“इथे नुसतं बसून वेळ वाया घालवू नका. संजुला चप्पल घ्यायची होती. आजूबाजूला खूप दुकानं आहेत. ते काम आटपून घ्या.”
मी नुकतीच मुंबईहून आले होते. नर्स तरबूजाची वाटी घेऊन आली. ती हातात घेऊन मी तिला म्हणाले, “जा तुम्ही, मी भरवते त्यांना.”
आठ वाजता हॉस्पिटलमध्ये पोचूनही मला अकरा वाजेपर्यंत, म्हणजे पेशंटला भेटायची हॉस्पिटलची वेळ होईपर्यंत, वाट बघावी लागली होती. बाबा दोन दिवसांपासूनच आयसीयूमध्ये ॲडमिट होते. लहान मुलं, नोकरी, घराच्या इतर जबाबदाऱ्या — ह्या चक्रातून इमर्जन्सी असल्याशिवाय बाहेर पडता येत नाही. आणि “बाबा बरे आहेत. फक्त ऑब्जर्वेशनसाठी त्यांना आयसीयूमध्ये ठेवलंय,” असं घरच्यांनी सांगितल्यावर लगेच उठून जावं असं मलाही वाटलं नाही.
शिवाय, “माझ्या बाबांना कधीच काही होऊ शकत नाही. He is the strongest man of the world,” हे बेचाळीस वर्षांच्या मलाही अजून पक्कं वाटत होतं. अगदी मनाच्या तळातून. बाबांनी हात धरून चालायला शिकवलं, खाऊ भरवला, खांद्यावर फिरवलं — त्याच तळातून.
मी माझ्या रहाटगाडग्यात किती व्यस्त आहे हे त्यांनी अनेकदा पाहिलं होतं. त्यामुळे, “इथे सगळं ठीक सुरू आहे. तू नाही आली तरी चालेल,” असंच ते फोनवर म्हणायचे. त्यांनी असं म्हटलं की मला एक आवंढा यायचा. बाबांना माझी आठवण येते हे कळायचं.
मग मीही मला तुमची कशी काळजी वाटत नाही आहे हे दाखवायला म्हणायचे, “आत्ता नाहीच येते बाबा, दसऱ्याला… नाही तर पुढे येणाऱ्या कुठल्याही सणाचं निमित्त काढून येईन.”
आता ही ते आयसीयूमध्ये भरती झाल्यावर तिसऱ्या दिवशी मी भेटायला आले होते. मला बघताच म्हणाले, “मुलींना घरीच ठेवून का आलीस? इथे सगळं ठीक आहे. मी बरा आहे.”
“अहो, जवळच राहते ना आता, म्हणून सहज आले.”
नर्सच्या हातातली तरबूजाची वाटी घेऊन मी हो-हो करत एकेक तुकडा त्यांना भरवत होते. त्यांना परत एक स्ट्रोक येऊन गेला होता. रक्तात थोड्या गाठी झाल्या होत्या.
आयसीयूमधल्या आजूबाजूच्या पेशंट्सबद्दल ते मला सांगत होते. कुणाचं वय लहान, कुणाचं मध्यम, कुणी वृद्ध. बाबांनी तीन दिवसांत बरंच निरीक्षण केलेलं होतं.
मला म्हणाले, “इथे झोपून राहावं लागतं. काम काहीच नसतं. माझा वेळ फुकट जातो. उगाच झडकून ठेवलाय मला. मला काही झालेलं नाही.”
मी पण त्यांच्या हो ला हो देत होते. कारण त्यांना कधीच काही होऊ शकत नाही, हे तर माझ्या तळमनाला आधीच माहिती होतं.
“आता आलीच आहेस, तर नुसतं बाहेर बसून राहू नका. आजूबाजूला खूप दुकानं आहेत. संजुला चप्पल घ्यायची होती. ते काम आटपून या. मी आता बरा आहे,” बाबा म्हणाले.
“मला पण बाजारातून स्वानंदीसाठी पेन्सिली घ्यायच्या आहेत, रुमाल घ्यायचे आहेत आणि अजूनही काही छोटं-मोठं सामान घ्यायचं आहे.”
मला कशी तुम्ही आयसीयूमध्ये असल्याची काळजी वाटत नाही आहे, हे त्यांना पटवून सांगण्यासाठी मी अजूनही असंच काहीबाही, बिनमहत्त्वाचं सांगत राहिले.
सगळं कसं ठीक आहे, हे आम्ही दोघेही एकमेकांना पटवत राहिलो. डोळ्यात पाणी अजिबात न येऊ देता.
मी आयसीयूच्या बाहेर खुर्चीला आणि तळमनाला परत स्वतःला पक्कं खिळवल.