१९९२ सालच्या शतायु दिवाळी अंकातला पुलंचा लेख वाचला. 'छान पिकत जाणारे म्हातारे. आज २०२६ ,आता दिवाळी यायची आहे अजून, पण फार दूर नाही, तर ३४ वर्ष झालीत, म्हातारपणाच्या समस्यांत बदल झाला आहे असं वाटत नाही. कदाचित समस्या वाढल्यासारख्याच वाटताहेत. मागच्या शनिवारच्या, लोकसत्तेच्या चतुरंग पुरवणीत पानभर लेख आहे वृद्धाश्रमांवरचा!
पुलंच्या लेखात वृद्धाश्रमाचा लवलेश आढळत नाहीय आणि हल्ली वृद्धाश्रमांचं पेव फुटायला लागल्यासारख वाटतय. वृद्धाश्रम ही काळाची गरज अशी गर्जना यत्र तत्र सर्वत्र ऐकू येते आहे.
पुलंच्या लहानपणी कुटुंब, नातेवाईकांनी कसं भरलेलं असायचं, गायन, वाचन, चर्चा, वगैरे तत्कालीन करमणूकीत सगळे मिळून उत्सव साजरे केल्यासारखे वागत असत. आजोबाही सुरपेटीच्या पलिकडचे स्वर लावून तत्कालीन प्रसिद्ध अशी नाट्य गीतं गाण्यात कुणाच्या मागे नसायचे. कारकुनी आर्थिक परिस्थितीतही सुरळीत चालू असल्याचा उल्लेख पुल करतात.
आजोबांचं मुलांच्या आनंदात मिसळून जाणं, त्यांना वळण लावण्याच्या फंदात पडण्यापेक्षा नवनव्या छंदात गुंतवून ठेवणं किती महत्त्वाचं याची ते जाण करून देतात. असे आजोबा नातवांना नंतरही आठवतात.
पुलंनी वर्णन केलेले म्हातारपणाचे मानसिक पैलूं आजही तसेच आहेत की! बदलत्या परिस्थितीत त्रास कसा वाढतो आहे हे पालुपद आजही कायम आहेच. आपल्या दुखण्याचं वर्णन कर करून सहानुभूती गोळा करण्याचंही तेच. नवी पिढी आपल्याकडे कशी दुर्लक्ष करते, ही टोचणी आजही तशीच. बदललं काही नाही. दोन पिढीतील दुराव्याची दरी वाढतच जाते आहे हे निश्चित.
शेवटी म्हातारपणाच्या मानसिकतेची समस्या तशीच आहे. पुल म्हणतात तसा आशापिंडाचा हा खेळ आहे. आपल्या जुन्या काळच्या आठवणींत चिकटून राहून आज निराशेचे रंग शोधत रहायचे ते तसंच आहे.
निराशा नव्हे तर निरपेक्षता अंगी बाणवणं तेव्हाही गरजेचं होतं आणि आजही आहेच.
परवाच्या वृद्धाश्रमावरच्या लेखात वृद्धाश्रमांचे संचालक वृद्धाश्रमातील वृद्धांची आणि त्यांच्या पाल्यांत समेळ कसा गाठता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करीत आहेत आणि काही अंशी ते सफल झाल्याचा उल्लेख आहे. ही एक स्तुत्य गोष्ट आहे. शेवटी हा वृद्ध आणि त्यांचे पाल्य यातल्या समस्यांमध्ये दोन्हीच्याही मानसिकतेचा प्रश्न आहे.
पुलं म्हणतात तसे, म्हातारपण सुखात कसे जावे यावर 'रामबाण' असा एकच उपाय नाही. पण त्यांनी काही उपाययोजना सुचविल्या आहेत त्या आजही विचार करण्याजोग्या आहेत. एक गोष्ट करता येण्यासारखी म्हणजे इतरांना उपद्रव होणार नाही याची आपण काळजी घेणे. दुसरं म्हणजे आपण घेतलेला मार्गच योग्य हा आग्रह न धरणे आणि कोणी आपल्याला जुमानत नाही हा विचार मनातून काढून टाकणे. अगदी लहान प्रमाणात जरी आपण कुटुंबात उपयोगी होऊ शकत असलो तरी ते आनंददायी असू शकतं, आपल्यासाठी आणि कुटुंबासाठीही. पुलंचे असे विचार आजही तेवढेच महत्त्वाचे.
काळ बदलत असतो हे खरं आहे पण सगळंच बदलत असतं हे खरं नसावं!
२४ जुलै २०२६
#सुरपाखरू
#३०दिवसात३०
#प्रयोग२०२६
#जुलै२०२६