एकट्या असूनही विविध प्रकारचे सण, उत्सव त्या विधिवत साजरे करत. त्यातच त्यांना गणेशोत्सव फार आवडायचा. दरवर्षी माझ्या वडिलांना बोलावून त्या गणेशाची विधिवत स्थापना करायच्या. आणि आम्हा चौघांनाही दरवर्षी त्या उत्सवात एकदा भोजनाला सांगायच्या. त्यांचे वय होऊनही ते मात्र कधी जाणवले नाही. मात्र आजीच्या बरेचदा काही गोष्टी लक्षात राहत नव्हत्या. त्यांच्याकडून काही होत असले नसले तरी १६ ते १७ वर्ष त्यांनी आम्हाला दरवर्षी गणेशोत्सवात बोलावले. साहजिकच त्यांच्या त्या दिवशीच्या कार्यात आम्हीसुद्धा काही मदत करत असू. असेच एकावर्षी त्यांनी दरवर्षीप्रमाणे भोजनाला बोलावले. आमचे जेवण होईपर्यंत त्या स्वयंपाकघरातून बोलत राहत.
अरे, बेटा मागून घेत चला रे काय हवे ते.. वैभवा मला माहित आहे तुला पुरणपोळी आवडते म्हणून. त्यात संकोच नका करू हो..
अरे पोरांनो जरा भजे भात पण घ्या.. आम्ही तेव्हा भजे खाल्ले तर त्यात अजिबात मीठ नव्हते. पण त्याविषयी काहीच बोलायचे नाही हे ठरले होते. तेव्हा त्या नेहमीप्रमाणे म्हणाल्या.
भज्यात मीठ बरोबर आहे ना रे! हो आजी म्हणून आम्ही म्हटले.
नंतर जेव्हा आजींनी ते काही वेळाने स्वतः खाऊन बघितले तर त्यांच्या लक्षात आले की, भज्यांमधे अजिबात मिठाची चव त्यांना लागली नाही.
तेव्हा त्यांनी म्हटले,
अरे मीठ नव्हते तर सांगायचे ना..मी चुकून रवा टाकला की बघ! रवा आणि मीठ यातला फरक मला लक्षातच नाही आला.
पण आमच्यासाठी ते महत्वाचे नव्हते. आजी ज्या मायेने आणि प्रेमाने ते तयार करत होत्या ते जास्त महत्त्वाचे होते.
२००७ ला जेव्हा वडील गेलेत तेव्हा आम्ही नागपूर ला स्थायिक झालो. त्याआधी एकदा त्यांनी मला स्वतः बोलावून गणेशाची स्थापना करवून घेतली होती. तेव्हा मी त्यांना सहज म्हणालो,
आजी, मला बाबांसारखी पूजा नाही जमणार. पण येईल मी तुमच्याकडे असे म्हणून त्यांना हो म्हटले.
नागपूला स्थायीक झाल्यावर नेहमी त्यांची आठवण घरी निघायची, आणि आताही तेच आहे. नागपूरला आल्यावर एक ते दीड वर्षाने काही कामानिमित्य गावाला जायचे ठरवले, तेव्हा आजींची भेट अवश्य घ्यायची हे ठरले. गावातील ओळखीच्या काही लोकांची भेट घेतल्यावर जेव्हा आजींच्या घरी गेलो तर त्यांचे घर बंद दिसले. मी सहज म्हणून बाजूच्या दुकानात विचारणा केली असता, अरे त्या तर गेल्यात काही महिन्यांआधी. मग त्यांनी सविस्तर सांगायला सुरुवात केली.
एकदिवस जेव्हा आजींच्या घरचा दरवाजा उघडला नव्हता तेव्हा काही लोकांना संशय आला. तेव्हा तो तोडून त्यांना आत जावे लागले. आत पाहतात तर काय… आजी तर घरात होत्या पण त्या नेहमीकरता सोडून निघून गेल्या होत्या.
ते म्हणतात ना माणूस जातो तेव्हा काही आठवणी सोडून जातो. त्या कधीही विसरता येत नाहीत.
आजही जेव्हा पाठक आजी आठवतात तेव्हा ते भजे अवश्य आठवतात. त्यात मीठ जरी नव्हते तरी माया आणि प्रेम होते.