लक्ष्मणराव गुरुजी मोठ्या आनंदाने दिवाळीचा फराळ करत होते. तेवढ्यात स्वयंपाकघरातून त्यांच्या पत्नी सुमनबाईंचा आवाज आला.
जरा धीर नाही या बुवाला. लाडू आणते म्हणते, तर यांचं सुरूही झालं!
आली की ऐकू आम्हाला तुमची बडबड. आणा जरा लाडू. बघू, यावर्षीचे किती गोड झाले ते. तसंही यावर्षी लाडवांचे फार प्रयोग करून उशिराच केलेत तुम्ही, लक्ष्मणराव हसत म्हणाले.
सुमनबाईंनी नवऱ्याच्या ताटात एक लाडू ठेवला आणि म्हणाल्या, पहिले हा लाडू संपवा, एवढं म्हणत त्या पुन्हा स्वयंपाकघरात गेल्या.
संपवतो हा लाडू. दरवर्षीसारखेच ऊर्जावान झाले असतील, याची मला खात्री आहे. ते खायला जरा विशेष प्रयत्न लागतात… लक्ष्मणराव 'प्रयत्न' या शब्दावर विशेष जोर देत म्हणाले.
तेवढ्यात स्वयंपाकघरातून काहीतरी पडल्याचा आवाज आला.
हो हो… खातो लाडू! पण भांड्यांना जरा जपून ठेवा. त्यांच्यावर राग काढू नका.
मस्त झालेत हो सुमनबाई, यावर्षीचे लाडू! आपल्या घराच्या मातीच्या भिंती हातोड्याने लवकर तुटतील, पण हे लाडू त्यापेक्षा जरा जास्त मजबूत आहेत.
त्यावर सुमनबाई भाजी चिरता चिरता जरा चिडक्या स्वरात म्हणाल्या,
अन्न हे पूर्णब्रह्म..
पुढे त्या काही बोलणार, तेवढ्यात लक्ष्मणराव म्हणाले,
लाडवातलं ब्रह्म जरा जास्तच कडक आहे, सुमन…
काय म्हणालात तुम्ही?” सुमनबाई हळूच म्हणाल्या.
नाही… ते जास्त कडक नाहीत. तुझ्या स्वभावासारखेच आहेत, एवढंच म्हणायचं होतं, उगाच पत्नीचा राग आणखी वाढू नये म्हणून लक्ष्मणराव सावरत आणि जरा हसू आवरत म्हणाले.
अहो, तसं नाही. तुम्ही मला एकदम 'सुमन' म्हणालात म्हणून विचारलं.
अगं, संगतीचा परिणाम आहे.
संगतीचा? असा कोण तुमचा मित्र आहे, जो बायकोला नावाने हाक मारतो?”
मित्र नाही गं.
मग कोण?”
आपला मोठा मुलगा राकेश! तो आपल्या बायकोला नावाने हाक मारतो. म्हणून चुकून माझ्याही तोंडून आज तुझं नाव निघालं.
राकेश.. स्वतःच्या मुलाच्या संगतीचा परिणाम झालाय तर गुरुजींवर? प्रेमविवाह आहे त्याचा, म्हणून तो बायकोला नावाने हाक मारतो. आणि कसली संगत? तो आता कुठे आपल्यासोबत असतो? माझा राग शांत करण्यासाठी सुमनबाईऐवजी सुमन म्हणालात, हे थोडं उशिरा का होईना लक्षात आलं माझ्या
लक्ष्मणराव हसत म्हणाले,
शांत झाला ना राग? तेच महत्त्वाचं. आणि जरी तो कायम सोबत नसला, तरी सणावाराला येतो ना! तेवढीच त्याची संगत.
सुमनबाई जरा गंभीरपणे म्हणाल्या,
हो… येतो सणावाराला. पण यावर्षी दिवाळीत जरा कमी वेळच राहिला. हे काय येणं झालं? लक्ष्मीपूजन, भाऊबीज केली आणि लगेच निघून गेला.
अगं, आपल्या सुनबाईंची तब्येत जरा कमी जास्त असते गेल्या काही महिन्यांपासून.. म्हणून लवकर गेला. तिच्याकरिता डॉक्टरांची अपॉइंटमेंट घ्यायची होती त्याला. लक्ष्मणराव बायकोला समजावत म्हणाले.
तिला नक्की काय झालं, हे सांगायला काय होतं राकेशला? आणि तिला विचारायला गेलं तर आपल्यावरच बरसते. काय चिडकी आणि तापट बायको केली आहे राकेशने! सुमनबाई चा स्वर पुन्हा शिफ्ट झाला.
झालं असेल ना आता. त्यांना दोन मुलं झाली, तरी तू अजून सुनेचा उद्धार करणं सोडत नाहीस. आहे ती तशी… आता काय करणार.. लक्ष्मणराव समजावत म्हणाले.
ठीक आहे, ठीक आहे. त्या कुळकर्णी मास्तरांकडे जाणार होतात ना तुम्ही संजयसाठी.
हो. जाऊन येतो म्हटलं. आपल्या संजयसाठी त्यांनी एक मुलगी सुचवली आहे. जरा माहिती काढून येतो. मग पाहण्याचा कार्यक्रम ठरला तर राकेश, सुनबाई, मुलगी, जावई… सगळ्यांनाच बोलावू. सगळे मिळून जाऊ.
वर्षानुवर्षे सुमनबाई आणि लक्ष्मणरावांचा संसार सुखाने सुरू होता. थोड्याफार कुरबुरी नेहमीच्याच असल्या तरी ते एक आदर्श असं जोडपं होतं.
पासष्ठीच्या लक्ष्मणरावांना आता बाकी दोन मुलांच्या लग्नाची चिंता होती. दोघेही जरी आर्थिकरित्या स्थिरस्थावर झाले असले तरी, आपण हयात असेपर्यंत दोघांचेही लग्न लवकर होऊन जावे एवढी त्यांची इच्छा. त्यादृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरु होते. ते स्वतः पौरोहित्य करत असल्याने त्यांची ओळखही चांगली होती. पण संजयसाठी पाहिजे तशी मुलगी सापडत नव्हती.
पुढे काय होतं.. संजयचं लग्न ठरतं.. की आणखी काही.. हे पुढील भागात..