संत जनाबाई
संत कवयित्री मध्ये जनाबाईंना विसरून चालणार नाही.संत जनाबाई नामदेवांच्या घरी काम करणारी एक मोलकरीण.नामदेवांच्या कूटुंबात आली त्या कुटुंबाचा एक भागच झाली.
संत नामदेवांच्या सहवासात तिचे पारमार्थिक आयुष्य बहरले आणि ती विठ्ठलभक्त होऊन गेली.आपल्या अभंगातून ती नामयाची दासी वा नामयाची जनी या शब्दात नामदेवांप्रती गुरुभक्ती व्यक्त करते.
दैनंदिन कामे करता तिला स्वतःच्या अवतीभवती सतत विठ्ठलाचे अस्तित्व जाणवते
ती म्हणते ,' झाडलोट करी जनी।
केर भरी चक्रपाणी॥
दळिता कांडिता,
तुज गाईन अनंता॥
अशा ओव्या गात ती नित्य कामाशी विठ्ठलाची भक्ती जोडताना दिसते.खरं तर त्या अशिक्षित होत्या पण ,' बाई मी लिहिणे शिकले सद्गुरूपायापाशी 'हे ती ठामपणे सांगते. तिच्या
स्त्री सुलभ भावना ती ,' विठू माझा लेकुरवाळा,
संगे गोपाळांचा मेळा 'व्यक्त करते.जनाबाईंची अभंगवाणी ही वत्सलतेचे आणि स्त्रीत्वाचे अंग आहे.त्यामुळेच त्यांच्या अभंगातून मातृत्वाची भावना व्यक्त होते.एक स्त्री असण्याची खंत पण त्यांच्या सुरुवातीच्या अभंगातून दिसून येते.पण तेच परमेश्वर प्राप्तीचा अनुभल आल्यानंतर,
' स्त्री जन्म म्हणूनी न व्हावे उदास' या शब्दात स्त्रियांना दिलासा पण देते.
डोईचा पदर आला खांद्यांवरी।
भरल्या बाजारी जाईन मी॥
असं म्हणून तिने आपली स्त्रीत्वाचा आणि माणूस म्हणून असलेल्या हक्काचा ठामपणे मांडला आहे.हा तिचा आत्मविश्वास त्या काळात
एक बंडखोर पणा म्हणून सांगितला जातो.तर
' स्त्री म्हणजे परमार्थातील धोंड ' अशा प्रचलित
समाजाला धक्का देत जनाबाईंनी स्त्री वर्गाला
आत्मोद्धाराचा मार्ग स्वतःच्या साधनेतून दाखवला.संत जनाबाईंचे गुरु संत नामदेव म्हणतात,' धन्य ती ची जनी ,धन्य तिची भक्ती '
अशा शब्दांत जनाबाईची स्तुती केली आहे.
जनाबाई म्हणतात,
' धन्यवाद मायबाप नामदेव माझा
तेणे पंढरीराजा दाखविले॥
होते जगामध्ये निंद्य।
ते त्वा केले वंद्य।'
जनाबाईंचे हे अभंग संत नामदेवांनी केलेल्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणारे आहे.
स्त्रियांच्या लेखनाचा सामाजिक दृष्ट्या विचार केला तर जनाबाई हे त्या काळात खालच्या सामाजिक स्तरातून वर उठून यशाची उंच पायरी
गाठणा-या स्त्री चे उदाहरण आहे असंही साहित्यिक म्हणतात.
जनाबाईंचे गुरू नामदेव होते .त्या म्हणतात
' नामदेवाचे प्रताप ।शिरी विठ्ठलाचा हात।
जनी म्हणे केली मात।पुसा ज्ञानेश्वरासी॥
संत चरित्रकार महिपती असंही म्हणतात,
' नात्यांचे ठेवणे जनीस लावले।
धन सापडले विटेवरी॥
धन्य माझा वंश ॥
धन्य विष्णुदास स्वामी माझा॥'
जनाबाईं पाच वर्षांची असतानाच तिची आई
गेली .तिचा सांभाळ करण्यासाठी दामाशेटीकडे ठेवले .नंतर वडिल पण गेले .तेव्हा जनी म्हणते
' माय मेली बाप मेला।आता सांभाळी विठ्ठला॥
मी तुझे गा लेकरु।नको मजसी अव्हेरू॥
मतिमंद मी तुझी दासी।ठाव द्यावा पायापाशी॥
तुजविण सखे कोण।माझे करील संरक्षण।
अंत किती पाहसी देवा।थोर श्रम झाला जीवा॥
सकळ जीवाच्या जीवना।म्हणे दासी जनी नारायणा॥
अशा अनेक अभंगातून ती व्यक्त होताना दिसते!
सौ ऐश्वर्या डगांवकर पुणे (क्रमश:)