तूच हवी
सकाळपासून सहा वर्षाचा राजू आपल्या आईची रधिकेची वाट पहात होता.आज तो शाळेत देखील गेला नव्हता.त्याला कारणही तसेच होते.आज त्याची आई छोट्या बहिणीला घेऊन येणार होती.गाव छोटं असल्याने राधिका बाळंतपण साठी माहेरी कोल्हापूरला गेली होती.दोन महिन्याच्या सानुलीला घेऊन ती येणार होती.सर्व घरात आनंदाचे वातावरण होते.घरात मुलगी नसल्याने राधिकेच्या सासूबाई पण खूप उत्साहाने तयारी करत होत्या .राजूची लगबग सुरू होती .त्याचे बाबा मोहन पण वाट पहात होते.आई नसतांना राजूने तिची खूप चित्रं काढली होती.आज तर त्याने कमालच केली होती .आपल्या छोट्याशा बुद्धीने त्याने 'आईच्या कडेवर बाळ आणि तिचे बोट पकडून तो उभा आहे 'असं चित्र काढलं होतं.त्यात रंग भरले होते.ते चित्र कधी एकदा आईला दाखवतो असं त्याला झालं होतं.तो सारखा आतबाहेर करत होता.त्याची आजी त्याला न्याहारीसाठी बोलवत होती पण त्याने एकच धोशा लावला होता की,
' आई बरोबरच खाईन तीच मला खाऊ घालेल .' अचानक मोहनला कुणाचा तरी फोन आला आणि तो त्याच्या बाबांना घेऊन बाहेर गेला.घरात एकदम शांतता पसरली होती.कुणीच काही बोलत नव्हते.राजू लहान असल्याने त्याला काहीच कळत नव्हते की अचानक काय झाले.हळूहळू बाहेरच्या अंगणात लोक गोळा व्हायला सुरुवात झाली होती.हळुहळु आवाजात कुजबुज सुरु होती.राजू सगळ्यांना त्याने काढलेले चित्र दाखवत होता.ते पाहून सर्वांच्याच पोटात गलबलून येत होतं.इतक्या लहान मुलाला काय सांगणार..
राधिका तिच्या आईबरोबर सासरी येत असताना तिच्या बसचा अपघात झाला होता. बस दरीत कोसळली होती आणि त्यातील सर्व लोकांचा जागच्या जागीच मृत्यू झाला होता.त्यात राधिका तिची आई आणि दोन महिन्याची मुलगी पण गेली होती.मोहन आणि त्याचे बाबा तिथेच गेले होते.दरीत पडलेल्या मृत लोकांना कसंबसं बाहेर काढून त्यांच्या मृतदेहाची ओळख करून नातेवाईकांना सोपविण्यात आले होते.
खूप वेळ झाला म्हणून छोट्या राजूचा जीव अगदी रडवेला झाला होता.थोड्याच वेळात अँम्ब्युलन्स मधुन पांढ-या चादरीत लपेटलेले राधिकेचे शव बाहेर काढण्यात आलं.अचानक रडारडी सुरू झाली.राजूने पुढे जाऊन पाहिलं तर त्याला पांढरी चादर पांघरलेली आई दिसली. त्याला वाटलं ती झोपली आहे.तो तिच्या जवळ जाऊन तिला उठवू लागला .' आई
उठ ना मी बघ तुझ्यासाठी एक चित्र बनवलं आहे.'असं म्हणून ते चित्र तिला दाखविण्याचा प्रयत्न करू लागला.पण आई उठत नाही असं पाहून त्याने भोकाड पसरला.सर्वांनी त्याला खूप समजावलं पण तो काही केल्या ऐकेना.त्याने फक्त ' तूच हवी 'म्हणून गोंधळ घातला.जवळपास एक दोन तास तो रडत होता.शेवटी त्याला कसंबसं आत नेलं.त्याचा. आकांत पहावत नव्हता.तिथे उभे असणा-या प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रू वहात होते.परंतु नियती पुढे सर्वच हतबल होते!
तिकडे राजू झोपेतही राधिकेची आठवण काढत होता 'आई मला तूच हवी करून हुंदके देत होता.रडून रडून त्याचे डोळे सुजले होते.गालावरचे अश्रू सुकलेहोते.थोड्या वेळाने त्याची आजी आत आली तिने त्याला उठवायचा प्रयत्न केला पण तो उठत नव्हता. त्याच्या अंगात एकशे चार डिग्री ताप भरला होता.ताबडतोब डॉक्टर आले होते.पहाताच त्यांनी सर्वांना सांगितले त्याला आईच्या जाण्याचा खूप धक्का बसला आहे .काही दिवसांनी ठीक होईल.त्यांनी ताप उतरण्याचे औषधे लिहून दिले होते.पण राजूचा ताप काही केल्या उतरत नव्हता .अखेर त्याला बसने कोल्हापूरच्या हॉस्पिटलमध्ये नेण्याचे ठरवले.राजेश आणि त्याची आजी बरोबर होते.अचानक घाटात बस बंद पडली.सर्व यात्रेकरू खाली उतरले.राजेश पण राजूला घेऊन खाली उतरला.पहातो तर काय त्याच जागेवर बस बंद पडली होती जिथे राधिकेच्या बसचा ॲक्सीडेंट झाला होता.त्याच्या काळजात धस्स झाले.राजू कुठेच दिसत नव्हता.त्याने आईला विचारले राजू कुठे आहे पण त्या म्हणाल्या की तो इथेच उभा होता.त्याने 'राजू -राजू' म्हणून खूप आवाज दिला परंतु काहीच प्रतिसाद मिळाला नाही.तो राजूला शोधू लागला . तेवढ्यात त्याला राजू रस्त्याच्या कड्यावर उभा असलेला दिसला.राजेश तिकडे जाऊ लागला तेवढ्यात ,राजू खाली दरीकडे बघून ओरडला,
'' बाबा बाबा इकडे या मला आई सापडली ,ती बघा खाली उभी आहे .मला तिच्याकडे जायचं आहे .आई तू कुठे गेली होती?मला तूच हवी आहे ये ना लवकर “असं म्हणून त्याने दरीत झेप घेतली.राजेशने दरीकडे धाव घेतली.परंतु लोकांनी त्याला पकडून ठेवले.पण राजेश वेड्यासारखा ,”राजू तू कुठे आहेस बाळा मला तू हवा आहेस रे.आता मी कुणाकडे बघून जगू? “
असं म्हणून त्यानेही दरीत उडी घेतली!