कालच “मनपाखरू” हा सुंदर लेख वाचण्यात आला.. आणि मग मलाही मनावर लिहिण्याचा मोह आवरता आला नाही आणि मग माझ्या मनाने घेतलेला “मनाचा शोध” लिहितो आहे.
मनावर लिहिणं एक खरोखर आव्हान आहे. कोणत्या क्षणी ते कसे वागेल हे सांगता येत नाही अगदी गूढ आहे ते… मनावर जो काबू ठेवू शकतो तो योगी बाकी भोगी. मन जिंकलं की सर्व जग जिंकल्यासारखं आहे.
“असेल जर मनात
शक्य सर्व जगात!!”
असे एक सुभाषित आज वाचले. त्यात खरंच तथ्य आहे,
“मनाला हरु देऊ नका; कारण प्रत्येक विजयाची सुरुवात मनातूनच होते. कार्य सिद्धिस जाण्यासाठी दोन्ही हात मजबूत सरले की सहज कार्य होते असे प्रत्यक्षात दिसत असले तरी त्या मागे करता करवितेअसतें ते अदृश्य मन “
मनाचे विश्लेषण कवियत्री बहीणाबाईंनी खालील कवितेत सुरेख केले आहे.
मन वढाय वढाय
उभ्या पीकांतलं ढोर,
किती हांकला हांकला
फिरी येतं पिकांवर.
मन मोकाट मोकाट
त्याले ठायीं ठायीं वाटा,
जशा वार्यानं चालल्या
पान्यावर्हल्यारे लाटा.
मन लहरी लहरी
त्याले हातीं धरे कोन?
उंडारल उंडारलं
जसं वारा वाहादन.
मन जह्यरी जह्यरी
याचं न्यारं रे तंतर,
आरे इचू, साप बरा
त्याले उतारे मंतर !
मन पांखरू पांखरूं
त्याची काय सांगूं मात ?
आतां व्हतं भुईवर
गेलं गेलं आभायांत.
मन चप्पय चप्पय
त्याले नहीं जरा धीर,
तठे व्हयीसनी ईज
आलं आलं धर्तीवर.
मन एवढं एवढं
जसा खाकसचा दाना,
मन केवढं केवढं ?
त्यांत आभाया मायेना.
देवा, कसं देलं मन
आसं नहीं दुनियांत !
आसा कसा रे यवगी
काय तुझी करामत !
देवा, आसं कसं मन ?
आसं कसं रे घडलं
कुठे जागेपनीं तुले
आसं सपन पडलं !
खान्देशमधे जळगाव जवळ असलेल्या असोदा येथील कवियत्री बहिणाबाईंनी त्याच्या कवितेत जादुई अद्भुत मनाची अनेक रूप त्याच्या गुण व दोषासह अगदी चपखल दाखले देऊन समजावली आहेत.
बहिणाबाईं या कवितेत म्हणतात ईश्वराला पडलेले सुंदर स्वप्न म्हणजे मन.या अद्भुत व जादुई निर्मिती बद्दल त्याला त्या यवगी अर्थात किमयागार म्हणून कौतुक करतात.
मनाने कसे चिंतावे? कसे वागावे?… याचे मार्ग आणि अचूक वर्णन रामदास स्वामींनी “श्री मनाचे श्लोकात ” केले आहे. एकेक श्लोक लेखनाचा मुख्य विषय होऊ शकतो.
मन आपल्या सर्वाकडे आहे पण अजूनही मन म्हणजे नेमके काय? त्याची अनेक बदलती रूप आपण अनुभवतो कधी प्रेमळ तर कधी रागीट एखाद्या बाबतीत हळवा असलेला माणूस दुसऱ्याशी कठोर वागू शकतो. मनाच्या रचने बाबत आपण सर्व अजूनही अनभिज्ञ आहोत.
“मन जिथे सकारात्मक असतं, तिथे यशाचा मार्ग आपोआप तयार होतो”
त्यासाठी नेहमी सकारात्मक राहणे फार महत्वाचे आहे. तिस लेख पूर्ण होतील का? हा नकारात्मक विचार नको. तिस काय रोज मी काहितरी लिहू शकेल ही सकात्मकता हवी.मी लिहिलेलं कोणी वाचेल का? ते आवडेल का? अशा नकारात्मकता मनात येऊ देऊ नये.
“अदृश्य मन हेच कर्ता करवितेआहे!”
हे सर्व आपण मान्य करत असलो तरी आधुनिक शास्त्रात मन नेमके काय? याबद्दल अजूनही पक्का निष्कर्ष नाही. विश्वाच्या शोधा प्रमाणे अथांग मनाचा शोध कायम सुरु राहणार आहे…. अगदी अनादी पासून अनंता पर्यंत!!
*”मन”* हीच कल्पना मनात घेंवून मला मनावर सुचलेल्या या ओळी लिहून थांबतो.
“मन” आहे खरा कर्ता
बाकी सर्व आहे खोटे..
नाही अशक्य या जगीहो
पूर्ण ते जिद्दी मन करे !!
शरीर मनाचे कह्यात
पोटापुरते हवे त्याला
चोचले मनाचे असता
फाईव्हकोर्स भोजनाला!!
तन मन दोनआहे रूप
दृश्य एक दुजे अदृश्य
अदृश्यरूपी देव तोही
वसतो तोही या मनात !!
सुंदर गौर काया नेटकी
मनातं ज्यांच्या काळेबेरे
जन्म त्याचा झाला व्यर्थ
निर्मळ मनी खरे देखणे!!
जसा विचार तसा आचारे
हृदयी त्याच्या वसे ईश्वर
मनात आहे एक गोष्ट
सांगे दुजी..तो लबाड!!
मन अचूक.. काय ते रे
सांगून गेल्या बहिणाबाई
अज्ञात अनंत ते विश्वासम
शोध मनाचा रोज तेच घेई !!
मनात येता लिहिले सत्वर
साहित्याच्या या दिंडीवर
अंतर्मन खरं नित्य बोलते
खुशाल विचारा त्याला प्रश्न
!!
✍️हेमंत नाईक
7 जुलै 26
#सुरपाखरू#३०दिवसात३०#प्रयोग जुलै २०२६