' चोख्याची महारी 'सोयराबाई.१४व्या शतकांत शूद्र घरात जन्माला आलेली ही स्त्री
चोखोबा महाराची पत्नी असल्याचा अभिमान
' चोखयाची महारी 'या नावाने अभंगाच्या शेवटी स्वतःच्या नावाचा उल्लेख करते.ज्ञानाची आस बाळगते,उघड्या डोळ्यांनी समाजाचा शोध घेता घेता स्वतःचाही शोध घेते आणि जे वाटतं ते परखडपणे काव्यातून व्यक्त करते.
त्यांचे अभंग म्हणजे त्यांच्या अंतरात्म्याचा आवाज आहे.अंतर्बाह्य चाललेला तिचा वाद आणि त्यातून गवसलेले अध्यात्माचे तेजस्वी कण म्हणजे सोयराबाईंचे अभंग.
' अवघा रंग एक झाला।रंगी रंगला श्रीरंग॥
मी तू पण गेले वाया।पाहता पंढरीच्या राया॥
तेराव्या शतकात मंगळवेढ्याच्या महारवाड्यात जन्मलेल्या चोखा मेळ्याने विठ्ठलाच्या पायाशी जोहार मांडला.जातिव्यवस्थेला चूड लावणारा हा पहिला संत होता.त्याच्याच पावलांवर पावलं
टाकत त्यांची पत्नी सोयराबाई पांडुरंगाच्या भेटीला जायला निघाली .टाळ मृदुंगाच्या नादामध्ये स्वतःला हरवून अध्यात्माच्या रंगात
रंगून गेली .विठूमाऊलीच्या भेटीची आस तिच्या मनात पाझरलीआणि नकळतच तिच्या तोंडातून साक्षात सरस्वती प्रगटली…
'नाही भेदाचे ते काम।पळोनी गेले क्रोध काम॥
देही असुनी तू विदेही।सदा समाधिस्थ पाही॥
पाहते पाहणें गेले दुरी।म्हणे चोख्याची महारी॥'
संसाराचे चटके सोसत ती चैतन्याशी लीन होते.त्यामुळे तिच्या मनातील जाती पंथाचे ,गरीब श्रीमंतीचे भेद गळून जातात आणि एकत्वाचं दर्शन तिच्या पुढील अभंगातून होतं
' माय तू माउली अनाथाची देवा।
धांवे देवाधिदेवा लंवलाहे॥
पतितपावन नाम गाजे त्रिभुवनी।
भक्तशिरोमणी तुम्ही देवा॥
असे अनेक अभंग त्यांनी रचले.अत्यंत साध्या सोप्या आणि रसाळ भाषेतील अभंगातून त्यांनी फक्त स्वतःचेच नाही तर त्या काळातील दलित
समाजाचे दु:ख वेदना घुसमट व्यक्त केली.वेळ पडल्यावर त्या देशाशी पण वाद घालताना दिसतात.त्या देवाला विचारतात ,' देहात विटाळ वसतो तर मग देह कोणी निर्माण केला?'
त्या म्हणतात एकवेळ देह अपवित्र किंवा प्रदूषित असू शकतो पण आत्मा कधीही अशुद्ध नसतो.त्या म्हणतात,
' देहासी विटाळ म्हणती सकळ।
आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध॥
देहीचा विटाळ देहीच जन्मला।
सोवळा तो झाला कवण धर्म॥
संत ज्ञानदेवांच्या मांदियाळीतील सर्वच संतांनी,
' आवडीने भावे हरिनाम घेसी 'असे आपल्या अभंगातून सांगितले आहे.परंतु सोयराबाई,
' आधी केले मग सांगितले 'या उक्तीप्रमाणे आपल्या कृती,उक्तीतून समन्वय साधत सोयराबाई आधी नामाचा छंद लावून घेणे.आत्मसुखाचा आनंद आपल्या रोमारोमात भरून घेणे.त्यात संसारात पावलोपावली वाट्याला येणा-या यातना,अवहेलना विसरून मन शांत करून नामसंकीर्तनात रमते.ती म्हणते
' शीण वाटते मना।नारायणा न पाहता॥
वाया आचार विचार।सदा मलीन अंतर॥
सोंगाचे ते सोंग।दावी रंग कथेचा॥
परधनी सदा मन।वरी दावितसे डोलून॥
जसा नर तो दुराचारी।म्हणे चोख्याची महारी ॥
परमेश्वरा प्रती असलेली निष्ठा ,समर्पणाची भावना किती उच्च कोटीची आहे हे दिसून येते.
खरं तर मेलेली जनावरं ओढून नेण्याचं अत्यंत मनाला क्लेश देणारं काम केवळ जन्मानं वाट्याला आलेल्या संत चोखोबा करतात हे पाहून त्याचं दुःख त्याबरोबर घरी अठराविश्व दायिद्र्य आणि समाजाकडून मिळणारी तुच्छतेची वागणूक यामुळे आक्रंदणा-या दुख-या मनावर फुंकर घालण्याचे काम त्यांच्या
अभंगानी आणि पतीला लागलेल्या विठ्ठल भक्तीचा लळा त्यांनी जाणला.प्रपंचाचा भार सोसत सोयराबाईंनी विठलनामाशी स्वतःला जोडलं आणि अर्धांगिनीचा धर्म निभावल्या.
' जोडतो तो धर्म,नि तोडतो तो अधर्म 'असं म्हणतात मग सोयराबाईंनी हेच तत्त्व स्वीकारून
सर्वार्थानं अध्यात्म अंगीकारून समाजाला आपल्या सहज सुंदर काव्यातून आत्मानुभव कथन केला.
' सोयरा म्हणे माझा जीवप्राण तुम्ही।
आणिक तो आम्ही दृढ धरा॥'
(क्रमशः)