#सुरपाखरू #३०दिवसात३० #प्रयोग२०२६
मी एक : लहानपणी शिक्षक सांगायचे, ” चांगला अभ्यास करा, नही तर नापास व्हाल आणि याच वर्गात बसाल, तुमच्या सोबतचे सर्व पुढे निघुन जातील.”
आज जेव्हा आयुष्याच्या एका टप्प्यावर येऊन अडलोय, बाकीचे सर्व पुढे जात आहेत, तेव्हा वाटतं, 'वर्गातल्या परिक्षेत नेहमी पास होणारा मी आज आयुष्याच्या परिक्षेत नापास झालोय का?
मी दोन : अडलेल्या ठिकाणाहून निघण्याचा प्रयत्न करणं आणि तो सतत करत राहणं ही पुढे जाण्याची क्षमता असतांनाही एका जागी बसुन राहण्यापेक्षा कधिही चांगलंच. शिवाय वर्गातल्या परिक्षेत सर्वजण सारखीच प्रश्नपत्रिका सोडवतात, उलट आयुष्याची प्रश्नपत्रिका प्रत्येकाची वेगळी असते. त्यात पुन्हा कही जणांना 'नशीब' नावाचा सहाय्यक मिळतो आयुष्याच्या परिक्षेत पास होण्यासाठी.
मी एक : इतरांच्या चांगल्या नशिबाचं भांडवल करुन आणि अपल्या वाईट नशिबाला दोष देऊन आपण अपल्या चुका किती काळ झाकणार? कधी ना कधी त्या उघड होणार च ना!
मी दोन : मुळात नशीब हा शब्द अपल्या दोषांवर पांघरुण म्हणून वापरायचाच नाहीय. उलट जेव्हा योग्य दिशेने सर्वस्व ओतून प्रयत्न केल्यानंतरही जेव्हा आपण यशापासुन लांब राहतो तेव्हा संभाव्य निराशेच्या वादळात नशीब हा शब्द आपल्याला स्थिर राहायला मदत करतो. त्यातून आपण आपल्या कर्तव्यात कसूर केली नाही याचं समाधान आपण निश्चित मिळवू शकतो.
मी दोन : मी जे म्हणतोय ते समाधान, आणि तू म्हणतोयस ती अल्पसन्तुष्टता. समाधान हा मनाचा गुण तर अल्पसन्तुष्टता हा विकार. समाधान मनाला शांतता प्रदान करतं, यश-अपयशाकडे तटस्थ वृत्तीने बघायला शिकवतं, तर अल्पसन्तुष्टता मनाला आळशी बनवते. शेवटी यश-अपयश हे भौतिक पातळीवर असतं तर समाधान हे आत्मिक पातळीवर. भौतिक यश मिळालं नाही म्हणून आत्मिक समाधान नष्ट करणं खचितच फायद्याचं नाही, पटतंय का?
मी एक : हो, पटतंय, म्हणजे सध्या तरी.
मी दोन : वाटलंच मला. पण असू दे. सध्या तर सध्या. पुढंच पुढे बघू. काही वाटलंच कधी तर सांग. मी आहेच नेहमी तुझ्यासोबत.