” जशा नाण्याला दोन बाजू असतात तशा प्रत्येक गोष्टीला किमान दोन दृष्टीकोन असतात. सुख दुःख, फायदा तोटा, अंधार प्रकाश, चूक बरोबर चढ उतार अशी उदाहरणं बरीच देता येतील आणि या दोन विरोधाभासी शक्तीत आपण घड्याळतील लंबकाप्रमाणे जीवन व्यतित करीत असतो.”
कालच्या “माघार” या लेखात मी माघार घेणारे बरोबर असं लिहिले खरे.. पण मनात एवढा धोका असताना तो गिर्योरोहक वर का गेला? हा प्रश्न मनात अनुत्तरित असताना आरामखुर्चीत बसल्याबसल्या मी निद्रेच्या आधीन झालो.
डोळ्यासमोर धूसर आकृती आली डोळ्यावर काळे सनग्लासेस, अंगावर थंडी पासून बचाव करणार पोशाख पायामध्ये बर्फात चालण्यासाठी असलेले खिळे असलेले बूट.. असा काहीसा पोशाख असलेली व्यक्ती समोर आली आणि डोळयांवरचा काळा चष्मा काढताच ते थिजलेले पण हसरे डोळे बरच काही सांगून गेले. आणि ती व्यक्ती बोलू लागली.
” ओळखले नसेलच मला तू… मी रॉबर्ट डिसिल्वा, न परतण्यासाठी एव्हरेस्ट शिखरावर पोहचलेला आमच्या टीम मधील एकमेव गिर्यारोहक. वेळेवर माघार घेणारे सर्वाना बरोबर वाटत असले तरी मी आज माझी बाजू मांडतो. “
तो त्याची बाजू सांगू लागला,
“स्विस मधील झुरीच या गावाजवळील उंच डोंगरावर वसलेल्या एका खेड्यातील माझा जन्म. घरासभोंवती असलेले बर्फाचे डोंगर आणि खोलवर वाहणारी निळीशार नागमोडी नदी. त्यामुळे उंच चढणे व उतरणे अंगात भिनले होते. कॉलेजला गोरीपान सुंदर गालावर गोड खळी असलेल्या एमाशी पहिल्याच दिवशी ओळख झाली. पहाताक्षणी मी प्रेमात पडलो तिच्या. लव्ह ऍट फर्स्ट साईट प्रमाणे. आमच्या आवडीनिवडीही एक होत्या.दोघांना गिर्यारोहंणाची जबरदस्त आवड असल्याने आम्ही युरोपातील अनेक हिमशिखरे सोबत सहज सर केलेली. आम्ही एकमेकांच्या प्रेमात मजेत होतो. “मेड फॉर इच अदर” अशीच आमुची जोडी होती. 2025 ला मागील वर्षी सागरमाथा म्हणजे एव्हरेस्ट जोडीने जाऊन सर करण्याचा आमचा मानस होता आणि आल्यानंतर आमच्या या निर्मळ प्रेमाचं रूपांतर विवाहबंधनात करणार होतो. आम्ही अगदी विवाहाची तारीख पण पक्की केली होती ती डिसेंबर एकवीसची.
काठमांडूला निघायच्या दोन दिवस आधी माझी आई हार्ट अटॅक येऊन अचानक सिरिअस झाल्याने माझे नेपाळला जाणे मला रहित करावे लागले. एमाला विमानतळावर सी ऑफ मी करायला गेलो होतो. मी येणार नसल्याने तीच चेहेरा उतरला होता.
एमा आता एकटी निघाली होती. रोज तिचे व्हाट्सअप बोलणे सुरु होते, माझी उणीव तिला क्षणोक्षणी जाणवत होती आणि शिखरावर पोहचताना अंतिम टप्प्यात दोर तुटून खोल दरीत तिचा जीवन प्रवास संपल्याची वार्ता अचानक मला फोनवर आली… विश्वास बसत नव्हता.. माझे अश्रू थांबत नव्हते आमच्या भावी आयुष्याचे स्वप्न क्षणात उध्वस्त झाले होते. माझे आई वडील पण वर्षभरात गेले. भाऊ बहीण वा जवळचे नातेवाईक कोणी नसल्याने मी खऱ्या अर्थाने एकटा पडलो होतो.
एमा बरोबर घालवलेले सुखाचे दिवस सतत आठवत होते.मनाने मी उध्वस्त झालो होतो. आई बाबांच्या आजारपणात बरेच पैसे खर्च झाले होते. आता मनात फक्त एकच ध्यास होता एमाला भेटण्याचा.. पैसे नव्हते म्हणून घर विकून पैसे जमा केले आणि या एव्हरेस्टमोहिमेसाठी पुंजी जमा केली. एमाने जिथे कायम विश्रांती घेतली तिथं जाऊन त्या जागेवर एकदा भेटण्याची इच्छा पूर्ण होणार होती.
ती शेवटची रात्र मला आठवते थंड जोरदार वारे आणि वरतून भुरभूर पडणारा बर्फ.. आणि एमाला भेटण्याची ओढ मला झोपू देत नव्हती. उद्या सकाळी एव्हरेस्ट शिखरावर पोहचून माझी इच्छा पूर्ण होणार होती. अचानक सकाळी नऊ वाजता आमच्या ग्रुपमधील सर्वांनी परत फिरण्याचा निर्णय घेतला, सर्व मागे बेस कॅम्पला निघाले पण तो निर्णय मी अमान्य करून पुढे निघालो. माझी एमा मला बोलावत होती तिला भेटण्यासाठी, तिच्या शिवाय माझ्या जीवनाला अर्थ नव्हता.
तिच्या ओढीने अत्यंत मी एव्हरेस्ट शिखर सर केले खरे पण काळे भिन्न आकाश संकटाची चाहूल देत होते…बर्फाचे वादळ जोरदार सुरु झाले होते . अचानक बाजूच्या डोंगरावरचा बर्फ खाली घसरला पाहतो तर एका मानवी आकृती पालथी पडलेली दिसत होती तिला जाऊन बघितलं ती माझी एमा होती.. वर्षांपासून हिमाची चादर घेऊन गोड झोपलेली. मोहक चेहेरा अगदी तसाच होता गालावर हास्य होते.जणू नुकतीच ती झोपली आहे असे वाटत होते. तिला मी मिठी मारली आणि कडकडाट झाला वरचा डोंगरकडा कोसळत होता आणि आम्ही दोघे एकत्र एकमेकांच्या मिठीत दूरच्या प्रवासाला निघालो होतो. अखेर दैव माझ्यावर प्रसन्न झाले होते, माझ्या जीवनाचे सार्थक झाले होते. मी एव्हरेस्ट शिखरावर चढण्याचा निर्णय चुकलेला नव्हता तर तो शंभर टक्के बरोबर होता.”
ओढ प्रेमाची खरी जेव्हा
चूक बरोबर कळतं नाही
दोन जीव ते एक असे हो
जीवाची कुणाला पर्वा नाही
प्रेमात माफ गुन्हे सर्वे
जसे युद्धातही म्हणता रे
अडीच अक्षरी प्रेम उत्कट
जीवास जीव ते हो देणारे
ओढ भेटीची सदा निरंतर
देवाकडे एक जरी गेला रे
जोडीदाराविना जीवन व्यर्थ
सुख आनंद तो हरवतो रे..
“अहो उठा दुपारी कसले झोपताय?”
अशी सौ ची हाक आल्यावर या स्वनातून जागा झालो. नकळत पाचव्या लेखासाठी विषय मिळाला होता.
हेमंत नाईक