लक्ष्मणराव फोनवर बोलतात, अरे बोला कुळकर्णी मास्तर! एवढ्या सकाळी कशी आठवण केली.
आज दुपारी वेळ आहे का लक्ष्मणा, मी आणि यशोदा येण्याचा विचार करतोय.
विचार काय करताय मास्तर, या की..
हे नाही विचारणार का लक्ष्मणा मला, काही विशेष निमित्य की असेच येणार म्हणून.
कुळकर्णी जी, आपण असे का बोलताय? आपण असे बोलणे म्हणजे आम्ही आपला अपमान केल्यासारखा होय. आपण विना निमित्याचे या की काही निमित्याने .. आपले पाऊल आमच्याकडे पडणे म्हणजे मोठी गोष्ट असते. आणि मित्र आहात तुम्ही आमचे. लक्ष्मणराव मोठ्या गंभीरपणे कुळकर्णी मास्तरांना म्हणतात. कारण निमित्य हा शब्द ऐकून त्यांना आश्चर्य वाटलेले असते.
अरे मित्रा गमतीने बोललो मी, झाले असे की, काल तू घरी गेलास आणि एक फोन आला मला. ज्यांचा तो फोन होता ते माझे मित्रच आहेत. त्यांच्या ओळखीने एक स्थळ आले आहे. मी कालच सांगणार होतो तुला. पण म्हटले सकाळीच फोन लावायचा.
तर गुरुजी, या निमित्याने आम्ही येत आहोत!
अरे वाह कुळकर्णी मास्तर, क्या बात हैं.. तुम्ही माझ्या मुलाचे लग्न जुळवूनच दम घ्याल असं वाटत आहे. लक्ष्मणराव मोठ्या आनंदाने मास्तरांना म्हणतात.
चला लक्ष्मण गुरुजी, दुपारी येऊ तेव्हा सविस्तर बोलूया. असे म्हणून मास्तर फोन ठेवतात.
इकडे लक्ष्मणरावांना फार आनंद झालेला असतो. ते ही बातमी सुमनबाईंना सांगतात तेव्हा त्यांनाही आनंद होतो. आता काही चांगलं होऊ दे रे पांडुरंगा! असे म्हणून त्या देवासमोर हात जोडतात.
संजय त्याच्या दुकानाच्या हिशेबाच्या कामात असतो. तेव्हा सुमनबाई त्याला हे सर्व सांगतात तेव्हा त्याला सुद्धा आनंद होतो.
आई, बाबा तुम्ही दोघे काय ते कुळकर्णी काका काकूंसोबत बोलून घ्या. जेव्हा ह्या सर्व गोष्टीमध्ये माझी गरज पडेल तेव्हा मी नक्की उपलब्ध होईल. असे म्हणून तो पुन्हा त्याच्या कामाला लागतो.
अशाप्रकारे तिघेही आपापल्या कामात व्यस्त होतात. नेहमीप्रमाणे संजय त्याच्या दुकानावर जातो. इकडे लक्ष्मणराव आणि सुमनबाई नेहमीच्या रूटीन प्रमाणे सर्व आटोपतात.
साधारणपणे दुपारचे तीन वाजलेले असतात तेव्हा कुळकर्णी मास्तर आणि त्यांची पत्नी गुरुजींकडे येतात.
लक्ष्मणराव मोठ्या आदराने त्यांचे स्वागत करतात. त्यांच्या बऱ्याच गप्पा चालतात आणि ज्या कामानिमित्य कुळकर्णी आलेले असतात तो विषयसुद्धा ते बोलायला लागतात.
कुळकर्णी मास्तर सांगायला सुरुवात करतात.
सुमन वहिनी माझे एक मित्र असतात बाजूच्या शहरात. त्याच्या एका जवळच्या मित्राची मुलगी आहे. त्यांच्या मोठ्या मुलीचं लग्न झालेलं आहे. आता लहानीचं त्यांना करायचे आहे. तसेच कालच मित्राकडून जेव्हा मला तिच्या कुटुंबाविषयी माहिती कळली तर लक्षात आले की, तिच्या वडिलांशी माझी एका कार्यक्रमात भेट झालेली होती. अजय समुद्रपूरकर नांव त्यांचे. मुलगी जरा सावळी आहे पण दिसायला छान आहे, असे तो मित्र सांगत होता. एकदिवस ठरवूया संजयच्या वेळेनुसार कधी जायचे ते.
काय म्हणतोय लक्ष्मणा..
हो हो मास्तर, नक्की जाऊया. संजय घरी आला की त्याच्यासोबत सुद्धा बोलतो मी हा विषय. असे म्हणून नंतरही बऱ्याच गप्पा, नंतर नाश्ता आणि चहाचा आस्वाद चौघेही घेतात. काही वेळाने यशोदा आणि मास्तर त्यांच्या घरी जायला निघतात.
सर्व चर्चेमध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्ष्मणरावांच्या लक्षात येते, ती म्हणजे सुमनबाईंच्या चेहऱ्यावरचे हावभाव काही ठीक नसतात. कारण फक्त चर्चेतून तिने काहीतरी गृहीत धरलेले असावे हे त्यांच्या लक्षात येते.
लक्ष्मणराव हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतात पण संजय आल्यावर आपण बोलूया असे म्हणून त्या टाळतात.
संध्याकाळी संजय घरी आल्यावर नेमके काय होणार, सुमनबाईंच्या मनात काय आहे. हे पुढील भागात.