“वारी” हा शब्द घेऊन आजचा लेख लिहितो आहे. “वारी” म्हणली की पंढरपूरची.. आषाढी आणि कार्तिकी एकादशीची, मराठी माणसाच्या मनाला निर्मळ शुद्ध बनवणारी आणि शेवटी विठू माउलीचे दर्शन घेऊन जीवन धन्य करणारी असे चित्र सर्वांचे डोळ्यापुढे आहे. मला अजून तरी पंढरीची वारी करण्याचा योग आला नसला तरी आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज आठवली माझी “पहिल्या कवितेची वारी “. नंतर अशा वेगवेगळ्या शब्दरचना करून अनेक अक्षरवाऱ्या मी केल्यात आणि अजूनही करतो आहे .
आयुष्यात केली गेलेली पहिली गोष्ट नेहमीच लक्षात राहते, मी केलेल्या पहिल्या कवितेची ही कथा.
त्याआधी आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाच्या चरणी हे प्रथम आजचे ताजे काव्यपुष्प अर्पण करतो.
“संसार विसरलो क्षणभर ,
मनाला पंढरीची ओढ ..
मोहरला सर्वांचा जीव ,
माउलींच्या भेटीचा विचार ..
पालखी सजली फुलमालांनी,
धन्य ते होती खान्देकारी
नसे भीती न क्षती आम्हा ,
संगती सदा आमुच्या हरी..
वारी निघाली निघाली,
निघे भक्तांचा मेळा..
वारी चालता चालता,
रंगे आनंद सोहळा..
पायी ठेवता डोईला,
सरले लहान थोरपण..
ओढ माऊलींची सार्यांना,
प्रेमाने घेती गळाभेट ..
नाचती अभंगाच्या रंगीं,
घालुनी तुळशीमाळ गळा..
तुकोबा ज्ञानोबाच्या उदघोशांत ,
नाचतो भक्तांचा हा मेळा ..
दिंड्यापताका नाचवती,
हाती गुंफुनी गोफ फेर..
टाळ मृदूंग चिपळ्यांचा,
गुंजे आसमंती नाद ..
रिंगण फुगड्यांची फेरी,
घालती पंढरीच्या वाटेवरी..
मुखा विठूनामाचा गजर,
भक्तीभाव सदा अंतरी..
शाम तुळशीचा सुंदर,
जांभळा मंजिरी मोहर..
वारकऱ्यांनो चला लगबग,
सय येई , माऊलीची फार..
डोंगर कपारीची,पावसात,
वळणाची अवघड वाट..
सरला ओवी अभंगात,
रडतोंडीचा सारा घाट..
वाढती नभी चंद्रकला,
मृदंग रंगवे भजनाला..
नामवंत कीर्तनकार,
गर्दी देवाच्या कीर्तनाला..
वळण चंद्रकोरी समान,
चंद्रभागा तीर दिसें दूर..
उचंबळून भरले उर,
वाहे आनंदाश्रुंचा पूर..
अठ्ठावीस युगे विटेवरी ,
ठेउनी दोन्ही कर कटी..
पंढरपूरचा विठुराया ,
त्याला विश्वाची काळजी..
चंदनी टिळा असे भाळी,
वर बुक्का शोभे काळा..
रंगनाथ त्रिभुवनीचा उभा,
आमुचा विठुराया सावळा..
विसरलो सुख दुःख,
फक्त विठुनाम ओठी..,
संपेल जीवाची हुरहूर
कुशीत माउलींच्या निश्चिन्ति..
एकवटले प्राण नेत्री,
दर्शनास होई गोळा..
*धन्य धन्य जीवन झाले,*
*दिसें जेव्हा पंढरीचा राजा ..*”
चला पहिल्या कवितेच्या कथेस सुरुवात करतो.
सहा वर्षांपूर्वी करोनाचा भयावह काळ सुरु होता तो! कैदेत नसतानाही घराच्याच कारागृहात आपण सर्व स्वतःहून बंद होतो. धडधाकट व्यक्तींच्या करोनामुळं झालेल्या मृत्यूवार्ता धडकी भरवत होत्या आणि चुकून थोडीही सर्दी झाली तर हा करोना तर नाही ना? अशी भीती मनात वाटत असताना दिवसभर काय करावे हा मोठा प्रश्न होता मी इंडियात आणि सौभाग्यवती मुलाकडे न्यूझीलंडला. घरी नव्वद वर्षाची आई आणि मी दोघेच होतो. टी व्ही बघणार तरी किती? आणि त्यावर दाखवणाऱ्या स्मशानात करोना बळीच्या दहनासाठी लागलेल्या रांगा भीषणता दर्शवत होत्या. दवाखान्यातील गर्दी आणि करोना वॉर्डाची चित्रे आणि स्कोरकार्ड सारखे दाखवणारे वाढत जाणारे मृतांचे बळीचे आकडे पाहून सर्वत्र भीतीचे साम्राज्य होते. त्यावेळी आषाढी एकादशीची वारी रद्द झाली होती. त्यामुळे पंढरीचे लाईव्ह दर्शन टीव्ही वर घेऊन समाधान मानण्याशिवाय पर्याय नव्हता.
तेवढ्यात साहित्याची आवड असणाऱ्या आमच्या मित्राच्या एका ग्रुपवर मोबाइलवर एक मेसेज आला त्यात एक चित्र होती.एक वृद्ध महिला टी व्ही वर दिसणाऱ्या विठूमाऊलीचे टीव्ही समोर उभे राहून दर्शन घेत होती टीव्हीला हार वाहिला होता. आणि यावर काही सुचतय का? असा मित्राचा संदेश होता.
कधीही काही न लिहणारा मी विचार करू लागलो. चित्र बघताच एक ओळ सुचली. माऊली या शब्दावर श्लेष साधणारी,
*माऊलींच्या दर्शनाने*
*धन्य झाली माऊली!*
आणि मग त्या विठूमाऊलींच्या कृपेने मागेपुढे काही ओळी जोडत ही काही ओळीची तीन कडव्यांची शब्दरचना लिहिली गेली. मित्रांनाही ती आवडली होती तीच माझी पहिली कविता होती.आता त्या कवितेची एकच ओळ लक्षात आहे.
असा कविता लिहिण्याचा छंद दोन हजार वीसच्याच्या आषाढी एकादशी पासून लागला आणि मी लिहीता झालो .
“वारी” हा शब्द नंतर पुन्हा पुन्हा करणाऱ्या क्रियेसाठी नकळत वापरला जातो उदाहरणं द्यायचं झाले तर अभियांत्रिकीला सिनिअर्स ” नीट अभ्यास करा नाही दर सेमिस्टरला परीक्षेच्या वाऱ्या कराव्या लागतील.” असा दम द्यायचे.
थोडक्यात,
“*वारंवार करतो ती वारी असाच शब्दश: अर्थ वारीचा घेऊया*.”
जुलै महिन्याच्या या समृद्ध लेखनाच्या वारीत शब्दरूपी पंढरीचे भक्त “सुरपाखरू” रूपात सातत्याने लिहून शारदेची आराधना करत आहेत. त्या सर्व भक्तांना मनात पासून नमस्कार.
वारी पंढरीची आज
दर्शनाने पूर्ण झाली
गजबजे चंद्रभागातिर
जीवने सार्थक जाहली!
एक झाले लहान थोर
विसरले त्यांचे मोठेपण
डोईवर टिळा हाती टाळ
विठूच्या स्मरणात ते दंग!
शब्दरूपी विठ्ठल इथंही
पहिली त्याची अनंतरूप
आनंद देई नित्य वाचकांना
लेखणी हाती ते धन्य हात!
लिहिलं मी जे काही ही
स्फूर्ती त्याची तुम्ही माऊली
कौतुकाचा नको देऊ भार
वाटणे तेच खरा आनंद देई!
बोला,
“*जय हरी विठ्ठल!*
*जय हरी विठ्ठल!*
*पुंडलिक वरदा*
*हरि विठ्ठल*,
*श्री ज्ञानदेव तुकाराम,*
*पंढरीनाथ महाराज की जय!”*