श्वान-प्रेमी-जनांची अगोदरच क्षमा याचना करतो, त्यांना दुखवायचा माझा काहीही हेतु नाही, किंबहुना त्यांचं मला कौतुकच वाटतं त्यांचं हे प्रेम बघून.
'तूफान' आणि नेमकं नाव विसरतोय बघा. ही नावं कुत्र्याची आहेत असं म्हणणं कुणाही श्वान-प्रेम्याला आवडणार नाही. कुत्रा म्हटलं की हिडीस-पीडीस केल्यासारखं केल्यासारखं वाटतं त्याना. तर 'तूफान' आणि 'डायना' ही नावं आहेत, मागच्या आठवड्यात ज्यांच्याकडे गेलो होतो त्या मिसेस ब्रार यांच्या कुटुंबातल्या सदस्यांची, म्हणजे त्यांच्या श्वानांचा. ('कुत्रा' शब्द किती शिताफीनं टाळला हे सुज्ञ वाचकांच्या ध्यानी आलं असेलच!)
दारातच मिसेस ब्रार यांनी आमचं स्वागत केलं. स्वागतास 'तूफान' आणि 'डायना' बरोबर होतेच. माझं पाऊल मागे होताना बघून मिसेस ब्रार यांनी 'डायना' म्हणून हाक मारली, डायना आज्ञाधारकपणे मागे झाली. मग आम्हाला सूचना, “डायना फक्त आपल्या जवळ येईल आणि परत माघारी फिरेल. ओळख करून घेण्याची तिची ही रीत. तिला हात मात्र लावू नका, आता ती वार्धक्याकडे झुकायला लागल्यामुळे चिडचिड करते, तिला स्पर्श केलेलं आवडत नाही, कधीतर चावा घेते”. किती कोतुकानं सांगत होत्या त्या! आणि आम्ही, म्हणजे मी, डायना कधी आमची ओळख परेड करून परत जाते याची वाट बघत होतो, उगाच स्पर्श होऊ नये म्हणून दोनही हात खिशात ठेवून.
आता 'तूफान'ची पाळी. तो “दोन वर्षाचा तरूण, आणि फार एनर्जेटिक, त्याला खेळायला फार आवडतं….” आणि मग त्याचं कौतुक सुरु झालं. भीत भीत त्याला स्पर्श करून आपलं कर्तव्य पार पाडलं. तेवढ्यावरचं तूफानची मालकीण खुश झाली, आणि त्यानंतर किती आणि कशा प्रकारानं तो मस्ती करतो, लाडावतो वगैरे प्रात्यक्षिक मला आम्हाला बघायला मिळाली आणि दरवेळी तूफानचं कौतुक करण्यासाठी माझा शब्द खजिना शोधीत राहिलो, कधी इंग्रजीतील नाहीतर हिंदीत, तिथं ब्रारांपुढे मराठी शब्द उपयोगाचे नव्हते. एनर्जेटिक 'तूफान' लवकर थकावा याची मी वाट पाहत होतो. माझा कौतुक-शब्द-खजिना रिता झाला होता.
या श्वान-प्रेमींच्या घरात जातांना मनाची तयारीच करून जायला पाहिजे, काय नवं बघायला मिळेल हे सांगणं कठीण असतं. आता हिच्या मैत्रिणीकडे गेलो तर तिथं 'इडली'. ही खाण्यातल्या इडली नाही, तर 'इडली' हे हिच्या पामेरियनचं नाव. तिच्याकडे पोहचलो आणि 'इडली'चं बोलणं सुरू झालं (मी भुंकण हा शब्द शिताफीनं टाळला असल्याचं चतुर वाचकांच्या परत लक्षात आलं असेलंच!) मग हिच्या मैत्रीणीचे म्हणजे रीतूचे तिच्याशी (इडलीशी) संवाद. मग हिनं इडलीच्या पाठीवर हलकेच (भीतभीत) हात फिरवून कर्तव्यपूर्ती केली. इडलीच्या वेगवेगळ्या हालचालीतून इडली रेखाशी ओळख दाखवित असल्याचं अर्थघटन करून रीतू सांगत होती. माझं आश्चर्य क्षणोक्षणी वाढत होतं. इडलीच्या भावना तिच्या मालकिणीला कशा समजत होत्या, ते बघून तिच्या निरिक्षण शक्तिचं कौतुक वाटतं होतं.
मग 'इडली' रीतूच्या हातून सटकली आणि तिनं रेखाचं दाराजवळ काढलेलं पादत्राण तोंडात घेतलं आणि आत बेडरूमकडे पळ काढला. रीतू तिच्या मागे, 'नो इडली', 'नो', करीत…
इकडे चप्पल,जी नुकतीच घेतलेली, खास मैत्रिणींकडे जाताना वापराची, ठेवणीतली, तिचं काय होईल याची चिंता रेखाच्या चेह-यावर दिसत होती. क्षणात 'इडली' परत आमच्याकडे आणि, क्षण भर थांबली, दुसरी चप्पल घेऊन परत आत. आता दोन्ही चपला गेल्याचा ताण रेखाच्या चेह-यावर स्पष्ट उमटत होता पण तो रीतूला कळता कामा नये, हेही ओघानं आलंच!
रीतूनं हिंदीतून रेखाला समजावलं, इडली कशी आठवण ठेवते, काही जण तिला आवडतात, ते तिच्या लक्षात राहतं आणि ते परत आले तर, तिला फार आवडतात. त्यांनी परत जाऊच नये असं तिला वाटतं आणि म्हणून ती त्यांचे चप्पल, बूट लपवते. तसंच तिनं आज तुझ्या चपला लपवल्या आहेत. किती दिवसांत आम्ही रीतूकडे गेलो नाही, तरी 'इडली'ला आमची आठवण होती, यावर इडलीचं कौतुक करणं भागच होतं.
खरंच, या श्वान मंडळींच्या बुद्धिमत्तेचं कौतुक करायलाच पाहिजे. माणसाच्या कुटुंबात सामावून जाणारी ही प्राणी जात कधी कधी माणसापेक्षाही अधिक लळा लावणारी आणि विश्वासू असते.
फक्त मला भीती वाटते श्वान मालकाच्या किंवा मालकिणीच्या चर्चांची. तशा त्या चर्चा मला ज्ञानवर्धकही असतात. 'ब्रीड' म्हणजे 'श्वाना'ची जात यावर बरीच रोचक माहिती मिळत असते. ब्रीड आणि मग क्राॅसब्रीड…
'डायना' लॅब्रेडाॅर, तर 'तूफान' गोल्डन रिट्रीवल आणि कशाचं तरी क्राॅसब्रीड…
प्रत्येक श्वान मालक आपण अमुकच 'ब्रीड' का 'सिलेक्ट' केलं आणि ते मिळविण्यास त्यांनी किती आणि कसे कष्ट घेतले, हे असंलं ऐकलं की, आपण जीवनात काहीतरी विशिष्ठ असं करण्यास कसं मुकलो आहोत, याची जाण होऊन स्वतः विषयी न्यून गंड वाटायला लागतो. जगात करण्यासाठी किती काय असतं, या विषयी एक जागृती येते, असो.
श्वानाचा विशिष्ठ 'डायट', 'मेडिकल तपासणी', वॅक्सिन्स आणि इतर बरंच काही… यावर कधी न संपणारी वर्णन ऐकण्याची तयारी ठेवूनच श्वान-प्रेमींच्या घरी जायला हवं, हा माझा विश्वास दरवेळी बळावतो, हे मात्र खरं.
हे सगळं ऐकताना माझ्या मध्यमवर्गीय माणसाच्या मनात नकळत वेगळेच हिशोब मांडले जातात आणि त्याच्या कळा उगाच जाणवतात!
आम्हाला सवय असते, गल्लीत येणा-या खंड्याची, तो चार गल्ल्या फिरून आपलं स्वतःच पोट भरत असतो. अधून-मधून आमच्या कडे 'न्याहरीला' येत असतो. आणि कधी मनीमाऊसाठी ठेवलेलं दूध गट्ट करून जात असतो. असो. तरी तो आवडतो.
आमच्या चिरंजीवांच्या आणि नातीच्या 'नव-विचाराचं वारं' जोर पकडायला लागलं आहे. आता श्वान-पालनाचं हे खूळ आमच्या घरात शिरणार आहे, असं दिसतय. आम्हीही श्वान-प्रेमी या गटात मोडणार की काय!
२२ जुलै २०२६
#सुरपाखरू
#३०दिवसात३०
#प्रयोग२०२६
#जुलै२०२६