तरीही माझ्या शोध परबंधाच्या कामात अडकलेली असल्यामुळे त्या व्यतिरिक्त असणाऱ्या विषयांकडे दुर्लक्ष झाले आणि आधी हाती घेतलेले एक काम पूर्ण करावे हे मनाने ठरवले यासारख्या असंख्य कारणमालांमुळे लेखनातील सातत्य ढासळले आणि मनात ती सल कायम राहिली
गेल्या जानेवारी महिन्यातही 30 दिवसात 30 लेख लिहिण्याचा उपक्रम सूरपाखरू समूहाने राबविला होता हे नुकतेच कळले यावेळी जुलैपासून पुन्हा हा उपक्रम सुरू होणार असताना जून महिन्यातच नागपुरातील सुप्रसिद्ध कवी तुषार दादा जोशी यांनी आठवणीने समूहात सामील होण्यासाठी प्रेरणा दिली आणि लेख लिहिण्यासाठी प्रोत्साहन दिले
वर सांगितल्याप्रमाणे लेखनातील सातत्याबाबतची भीती याही वेळी मनात घर करून आहेत तरीही एकदा करावे बघून या न्यायाने यावेळी मी सुरपाकरू समूहाची जोडले गेले
बरेचदा आमच्यासारख्या नवशिक्यांना कुठल्या विषयावर व्यक्त व्हावे याविषयी संभ्रम निर्माण होतो हे ठाऊक असल्याने आदरणीय तुषार दादांनी शक्य असणाऱ्या विषयांची यादीच नवलेखांना प्रस्तुत केली आणि त्यातून आपण काय काय करू शकतो याविषयी चिंतन सुरू झाले.
सुरपाखरू गटाच्या नोंदणी फॉर्ममध्ये आपल्या आवडीचा विषय नोंदवत असताना अनुभवकथन हा विषय मी आवडत असल्याचे नमूद केले. त्यामुळे आपलेच अनुभव आपण लिहावेत, हे सुरुवातीलाच मी नक्की केले होते. पण सुरुवात नेमकी कुठून करावी हा नेहमीचा पर्वलीचा प्रश्न मनात रुंजी घालत होता. शिवाय काही दिवस प्रवासात असल्याने हा लेखमालेचा विषय मागे राहिला आणि पहिल्या लेखाचा दिवस (अर्थात एक जुलै) येऊन ठेपला.
अशावेळी पूर्वी लिहिलेल्या लेखापैकीच एखादा लेख देऊन दिवसाची पूर्तता करावी असे वाटले. परंतु संपूर्ण लेखमालेत एकसंधता टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने हा प्रास्ताविकपर लेख आज देते आहे.
आपल्या प्राचीन संस्कृत ग्रंथांमध्येही *मंगलाचरण* करण्याचा दंडक सर्व शास्त्रकारांनी पाळलेला दिसतो. त्यामुळे त्याच परंपरेचे पाईक असणाऱ्या मलाही तिचे अनुसरण करावेसे वाटले.
संस्कृतभाषेची अभ्यासक असल्याने मंगलाचरणा शिवाय पुढे जाण्यात औचित्य वाटले नाही. म्हणून पहिला नमस्कार लेखनातील सातत्य टिकवून ठेवण्यासाठी आशीर्वाद देणाऱ्या आणि या लेखमालेत येणारे संभाव्य विघ्न दूर करणाऱ्या विघ्नहर्ता गजाननाला करते. कुठलेही लिखाण पूर्ण होण्यासाठी ज्याप्रमाणे विघ्नांचा अभाव अपेक्षित असतो त्याचप्रमाणे शब्दसौंदर्य कायम राखण्यासाठी सरस्वतीचा वरदहस्तही अत्यावश्यक ठरतो. म्हणून कार्यारंभी वरदविनायकासहित माता शारदेला वंदन करून इष्टदैवत आणि कुलदैवत असणाऱ्या विष्णुरूप श्रीरामाच्या चरणी नतमस्तक होऊन सद्गुरु परंपरेला नमन करून ही लेखमाला सुरू करते आहे.
*योजकस्तत्र दुर्लभः।* या उक्तिप्रमाणे भली मोठी कामे योग्य लोकांचा संग्रह केल्याने पूर्णत्वास जातात हे आपण बघितले आहे. म्हणून या सुरपाखरू समूहाचे योजक असणार्या डॉ. तुषारदादा जोशी यांनी अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने आखणी करून आणि नाव नोंदणी करून लेखनास प्रवृत्त केल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देते.
समूहातील सर्व लेखकांच्या प्रेरणेने आणि त्यांच्या लेखातील सघन आशयाने, रोज नवनवीन वाचायला मिळेल आणि त्यातून प्रेरणा घेऊन काहीतरी लिहिता येईल अशी आशा वाटते. त्यामुळे सुरपाखरू समूहात लेखनपाखरू होऊ पाहणाऱ्या प्रत्येकाला या नवभरारीसाठी अनेक हार्दिक शुभेच्छा देते.
इति शम्।