नावात काय आहे??
फक्त काम बघा!!
अस आपण म्हणतो खरं
पण
नावही ही नेमक साजेस
असं देण फार महत्वाचे आहे.
मग ते
कविता वा लेखाचे
शीर्षक असो
व्यक्तीचे, वास्तूचे असो
वा
आपल्या
लाडक्या पेट्सचे
नाहीतर मग
नकळत
“नाव मोठं लक्षण खोटं,”
किंवा
“नाव सोनुबाई हाती
कथिलाचा वाळा “
अशा म्हणीचा धनी होतो
तो व्यक्ती .
श्वानाच्या वेगवेगळ्या नावावरून एक श्वानकथा मला पण आठवली. एका नावाच्या दोन व्यक्ती घरात आल्या की गोंधळ होतो. पण आपल्या श्वानाचे आणि येणाऱ्या पाहुण्यांचे नाव चुकून सारखं असेल तर??
काय घडले ? याचीच ही सत्यकथा.
माझा मित्र गोपाळ त्याच्या होणाऱ्या व्याह्या कडे गेला होता त्याच्या बरोबर त्याचा चुलतभाऊ प्रमोदही होता. पण प्रेमाने घरात लहानपणापासून अप्पा म्हणतं असल्याने तो अगदी शाळेपासून तर कॉलेज पर्यत सर्वत्र अप्पा म्हणुनच प्रसिद्ध होता. नवीन होणारे व्याही भोसले मिलिटरीतून कर्नल म्हणून निवृत्त झाले असले तरी त्याचे अतिरेकी श्वानप्रेम आजूबाजूच्या सर्वाना माहित असले तरी गोपाळ आणि त्याचे कुटुंबीय त्या बाबतीत अनभिज्ञ होते.
कंपाऊंडच्या गेटवर “अप्पा पासून सावधान” असा अनाकलनीय फलक आणि शेजारी कुत्र्याचे चित्र म्हणजे काय होते याचा अर्थ दरवाजा उघडल्यावर गोपाळला कळला. सुदैवाने त्याच्या भावाचे प्रमोदचे उर्फ अप्पाचे त्या बोर्डकडे लक्ष नव्हते. गेल्याबरोबर समोरच्या दरवाजवरची बेल वाजवली समोरून गोपाळच्या व्याह्याने मोठ्याने हसून कडक शेकहॅन्ड करत स्वागत केले शेजारी उभा बलाढ्य अलसेशिअन कुत्रा सोबत बघून धडकी भरवत होती. त्याला टाळत, प्रमोद चटकन सोफ्यावर जाऊन बसला तरी त्याचेजवळ येऊन त्या कुत्र्याचे गुरगुरण सुरु होते. लहानपणी श्वानचाव्यामुळे पोटातल्या चौदा इंजेक्शनचा वेदनादायी अनुभव असलेला प्रमोद थोडा घाबरून दूर अंग चोरून बसला होता , ते पाहून गोपाळ व्याह्यांना म्हणाला, ” कर्नलसाहेब, तुमच्या कुत्र्याला बांधून ठेवा.. भीती वाटते माझ्या भावाला प्रमोदला!!”
व्याही प्रमोद उर्फ अप्पाला हसत हसत म्हणाले, “प्रमोदभाऊ अज्जीबात घाबरू नका , ” त्याची दोरी घट्ट धरली आहे.अहो, खरंतर आमच्या अप्पाला बांधायची गरजच नाही, एकदम शहाणा आहे अप्पा . अगदी त्याच्या वडिलांवर गेला असं म्हणून त्यांनी भिंतीवर टांगलेल्या फोटो कडे बोट दाखवले. त्यात दोन्ही पायावर उभा असलेला श्वानं देवाघरी गेला आहे हे त्याच्यावर टांगलेला फुलांचा हार सांगत होता. त्यांनी श्वानाचे नाव चक्क अप्पा ठेवले होते पाहून गोपाळ आणि प्रमोद चक्रावून गेले होते . त्याच्या वडिलांचे नाव अण्णाही असू शकते असा विचार विनोद बुद्धी असलेल्या गोपाळच्या मनात डोकावून गेला… पण समोर रोखून बघणाऱ्यां श्वानं अप्पाच्या भीतीने हसूही येत नव्हते.
व्याही त्याचे श्वान अप्पाचे कौतुक अप्पा नामक मनुष्य प्राण्याला ऐकवू लागले.
“आमच्या अप्पाची आमच्या घरातली तिसरी पिढी आहे . अगदी प्युअर ब्रिड अल्सशिअन आहे तो. अप्पा हुशार आहे रोज खालून सकाळी तोंडात उचलून वर्तमानपत्र आणून देतो. शाकाहारी आहे तो फक्त माझ्याच हातून भाकरी दूध घेतो अप्पा. खुशीत असला की पाय चाटतो शेपटी देखील हलवतो. त्याला सर्व समजत आपण बोललेले, कधी मी नातवाला रागावलो तर अप्पा माझ्यावर भुकतो. आता तीन वर्षाचा झाला आहे आणि आता आम्ही त्याच्यासाठीही मैत्रीणीच्या शोधात आहोत. हा.. हा..हा..”
प्रमोदलाही अप्पा म्हणतात हे व्याह्यांना माहित नव्हते. नकळत त्याचे टोपणनाव श्वानास देऊन प्रमोदचा नकळत अपमान होत होता.दोघांचे नाव सारखे असल्याने श्वानं अप्पाच्या प्रत्येक कौतुकाबरोबर प्रमोदअप्पाचा चेहरा पडत होता. हे पाहून माझा मित्र गोपाळने शिताफीने विषय बदलून दुसरा विषय सुरु केला.
असो.
*नुसत्या सारख्या दिसण्याच्या नव्हे तर नावाच्याही सारखेपणाने गमती होतात.*
इथं तर एकाच नावाचे श्वान आणि मनुष्यप्राणी समोरासमोर बसले होते.
“कॉमेडी ऑफ एररचा ” दोन जुळ्याच्या सारखेपणावर आधारित “अंगूर ” हा विनोदी चित्रपट अजूनही मी अधून मधून बघतो.
तसाच नावाच्या सारखेपणाने इथंही घोटाळा झाला होता .
आवडता पाळीव प्राणी असला तरी त्याचे नाव काय ठेवावी हे तारतम्य नक्की हवे आणि प्राणिमित्रांचे प्राणीप्रेम कौतुकास्पद असले तरी ते मनुष्यप्राण्यावरील प्रेमापेक्षा जास्त होऊ नये हीच माफक अपेक्षा असतें. ईश्वराकडे गेलेल्या श्वानाचा फोटो लावून हार घालणे काही जणांना खूप अतिरेकी प्रेम वाटत असले तरी असे आणि एवढे श्वानप्रेम बघायला मिळणे दुर्मिळच!
प्राण्याचे माणसासारखे नाव ठेवून कळतं नकळत अपमान होत असतो. दहावीत मामाच्या गावाकडे गेलो होतो, तेव्हा ढवळ्या पवळ्या ही बैलजोडीची नाव खूप जण ठेवायची. हिरा मोती ही बरेच जण ठेवायचे ही बैलाची नाव म्हणून प्रचलितही आहे पण एका शेतकऱ्याने बैलाचे नाव चक्क “वकील्या” ठेवले होते..न राहून मी त्याला याचे कारण विचारले तर कोर्टकचेरीत वकीलाच्या वागणुकीने त्रस्त होऊन पैसा तर गेलाच पण केस हरला होता तो.पण तरीही एकाच्या चुकीमुळे समस्त व्यवसायिकांना बदनाम करणारे नावे ठेवून त्याला काय मिळालं ते देवच जाणो.
चि. सौरभ ने हट्टाने तीस वर्षापूर्वी अगदी महिन्याभराचा “टायगर” नावाचा श्वान आमच्या घरी आणला होता. लहान मुलांना ही गोंडस छोटी पिल्ले आवडतातच. नकळत त्यांचे सहवासाने आपण मोठेही ही त्याच्या प्रेमात पडतो.
आमच्या घरचाच सदस्य झाला होता “टायगर” . अगदी नावाला साजेसा वाघासारखा दांडगा होता. कुणी घरात येताना आधी टायगर कुठे आहे हे बघून यायचे. त्याचे डॉकटर्स ,त्याचे लसीकरण, त्याला ट्रेनिंग देणारा ट्रेनर त्याच डाएट असे सर्व नियमित व्यवस्थित होत होते. मी पण अधून मधून चेन लावून सकाळी फिरण्यासाठी घेऊन जात होता. आठ वर्षाचा चि. सौरभ तर जाम खुशीत होता टायगरची आणि त्याची विशेष गट्टी जमली होती. पण क्रूर नियतीच्या मनात वेगळेच होते.. घडू नये ते घडले, अडीच वर्षांच्या टायगरने अचानक झालेल्या अपघातात दुर्दैवी एक्झिट घेतली होती. त्यावेळी सौरभचा आकांत आम्हांला पहावत नव्हता. आम्ही सर्व कुटुंबीय खूप दुःखी झालो होतो. छोट्या सौरभला समाजावे कसे समजत नव्हते. त्याला सावरायाला जवळपास महिना लागला होता.
त्या दिवशी आम्ही विचार करून एक निर्णय मात्र पक्का केला,
*” पुन्हा कधीही पेट्स न पाळण्याचा…”*
लळा लागतो सहवासाने
असो जरी तो कुणी श्वान
हृदय अन मन दोन्ही रडते
देतांना अखेरचा निरोप!
निरोपाचे प्रसंग जीवनी
बरेच आतापर्यन्त आले
आठवणी त्यांच्या येता
जखम ओली परत होते!
टाळण्या असे ते प्रसंग
घेतला वसा तो आम्ही
दुःखी कधी न होण्या
ना पाळणार पुन्हा प्राणी!
बंगल्याच्या नावावरून आठवलं .. माझ्या मित्राने त्याच्या सुंदर बंगल्यास “काकाची कृपा ” असे वास्तव सांगणारे वेगळे एकमेव अद्वितीय नाव सोनेरी अक्षरात ग्रनाईट वर कोरून प्रवेशद्वारा जवळ ठळकपणे लावले होते. हल्ली पती पंत्नीचे अद्याक्षर घेऊन बंगल्यास नाव देण्याची फॅशन आली आहे. एका ठिकाणी ” अमा!”हे नाव दिल्याचं वाचून त्या मालकाला मागचे प्रयोजन विचारले . तर तो उत्तराला साहेब, अ म्हणजे माझ्या अविनाश या नावातला अ आणि मा म्हणजे माझी पत्नी सौ.माधवीतला मा.. असे हे “अमा.”
प्रत्येकास आपले नाव आवडत असते त्यास नावाने आणि त्या नावास जी, राव, भाऊ, दादा, साहेब.. असे आदरार्थी प्रत्यय लावले तर काम सहज होते.
असो आता हे “नाव पुराण” इथंच थांबावतो.
प्रेम प्राण्यावर करा
सांगुनी सर्व संत गेले
अति इतकेही नकोरे
माणस होतात पारखे!
जीव दोघांचा अनमोल
मोल कसे तयाचे लावावे
प्रत्येकाची जागा जाणुनी
आपण मोकळे व्हावे!
वहाण पायातली ती
शोभे फक्त ती पायात
डोईवर ठेवतात वेडे
प्रसिद्ध तेही जनात!
ईमानी असतो श्वानं
मनुष्य नसतो कुणी तो
पाच बोट सारखी नाही
वेगळे प्रत्येक स्वभाव!
एकाच नावाचे जे दोन्ही
विनोद आपोआप होतो
साध्या अर्थाचा तो शब्द
द्यर्थी रूप ते जन्म घेतो!
नाव कमावण्याला पूर्ण
आयुष्य कामास येते
गमवण्यास मात्र एखादी
चूक क्षुल्लकही चालते!
नाव जपण्यासाठी चाले
जीवाचा आटा पिटा हो
काळप्रवाहात विरून जाते
जरी किती कुणी मोठा हो!
नावावर लिहिल्या या ओळी
सोबत श्वानाच्याही गमतीगोष्टी
हसून मोकळे खुशाल व्हा हो
आनंद होईल मला हो भारी!