क्वचित कधीतरी असं होतं की मी आठवड्याच्या शेवटी घरी गेली नाही. या वेळी कामानिमित घरी जाण्याचं टाळलं अन् व्हायचा तो अनर्थ झालाच. काय सांगू? घरची, घराची अन् घरच्यांची प्रचंड म्हणजे अगदी प्रचंडच आठवण येऊ लागली. काय करावं काही सुचेना. हृदयातली धडधड अन् जीवाची तडफड एका जागी बसू देईना.
तशी मी काय कुठे जंगलात वगैरे राहत नाही. छान, छोटीशी खोली, माया करण्याऱ्या घरमालकिण काकू, त्यांच्याच घरचं जेवण. म्हटलं तर विशेष काही वाईट काहीच नाही. पण म्हणतात ना घरची सर इतर कुठेही नाही. घरी बसायला स्वतंत्र जागा नसू देत, झोपायला उशी नसू देत, न्याहारीला शिळ्या पोळीचा कुचकरा अन् जेवायला नावडीची भाजी असू देत – घर म्हणजे घर असतं. तुमचं आमचं घर सेम नसलं तरी आपापल्या घरबद्दलची ओढ अन् माया मात्र सेम असते.
आता तुम्ही म्हणाल आजचा विषय काय आणि मी काय घर पुराण लावलंय. पण कसंय की नमनाला अगदी घडभर नाही तरी चमचाभर तेल हवंच. चव वाढते ना त्याने. त्यातही शेंगदाण्याचं तेल असलं तर अधिकच चव वाढते असो. आणखी थोडा वेळ याच दिशेने विचार केला तर भूक लागेल मला – घरच्या जेवणाची.
तर घरी न गेल्यामुळे जेव्हा बरोबर आठवा दिवस उजाडला तेव्हा मला असं वर वर्णन केल्याप्रमाणे कसंतरी होऊ लागलं. अगदी सकाळी सकाळी. तसं दोन दिवसांपासून लक्षण दिसतच होतं. मागचे २ दिवस पहाटे झोपेतून जाग येता येताच वेळेचा अंदाज घेऊन घरी आईला फोन लावून झाला होता. आता आज परत तेच केलं तरी आईला वेळ असेल च याची खात्री नव्हती. हाताने ऑफिसचं काम सुरू असलं तरी त्याने विशेष लक्ष विचलित होत नव्हतं अन् आठवण काही केल्या जात नव्हती. घोरपडीसारखी चिकटून बसली मेंदूला. मग यूट्यूबवर गाणी लावली. पण तिथेही कुठलं गाणं लावलं तर मनाला बरं वाटेल यावर परत विचार करावा लागत होता. मग तेही बंद केलं.
मग अचानक मेंदूत ट्यूब पेटली – ट्यूबच बरं का बल्ब नाही. कारण ती उशिरा पेटली ना – उशिरा पेटणारी ट्यूब च असते. तर म्हटलं रेडीओ लावून बघूया. पण मोबाईल मध्ये रेडीओ सुद्धा नव्हता. मग इंस्टॉल करावा लागला. आता घरासारखा फील यायचा असेल तर मेहनत तर करावी च लागेल.
रेडीओ उघडला, समोरच विविध भारती दिसलं अन् लावलं एकदाच. आहाहाहा!!!!!! काय छान वाटलं म्हणून सांगू?
रेडीओ माझी घराची गरज तात्पुरती का होईना भागवू शकला कारण माझी आई – जी माझ्या लहानपणापासून पहाटे पहाटे रेडीओ लावायची. माझी कितीही चिडचिड झाली तरी माझी सकाळ रेडीओच्या आवाजानेच होत असे. पूर्वी माझ्या घरी रेडीओ आणि टेप असं एकत्र असलेलं एक यंत्र होतं. त्यात कससेट्स लावायला मला आवडायचं कारण त्यात मला आवडणारेच गाणे वाजवता यायचे. रेडीओच मात्र तसं नव्हतं. कधीही कुठलंही गाणं. त्यात अनोळखी असलं तर आणखीन पंचाईत. मला त्या गाण्यांशी अन् त्या अनपेक्षिततेशी जुळवून घेणं त्या वयात म्हणजे अगदी ५ – ७ वर्षांच्या वयात जुळवून घेणं कठीण जात होतं. रेडीओ – जो आज माझी घराची गरज भागवत होता तो त्यावेळी आम्हा माय-लेकीच्या भांडणाचा विषय बनला होता. हळूहळू सवय होत गेली. नंतर नंतर तर त्या अनपेक्षिततेची वेगळीच ओढ लागली.
पुढे मैत्रिणीच्या घरी वेळ घालवताना तिथेही दुपारी रेडीओ लागला की ती कुठलं गाणं लागेल याची कल्पना नसताना अचानक आपण खूप दिवस न ऐकलेलं गाणं लागलं की सुखावलेला जीव किंवा त्या गाण्यावर मैत्रीणीसोबत गुणगुणणं असो, सगळंच खूप अनमोल बनलं. बऱ्याचदा तर तिच्याशी फोन वर बोलत असताना तीने लावलेल्या रेडीओ वरची गाणी मी फोन वर ऐकत बसलेली आहे – फोनवरच पण न बोलता अन् समोरासमोर नसताना केलेला संवाद.
आज रेडीओचा डब्बा घरी अस्तित्वात नसला तरी हृदयात आकाशवाणीचे स्थान अढळ आहे – आईसोबतच्या बंधाच्या अनेक प्रतिकांमधलं ते एक, मैत्रितल्या निखळतेचं प्रतीक असलेल्यापैकी ते एक, अन् शिक्षणासाठी दूर राहून एकटेपणाशी झुंजत असतानाचं शस्त्र म्हणजे हातातल्या डब्बा मोबाईल मध्ये चालवलेला रेडीओ.
रेडीओ ची रूपं बदलली पण जिव्हाळा, आपुलकी, प्रेम, आणि सोबत रेडीओ ऐकताना तयार झालेल्या आठवणी मात्र कायम त्याच आणि तशाच ताज्या, टवटवीत असतील.
#सुरपाखरू #३०दिवसात३० #प्रयोग२०२६