बहिण भाऊ
आयुष्यात काही नाती अशी असतात ची जन्मतःच आपल्याला लाभतात आणि शेवटपर्यंत आपली सोबत करत असतात.ती नाती म्हणजे न मागताच मिळालेले आपले ऋणानुबंध.आपल्या पूर्वजन्माची पुण्याई पाठीशी असली की अशी नाती सुखकर पण असतात आणि कधीकधी दुःखदायी पण असतात.
सुदैवाने मला माझे दोन्ही मोठे भाऊ भावजय चांगलेच लाभले.अडीअडचणीला कामी येणारे आणि माझी काळजी घेणारे.माझ्यावर अतोनात प्रेम करणारे भाऊ मला लाभले.बहिण नसल्याची कसर भावजयांनी भरून काढली.आई गेल्यानंतर माहेरचे प्रेम त्यांनीच दिले.
भावा बहिणीचं नातं असं असतं की ,
' तुझं माझं पटेना अन् तुझ्यावाचून करमेना '
असं असलं तरी बहिणीची माया ही वेडीच असते.भाऊ कसाही लागला तरी ती कधीच नातं तोडत नसते हे आपण सर्वांनी अगदी प्राचीन युगातील शुक्रवारच्या कहाणीत वाचलेच आहे.
खूप वर्षांपूर्वी मी एकदा इंदूरहून बसने धुळ्याला माहेरी जात होते.एकटीच असल्याने पुस्तक वाचायला ठेवले होते.वाचून वाचून कंटाळा आला मग खिडकीतून बाहेरची गंमत पहात होते.शिरपूरला बस थांबली.स्टाफ बदलणार असल्याने बस बराच वेळ थांबली होती.खिडकीजवळ एक पाच सहा वर्षांची मुलगी काहीतरी खायला द्या म्हणून मागत होती.फाटका फ्रॉक ,खपाटीला गेलेलं पोट अस्तव्यस्त केस आणि डोळ्यातील आस सांगत
होती की ती भूकेने व्याकुळ झाली होती.मी तिला माझ्या जवळचा बिस्कीटाचा पुडा दिला.तिचे डोळे कृतज्ञतेने भरून आले.ती मला
हात जोडून तिथून पळतच गेली.मी पण कुतुहलाने तिकडे पहात होते.ती मुलगी एका झाडाखाली थांबली तिथे एक दोन तीन वर्षांचा लहान मुलगा अर्धा उघडा बसला होता.बहुतेक तिचा भाऊच असावा .तिने बिस्कीटाचा पुडा उघडला क्षणभर मला वाटलं की ती स्वतः पहिले खाईल.पण तसं न करता तिने आपल्या हाताने भावाला बिस्कीट दिलं.त्याचेही डोळे लकलकले.दोघांनी हसत खेळत तो बिस्कीटाचा पुडा फस्त केला.पण तो प्रसंग माझ्या मनावर कोरला गेला .त्या मुलीचं वय पण लहानच होतं पण तरी तिने आपल्या लहान भावाला पहिले दिलं आणि मग स्वतः खाल्लं .बहिणीची माया !
दूसरा एक हृद्य प्रसंग जो आजवर माझ्या मनात कोरला गेला आहे.त्यावेळी मी आठवीत होते.थोडा थोडा स्वयंपाक येत होता.आई नोकरी करत असल्याने तिला त्या दिवशी उशीर होणार होता.तिने मला खिचडी करून ठेवायला सांगितली होती.नेमका गॅस गेला असल्याने स्टोव्ह वर बनवायची होती.संध्याकाळी मी पण तयारीला लागले.तिकडे दोघं मोठे भाऊ बाहेर गेले होते.अचानक दोघंही घाबरलेल्या अवस्थेत घरी आले आणि मला मी ठीक तर आहे ना विचारू लागले.मला कळेचना काय झाले ते.ते दोघंही मला जवळ घेऊन रडत होते.मी त्यांना सांगितले की मी ठीक आहे मला खिचडी बनवायची आहे .असं सांगून मी स्टो पेटवू लागले.ते पहाताच दोघांनी माझ्या हातातून काड्या पेटी हिसकावून स्वतः स्टो पेटवून दिला आणि मी खिचडी बनवेपर्यंत माझ्या आसपास बसून राहिले.थोड्यावेळाने आई घरी आली तेव्हा त्या दोघांनी आईला सांगितले की त्यांच्या मित्राची बहिण स्वयंपाक बनवत असताना स्टोव्हचा भडका उडाला आणि जळून मेली.ते ऐकताच मला त्यांच्या रडण्याचा माझ्या अवतीभवती रहाण्याचा उलगडा झाला.त्यांची माझ्यावरील माया पाहून मलाही रडायला आले.
आजही तो प्रसंग आठवला की आम्हा तिघांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू
लागतात!