नटसम्राट
' नटसम्राट ' हे कुसुमाग्रज (वि वा शिरवाडकर)यांनी लिहीलेले मराठी साहित्यातील एक अजरामर नाटक आहे.निवृत्तीनंतर एका महान कलाकाराच्या वाट्याला येणारे दु:ख , कौटुंबिक उपेक्षा आणि वृद्धत्वातील वेदना या विषयावर प्रकाश टाकणारे नाटक आहे.१९७४ मध्ये या नाटकाला साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
नटसम्राट हे नाटक विल्यम शेक्सपिअरच्या
' किंग लियर ' या प्रसिद्ध शोकांतिकेपासून प्रेरित असले तरी त्याचे कथानक पूर्णपणे स्वतंत्र आहे.
या नाटकाचा पहिला प्रयोग २३डिसेंबर १९७० रोजी मुंबईतील बिर्ला मातोश्री सभागृहात सादर करण्यात आला होता.
या नाटकाचे प्रमुख पात्र ' गणपतराव बेलवलकर '(आप्पासाहेब) आहेत.ते मराठी रंगभूमीवरील अत्यंत यशस्वी आणि 'नटसम्राट 'ही पदवी मिळवलेले एक महान नट असतात.ही भूमिका डॉ श्रीराम लागू यांनी अतिशय जीवंतपणे वठवली होती.आयुष्यभर कलेसाठी जगणारा हा नट निवृत्तीनंतर आपल्या मुलांच्या स्वाधीन आपली सर्व संपत्ती करतो.मात्र त्याच मुलामुलीकडून आणि सुनेकडून होणारा अपमान दुर्लक्ष, उपेक्षा आणि एकटेपणा यामुळे अप्पासाहेबांवर रस्त्यावर येण्याची वेळ येते.म्हातारपणात स्वाभिमान जपणारा आणि वारंवार रंगभूमीची आठवण काढत वेडेपणाच्या छायेत जगणारा हा कलाकार शेवटी अत्यंत दु:खद अवस्थेत जगतो.
हे नाटक मला यासाठी आवडते की यातील संवाद डॉ श्रीराम लागू आणि यांचा अभिनय हा अभिनय नसून त्यांनी ती भूमिका प्रत्यक्ष जगल्याचा प्रत्यय आपल्याला या नाटकात येतो.असाही ऐकीवात आहे की या भूमिकेचा ताण आल्याने त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांनी या नाटकाचे प्रयोग करणं बंद केलं होतं.अभिनय काय असतो याचं प्रशिक्षण सर्व कलाकारांनी हे नाटक पाहून घेतलं पाहिजे.अतिशय जीवंत आणि सशक्त अभिनय.या नाटकातील संवाद आपल्या काळजाला छेदून जातात.' कुणी घर देता का घर?' कुणीही ,कुणीही कुणाचं नसतं ',जगा आणि जगू द्या 'तर त्यांच्या पत्नीच्या तोंडातील वाक्य ' सरकार समोरचं ताट द्यावं पण बसायचा पाट मात्र कुणाला देऊ नये ' यासारखे संवाद हृदय विदीर्ण करतात.' नटसम्राट 'हे नाटक केवळ एका नटाची कथा नाही ,तर वृद्धत्वातील कटू वास्तव आणि मानवी संबंधांचा आरसा आहे.असं म्हणतात यानंतर लोकांनी निवृत्तीनंतर मुलाबाळांना सर्व देऊन टाकण्याचा विचार त्यागून म्हातारपणात आठी काही राखून ठेवायला लागले होते.या नाटकाच्या विषयावर नंतर अनेक चित्रपट निघाले राजेश खन्नाचा ',अवतार ',अमिताभचा 'बागवान 'काही वर्षांपूर्वी नाना पाटेकरचा चित्रपट 'नटसम्राट ' पण खूप गाजला होता.
यात विशेषता ही आहे की त्या काळात हा विषय नवीन होता.आणि मुलं आईवडिलाच्या आज्ञेत असायची.पण काळाची पावलं ओळखून हा विषय कुसुमाग्रजांनी लोकांसमोर मांडला.याला म्हणतात दूरदृष्टी.आज हा विषय घराघरात चालला आहे वृद्धाश्रम निघाले आहेत.
डाॅक्टर श्रीराम लागू खरं तर मराठी चित्रपटातील आणि रंगमंचावरील खरोखर नटसम्राटच होते.त्यांच्या उत्कृष्ट अभिनयामुळे या नाटकाला एक वेगळी उंची प्राप्त झाली!
सौ ऐश्वर्या डगांवकर पुणे