नमस्कार आजच्या उपक्रमात मी ' वंचित 'शब्दाची माहिती देत आहे.
शब्द– वंचित
व्युत्पत्ती — ' वंचित 'हा मूळचा संस्कृत शब्द आहे.संस्कृतमधील ' वञ्च् '(वंच्)या धातूपासून तयार झाला आहे.या धातूचा मूळ अर्थ फसवणे,टाळणे,लपवणे किंवा वंचित करणे असा होतो.वंचित हे विशेषण आहे.
मूळ अर्थ –ज्याला एखादी गोष्ट किंवा वस्तू मिळण्यापासून रोखले गेले आहे किंवा ज्याची फसवणूक करून हक्क हिरावून घेतला आहे अशी व्यक्ती.
समानार्थी शब्द –उपेक्षित,अंतरलेला, बहिष्कृत,निराधार , शोषित.
माहिती –वंचित असणे म्हणजे अन्न आणि पाण्यासारख्या महत्वाच्या गोष्टींची कमतरता असणे.जेव्हा अन्न वस्त्र निवारा यांसारख्या मुलभूत गरजा पण ज्या लोकांजवळ नसतात अशा लोकांना ' वंचित 'हे विशेषण वापरू शकतो
सामाजिक संदर्भ –काळाच्या ओघात या शब्दाचा वापर उपेक्षित किंवा हक्कापासून दूर ठेवलेल्या घटकांसाठी केला जाऊ लागला .गरीब किंवा मागासवर्गीय लोक.ज्या लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात किंवा विकासाच्या लाभापासून दूर ठेवले गेले आहे ,त्यांना ' वंचित'म्हटले जाते.
साहित्यिक व राजकीय संदर्भ –मराठी साहित्यात ' दलित साहित्या 'नंतर ' वंचित साहित्य ' हा प्रवाह पुढे आला आणि राजकीय क्षेत्रातही शोषितांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी या शब्दाचा मोठ्या प्रमाणावर वापर होऊ लागला.
वंचित ही संज्ञा आपल्या समाजातील एक दुर्दैवी वास्तव आहे.परंतु बरेच लोक त्याकडे न पाहण्याचा किंवा त्याबद्दल उदासीन रहाण्याचा प्रयत्न करतात.
वंचित शब्दाची व्युत्पत्ती आणि व्याप्ती पहाता उपेक्षित समाजवर्ग गरीब , निराधार,गरजू, तणावग्रस्त,अधिकार वंचित, मूलभूत गरजांपासून उपेक्षित असा घेतला जातो.या अंगाने विचार केला तर समाजातील अनाथ, निराधार,अंध,अपंग, मतीमंद,मूक ,बधीर,वृद्ध,कुष्ठरोगी, हुंडाबळी,विधवा परित्यक्ता,कुमारी माता,बालविवाहिता,भिक्षेकरी,देवदासी, बालगुन्हेगार,वेश्या , दुभंगलेल्या कुटुंबातील मुले, विस्थापित आणि रोगग्रस्त अशा सर्व पिडीतांचा समावेश या संज्ञेत येतो.त्यातूनच पुढे वंचितांचे साहित्य उदयास आले असं म्हणायला हरकत नाही.कारण याच लोकांनी आपल्या लोकांसाठी साहित्य लिहिले आणि त्यांचे प्रश्न जगासमोर यशस्वीपणे मांडले आहेत.
रामायणात आणि महाभारतात पण वंचित लोक होतेच.उर्मिला,भरत -मांडवी यांसारखे पात्र तर महाभारतात कर्ण ,कुंती व गांधारी यांसारख्या स्त्रिया पण वंचित राहिल्या !
साहित्य —
* महात्मा फुले यांचे लेखन म्हणजे ग्रामीण साहित्यातील पहिला सशक्त आविष्कार.त्यांनी वंचित म्हणजे शोषितांच्या जीवनाचे यथार्थ चित्रण केले आहे.' शेतक-यांचा आसूड 'आणि ' गुलामगिरी 'या ग्रंथात ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी आणि बलुतेदार यांच्या वास्तविक जीवनाचे व दारिद्र्याचे जिवंत चित्रण केले आहे.गावातील धर्मसत्ता , सावकार आणि जमीनदार यांच्याकडून ग्रामीण व श्रमिक वर्गाचे होणारे शोषण त्यांनी उघड केले.
* त्र्यंबक नारायण अत्रे यांचे गावगाडा हे पुस्तक दलितांच्या सामाजिक स्थितीचा आढावा घेणारे आहे.
*महात्मा फुले, महर्षी कर्वे यांनी अनाथ मुलं-मुली,विधवा परित्यक्ता यांवर लिहीले
* लक्ष्मीबाई टिळक यांचे स्मृतीचित्र स्त्रियांचे प्रश्न मांडणारे आहे. पंडिता रमाबाई यांसारख्या लोकांमध्ये वंचितांचा विकास झाला.
*कुमुद रेगे यांचे वेगळ्या वाटेने जाताना
*अनुताई भागवत यांचे बिल्वदळ
*स्नेहलता प्रधान यांचे स्नेहांकित
* सिंधुताई सपकाळ यांचे मी वनवासी . यांसारख्या अनेक लेखक लेखिकांनी सर्वांचीच नावे लिहीणं शक्य नाही तरी विजया लवाटे ,इंदुमती जोंधळे यांची आत्मकथने प्रकाशित होत रहातात आणि मग वंचितांच्या प्रश्नांची नवनवी अंगे , स्त्रियांचे नवे प्रश्न समजण्यास मदत झाली.विभावरी शिरूरकर, काशीबाई नवरंगे याही होत्याच.या सर्व साहित्यातून हे स्पष्ट होतं आधुनिक मराठी साहित्यात वंचितांच्या व्यथा वेदनांचं असं एक साहित्यविश्व आहे की जे मराठी साहित्यातील अन्य आंबेडकरवादी ,देशीवादी,जनवादी, स्त्रीवादी, अस्तित्ववादी, गांधीवादी, सौंदर्यवादी, मानवतावादी,कृषिवादी साहित्य प्रवाहांप्रमाणेच एक स्वतंत्र व स्वायत्त साहित्य प्रवाह असून तो रोज नुसता पसरतो आणि वाहतो असा नसून तो रोज समाजमनात खोलवर रूजत आहे.जणू तो मराठी सारस्वतास असं समजावण्याचा प्रयत्न करतोय की प्रत्येक फुलाप्रमाणे प्रत्येक माणसास विकसीत होण्याचा स्वतःचा स्वायत्त अधिकार आहे .बागेत जसा गुलाबाला मिरवण्याचा अधिकार आहे तसाच तो लिलीच्या
छोट्या फुलासही असतो. हेच वंचित समाजास समजावणं.
यासारखे साहित्य जात धर्माच्या पलीकडे ज्या माणुसधर्माची पखरण करतं त्यातूनच जातिअंताचा लढा पुढे जात आहे. एकविसाव्या शतकातील मराठी साहित्य हे जातिधर्म निरपेक्ष वंचित धर्माचं साहित्य असेल हे 'खाली जमीन वर आकाश 'मुळे स्पष्टपणे लक्षात येते.