साधारणपणे मी नकारात्मक परीक्षणे (reviews) लिहीत नाही. पण जेव्हा स्व-उत्पादकता (self- productivity) वाढवण्याविषयीचे एखादे पुस्तक आपला प्रचंड वेळ वाया घालवणारे ठरते तेव्हा इतर वाचकांना त्याबद्दल सावध करणे गरजेचे असते.
सदरहू पुस्तकाचं नाव आहे The Productivity Project आणि लेखक आहेत Chris Bailey
लेखकाने उत्पादकतेशी संबंधित टिप्स आणि तंत्रांचा प्रयोग करण्यासाठी आणि ती अधिक प्रभावीपणे आत्मसात करण्यासाठी एक वर्ष खर्ची घातल्याचा दावा केला आहे; पण मला खेदपूर्वक सांगावेसे वाटते की, त्यांनी इतके कष्ट घ्यायला नको होते!
या पुस्तकात काही मोजक्याच उपयुक्त गोष्टी आहेत, ज्या इतर पुस्तकांमध्ये (उदा. डेव्हिड ॲलन यांचे “Getting Things Done') अधिक चांगल्या प्रकारे आणि सविस्तरपणे मांडल्या गेल्या आहेत; किंवा त्या गोष्टी अगदी सर्वसामान्य आहेत (जसे की मनःशांतीसाठी ध्यान करा , महत्त्वाची कामें पुढे ढकलणे टाळा, इत्यादी).
या काही निरुपद्रवी -आणि इतर बराचश्या निरुपयोगी – सूचना बाजूला ठेवल्या तरी पुस्तकातील अनेक कल्पना अगदीच हानिकारक आहेत. त्यापैकी काही गोष्टींवर चर्चा करूयात …
झोपताना फोन बंद करण्याचा सल्ला लेखक देतात. (खरंच!)
विचार करा – आपल्या पालकांना आपल्याला फोन करायचा असेल तर? किंवा एखाद्या मित्राला मध्यरात्री तातडीने मदतीची गरज असेल तर?
लेखक दिवसातून केवळ तीनदाच ईमेल तपासा, तसे करण्यास स्वतःला 'भाग पाडा ' असे सांगतात.
ईमेलचा जर इतका त्रास होत असेल, तर मुळात जिथे ईमेल हेच संवादाचे प्रमुख साधन आहेत अशा क्षेत्रात काम करावे की नाही, याचा तुम्ही पुनर्विचार करायला हवा.
लेखक पुढे आपल्याला सांगतात – एका आठवड्यात किती वेळ मिटींग्समध्ये घालवायचा हे आधीच ठरवा आणि तुम्ही ठरवलेल्या मर्यादेनंतर (समजा, ४ तास) संपल्यावर जर कोणतीही नवीन मिटिंग आलीच तर उपस्थित राहण्यास सपशेल नकार द्या!
पटतंय का हे? कल्पना करा – तुम्ही एखादी मिटिंग नाकारताय आणि बॉस किंवा क्लाएंटने कारण विचारल्यावर तुम्ही त्याला मोठ्या तोऱ्यात सांगत आहात की मी त्या बैठकीला उपस्थित राहीलो नाही कारण “ते माझ्या साप्ताहिक बैठकांच्या मर्यादेबाहेर आहे”.
याची परिणती कशात होईल – सांगा बरं!
ईमेल, स्मार्टफोन यांच्या अती-वापरामुळे आणि जरुरीपेक्षा जास्त मिटींग्समुळे कामें खोळंबतात, वेळ वाया जातो, हे नाकारता येणार नाहीच; परंतु जर एखादे 'उत्पादकता वाढवण्याचे तंत्र' केवळ या गोष्टींचा वापर पूर्णपणे बंद करण्यावर अवलंबून असेल, तर मात्र त्या तंत्राचीच बारकाईने पुनर्तपासणी करणे गरजेचे आहे.
मी ही केवळ तीन उदाहरणे दिली आहेत. या पुस्तकात अशा अनेक गमती-जमती आहेत, आणि आव मात्र असा की 'मी फार महत्त्वाचे काहीतरी सांगून राहिलोय, नीट लक्ष द्या!'
या अशा दिशाभूल करणाऱ्या पुस्तकांमुळेच 'उत्पादकता' (productivity) या विषयावरील साहित्याची एकूणच प्रतिमा मलीन झाली आहे .