#सुरपाखरू #३०दिवसात३० #प्रयोग२०२६
फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट – जेव्हा आमच्या मातोश्री वयाने आमच्या वयापेक्षाही लहान होत्या. प्रत्येक वट सावित्रीच्या व्रतासाठी थेट वडाच्या झाडाजवळ जायचं कठीण झालं असावं म्हणून की काय, त्यांनी वडाच्या झाडाचे दोन बोन्साय तयार केले. छान तबकडीच्या आकाराच्या पसरट कुंड्या. त्यातलं एक आमच्या मावशीबाई त्यांच्या सासरी घेऊन गेल्या, एक आमच्या मातामही अर्थात आजीकडे राहिलं.
लहानपणीपासून मला या बोन्साय वडाचं फारच अप्रूप. एक तर तेव्हा मी जीवशास्त्र शिकलेली नव्हती. इतकं अवाढव्य वाढणारं झाड कसं काय या छोट्या कुंडीत आपलं अस्तित्व सामावून घेत असावं? आपल्या घरी काही तरी खास आहे जे इतरांच्या घरी नाही हे सुद्धा मनोमन फार सुखावून जायचं. पण ते काही वर्षांपूर्वी पर्यंतच.
आज त्या कुंडीत स्वतः ला आक्रसून घेणाऱ्या वडाला पारंबी सुद्धा दिसली. पण ती हवेत लटकलेली नव्हती. ती जाड अन् सरळ खाली मातीत रुतलेली. का? कारण तिला ठावूक असावं की गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने सरळ खाली जाऊन जमीन मिळणार नाहीय. कुंडीतल्या मातीच्या दिशेने जाऊन मूळ झाडाला आधार देऊन किंवा त्याचा आधार घेऊनच जगावं लागेल. मग कशाला हवेत लटकण्याचा उपद्व्याप करावा?
बोन्साय ची उत्पत्ती आधी चीन मध्ये होऊन पुढे जपान मध्ये ते पसरलं. बाहेर मोकळ्या जमिनीवर, वातावरणात अस्ताव्यस्त वाढणारी झाडं आपल्या मनाप्रमाणे अन् आपल्या सौंदर्याच्या कल्पनेत बसतील अशा प्रकारे वाढतील व आपल्या नजरेला त्या सौंदर्याचा अनुभव आपल्या जागेवर घेता येईल या उद्देशाने निर्माण झालेलं तंत्र म्हणजे बोन्साय. निव्वळ योगायोग वाटणार नाही अशी गोष्ट म्हणजे फुट बाईंडिंग तंत्र अर्थात स्त्रीच्या पायांना एका विशिष्ट पद्धतीने बांधून ते छोटे व सुंदर दिसतील अशा प्रकारे घडवणे या तंत्राची उत्पत्ती सुद्धा आधी चीन मध्ये आणि नंतर पुढे जपान मध्ये स्थिर झाली. किती तो सौंदर्याचा सोस.
आज मला बोन्साय आवडत नाहीत. मला उद्यानातले विशिष्ट पद्धतीत आकार दिलेले तथाकथित सुंदर झाडं आवडत नाहीत. मला आवडतात जंगलात वाढलेली अस्ताव्यस्त अफाट विस्ताराची झाडं ज्यांना कोणाच्या तरी नजरेला आनंद मिळावा म्हणून मुद्दाम घडवलेलं नसतं. त्यांची ती वाढतात – वाट्टेल तशी. त्यांच्या अस्तित्वावर अन् विस्तारावर, वाढीवर, प्रगतीवर कोणाचेही नियंत्रण नसते. ते स्पर्धा करतात मोकळेपणाने, एकमेकांशी – पाणी अन् सूर्यप्रकाशासाठी. त्याउलट उद्यानातली झाडं अन् घरातली बोन्साय – सगळं आयतं अन् मापात – ठरवून वाढवलेलं.
वर्षानुवर्षं स्त्रीयांचंही तसंच चाललंय असं वाटत नाही का? स्वातंत्र्य आहे पण जितकं दिलं जाईल तितकंच. फिरू शकतात पण आखून दिलेल्या वर्तुळातच. वाढू शकतात पण सांगितलेल्या उंचीपुरतंच. पसरू शकतात पण तथाकथित अब्रूला धक्का लागणार नाही इतकंच. आणि ही वृत्ती सर्व धर्मात, सर्व देशात समान आहे – अगदी लोकशाही अन् स्वातंत्र्याचे झेंडे मिरवणाऱ्या अमेरिकेतही हाताचे मसल्स दिसतात म्हणून स्त्रीवर टीका करणारे आहेतच. तिथे तुमच्या आमच्या आशियातल्या देशांची काय कथा.
मुद्दा बोन्साय वाढवावे का नको? घरात ठेवावे का नको? हा नाहीच – मुद्दा आहे एखाद्या झाडाने, प्राण्याने अथवा स्त्रीने आपल्या आनंदासाठी, नयनसुखासाठी एका विशिष्ट पद्धतीने जगावे या अट्टहासाचा. बघा – विचार करा.