Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

अण्णा – भाग २

विजय देशमुख जुलै 3, 2026 1 minute read
0
gumohor-water

दोन दिवसांनंतर स्वामी स्वरूपानंद आश्रमात आले. त्याच दिवशी संध्याकाळी त्यांनी मला भेटायला बोलावले.

मी त्यांना नमस्कार करताच ते म्हणाले, “काय मग अण्णा, आहात ना तयार?”

स्वामी स्वरूपानंदांची ही नेहमीची खासियत. ते अचानक काहीतरी प्रश्न विचारायचे आणि आपण मात्र विचार करत बसायचो की ते नेमकं कशाबद्दल बोलत आहेत.

मला वाटलं, स्वामी स्वरूपानंद आता माझ्या घरी येणार असावेत. ते पाच-सात वर्षांपूर्वी माझ्या घरी आले होते. त्यावेळी त्यांना माझं घर आवडलं होतं. पण आता मी घर बदललं होतं आणि एका वन बीएचकेमध्ये राहत होतो. हे त्यांना माहीत नव्हतं.

मी थोडा विचार करून म्हणालो, “स्वामी, कशाबद्दल म्हणत आहात तुम्ही?”

त्यावर ते मोठ्याने हसले आणि म्हणाले, “अरे, तुला 'स्वरूपानंद' म्हणजे काय, हे समजून घ्यायचं आहे ना?”

तरीही माझा गोंधळ काही कमी झाला नाही.

मी विचारलं, “म्हणजे काय?”

त्यावर ते पुन्हा म्हणाले, “अरे काय अण्णा! किती दिवस माझ्या मागे लागला होतास की 'तुम्ही कोण आहात, हे समजून घ्यायचं आहे.'”

मग माझ्या डोक्यात एकदम प्रकाश पडला.

मी म्हणालो, “का नाही! यासाठीच तर मी इतकी वर्षे तुमची सेवा करतो आहे.”

त्यावर स्वामी स्वरूपानंदांनी पुन्हा विचारलं, “अच्छा! म्हणजे तुला हे ज्ञान व्हावं म्हणून तू माझी सेवा करतो आहेस?”

आता मला कळलं की ते माझी खेचत होते. पण थोडंसं वाईटही वाटलं.

मी नाराजीनेच म्हणालो, “नाही स्वामी, तसं नाही. माझा तसा काही उद्देश नाही. तुम्ही देणार असाल तर ठीकच आहे; नाही दिलंत तरीही ठीक आहे.”

माझं उत्तर ऐकून स्वामी आनंदाने म्हणाले, “नाही, आता वेळ आलेली आहे. पण गुरुने जे सांगितलं, ते तसंच करणं अपेक्षित आहे. जमेल ना?”

ते पुन्हा पुन्हा विचारत होते, “जमेल ना? करशील ना?”

मला वाटलं, आता काहीतरी अनपेक्षित किंवा फार कठीण कार्य सांगतील. पण आता माझ्या मनाची तयारी झाली होती. त्यांनी कित्येक वर्षे वेगवेगळ्या प्रकारे माझी तयारी करून घेतली होती. त्यामुळे मी तयार होतोच. आणि आपल्याला काहीतरी ज्ञान मिळणार, या विचाराने मनात एक वेगळाच आनंद दाटून आला होता.

“चला मग.”

तोपर्यंत स्वामी स्वरूपानंदांच्या एका शिष्याने एक पिशवी आणून ठेवली होती. त्यातून त्याने एक ड्रेस बाहेर काढला.

“हा मी घातला आहे ना, तोच.”

गोव्यात अनेक पर्यटक नारळाची झाडे, पाने, फुले अशा नक्षीचे टी-शर्ट किंवा शर्ट आणि पायजमा घालतात. तसाच तो पोशाख होता. तो पाहिल्यावर मला वाटलं, आता हे आपल्याला समुद्रकिनारी फिरायला नेतात की काय!

पण मी पूर्ण तयार होतो.

लगेच ते म्हणाले, “हा ड्रेस घालून तयार हो.”

मी अवघ्या पाच मिनिटांत तयार होऊन आलो.

ते म्हणाले, “आता ठीक आहे. शेजारच्या खोलीत जायचं आणि नृत्य करायला सुरुवात करायची.”

माझं जरा डोकंच चक्रावलं.

एक वेळ कोणी “गाणं म्हणा” असं म्हटलं, तर आपण एखादा अभंग म्हणून टाकू. पण नृत्य करणं म्हणजे जरा कठीणच काम!

मी अविश्वासाने स्वामीजींकडे पाहिलं. ते थोडे रागावले आणि म्हणाले,

“मी जे म्हणेन ते करणार, असं वचन दिलं आहेस तू.”

मी म्हणालो,

“हो स्वामीजी… पण नृत्य आणि मी?”

“अरे, कधी एखाद्या वेळी आनंदात येऊन गाणं गुणगुणतोस ना?”

मी खाली मान घालून “हो” म्हणालो.

ते पुढे म्हणाले, “तसंच नृत्यही ही एक साहजिक प्रवृत्ती आहे. पण मनुष्याने संकोचामुळे तिला जणू कैद करून ठेवलं आहे.

निसर्गात बघ. जेव्हा एखाद्या प्राण्याला किंवा पक्ष्याला आनंद होतो, तेव्हा तो तो आनंद व्यक्त करतो. तो कधी गाण्याच्या स्वरूपात असतो. कोकीळ गातो. साधा कुत्रासुद्धा आनंद झाला की शेपटी हलवतो, स्वतःभोवती गोल गोल फिरतो. पाऊस आला की मोर नृत्य करतो. प्रत्येक प्राणी, प्रत्येक पक्षी आपापल्या पद्धतीने आपला आनंद व्यक्त करतो… आणि माणूस?”

ते मध्येच बोलायचे थांबले.

मी उगाचच विरोध करायचा म्हणून म्हणालो, “स्वामीजी, आता मी बासष्ट वर्षांचा झालो आहे. आता मी नृत्य करायचं म्हणजे…”

माझं वाक्य पूर्ण होण्यापूर्वीच ते म्हणाले,

“अच्छा! म्हणजे मोर म्हातारा झाला, तर तो नृत्य करत नाही का?”

त्यांचा मुद्दा बरोबर होता. खरंच, मनुष्य आनंद व्यक्त करतच नाही; आणि केला तरी अगदी मनमोकळेपणाने तर बिलकूलच नाही.

मी विचार केला, आपण काही आपल्या गावात नाही. इथे आपल्याला कोण ओळखणार आहे? मग थोडंसं नाचायला काय हरकत आहे?

मी म्हणालो, “ठीक आहे स्वामीजी, मी तयार आहे.”

स्वामीजी त्यांच्या एका शिष्याला घेऊन मला शेजारच्या खोलीत घेऊन गेले.

तुला आश्चर्य वाटेल, त्या खोलीत अभंग किंवा भजन नव्हतं. चक्क आशा भोसले यांचं एक चित्रपटगीत सुरू होतं. जे तू आज आलास तेंव्हा चालू असलेलं, “जब छाए मेरा जादू, कोई बच न पाए…”

मला जरा धक्काच बसला.

मी मनात म्हटलं, “चित्रपटाचं गाणं… आणि त्यावर आपण नृत्य करायचं?”

मी पुन्हा एकदा स्वामीजींकडे गेलो आणि विचारलं,

“स्वामीजी, चुकून चित्रपटाचं गाणं लागलं आहे का?”

त्यावर ते म्हणाले,

“अजिबात नाही. ते मुद्दामच लावलं आहे. आणि हे फक्त आजच. उद्यापासून तुला गाण्याचे शब्दही कळणार नाहीत. सध्या भारतीय गाण्यांचा आनंद घे. नंतर आपण अमेरिकन, आफ्रिकन, कोरियन, जपानी अशा विविध भाषांतील गाण्यांवर नृत्य करणार आहोत.”

माझं डोकंच भंजाळून गेलं.

क्षणभर मला वाटलं, कदाचित गुरु जशी शिष्याची परीक्षा घेतात, तशीच स्वामीजी माझी परीक्षा घेत असावेत.

मी लगेच त्या दुसऱ्या खोलीत गेलो. तिथे अजून आठ-दहा जण होते. त्यात स्वामीजींचे काही शिष्यही होते.

त्यांनी गाण्याचा आवाज वाढवला आणि मला नृत्य करण्यासाठी उद्युक्त केलं.

आता नृत्य काही माझा प्रांत नव्हता. त्यामुळे जसं जमेल तसं मी हातपाय हलवायला सुरुवात केली.

साधारण पंधरा-वीस मिनिटं झाली असतील. थोडासा थकवा जाणवू लागला. घामाने अंग डबडबून गेलं.

मी थांबण्याची खूण केली.

तसं त्या शिष्यांनी गाणं बंद केलं आणि आजचा दिवस इथेच संपला, अशी खूण केली. उद्या सकाळी किती वाजता भेटायचं, तेही त्यांनी सांगितलं.

दुसऱ्या दिवशी सकाळी मी ठरलेल्या वेळी स्वामीजींना भेटायला गेलो.

ते हसत म्हणाले, “काय अण्णा, कालचा अनुभव कसा होता?”

खरं तर माझे हातपाय खूप दुखत होते. पण गुरूंना तसं कसं सांगायचं?

मी म्हणालो, “हो… थोडं चांगलं वाटलं. खूप वर्षांनी नृत्य केलं.”

स्वामीजी लगेच म्हणाले, “सवय होईल.”

मला थोडीशी भीतीच वाटली.

“सवय होईल म्हणजे?”

त्यावर स्वामीजी पुन्हा एकदा मोठ्याने हसले.

“तुला काय वाटलं? एक दिवस नृत्य करायचं आणि संपलं? नाही अण्णा! याची तुला सवय व्हायला हवी. आज आपण आफ्रिकन गाण्यांवर नृत्य करणार आहोत. आणि त्या गाण्यांमध्ये जेव्हा जेव्हा कोणी आरोळी ठोकेल, तेव्हा तुलाही तसंच करायचं आहे.”

मला काही कळेना की आपण नेमकं काय करतो आहोत. ही कसली परीक्षा चालली आहे?

पण गुरूंवरील माझी श्रद्धा अजिबात ढळली नव्हती. स्वामीजी सांगत आहेत म्हणजे त्यामागे काहीतरी अर्थ असणार, याची मला खात्री होती.

मी म्हणालो, “ठीक आहे.”

आम्ही पुन्हा कालच्या खोलीत गेलो.

त्या दिवशी लागलेलं संगीत पूर्णपणे वेगळंच होतं. त्यात कोंगो-बोंगोसारख्या ढोलांचा जोरदार ठेका होता. आदिवासी नृत्यासाठी वापरलं जाणारं संगीत जसं असतं, तसाच त्याचा बाज होता.

आपल्या हिंदी चित्रपटसंगीतातही असे प्रकार अनेकदा ऐकायला मिळतात. तुला आठवत असेल, किशोरकुमार अनेक गाण्यांत मध्येच आरोळ्या ठोकतात. मोहम्मद रफींचं “याहू!” तर सर्वांच्या आवडीच आहे. आशा भोसले यांच्या अनेक गाण्यांतही अशा आरोळ्या ऐकायला मिळतात.

स्वामीजींनी सांगितल्याप्रमाणे, गाण्यात जेव्हा जेव्हा आरोळी यायची, तेव्हा इतर शिष्य मला खूण करायचे आणि मग सगळे मिळून मोठ्याने आरोळी ठोकायचे.

पहिल्यांदा मला फारच विचित्र वाटलं. इतकी वर्षे माझा आवाज फक्त श्रीसूक्त, पुरुषसूक्त, महिम्न किंवा मंत्रपठण करतानाच मोठा झाला होता. त्याशिवाय इतक्या मोकळेपणाने ओरडलो होतो, असं मला आठवत नव्हतं.

सुरुवातीला संकोच वाटला. पण थोड्याच वेळात त्यांनी इतक्या वेळा आरोळ्या ठोकायला लावल्या की, आता घसा बसेल की काय, अशीच भीती वाटू लागली.

आणि गंमत म्हणजे… त्यातच मजा यायला लागली!

एकदा त्या संगीताची लय अंगात भिनली की नृत्य करणं खूप सहज वाटायला लागतं. तुला कदाचित वाटत असेल, “आपल्याला नृत्यच येत नाही, मग हे कसं शक्य आहे?”

पण तसं नसतं. एकदा का त्या ठेक्याशी आपलं शरीर जुळलं, की पाय आपोआप हलायला लागतात.

त्या दिवशी सकाळी जवळपास अर्धा तास, मग नाश्त्यानंतर अर्धा तास, जेवणानंतर पुन्हा अर्धा तास… अशा अनेक सत्रांत स्वामीजींनी माझ्याकडून जवळपास साडेतीन तास नृत्याची मेहनत करून घेतली.

संध्याकाळी अंथरुणावर पडलो आणि क्षणात झोप लागली.

आश्चर्य म्हणजे, दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजताच आपोआप जाग आली.

क्रमशः 

#सुरपाखरू #३०दिवसात३० #जुलै२०२६


लेखक

  • विजय देशमुख

    वर्धा येथे भौतिकशास्त्राचा (Physics) प्राध्यापक म्हणून काम करतो. मी तंत्रज्ञानाचा वापर करून नवनवीन पद्धतीने भौतिकशास्त्र शिकवतो. यासोबतच मी एक लेखक, मासिक संपादक, कवी आणि ब्लॉगर सुद्धा आहे. मी एक प्रेरक वक्ता (Motivational Speaker) आणि नाविन्यपूर्ण शिक्षक आहे. सध्या मी भौतिकशास्त्रामध्ये 'एआय' (AI - कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा प्रयत्न करत आहे.

Post navigation

Previous: तलावाचे गाऱ्हाणे
Next: उपभोगशून्य स्वामी
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.