समापन
जुलै महिन्यात हा उपक्रम हाती घेताना अनेक विचार मनात होते.सर्वप्रथम मी संत स्त्रियांची माहिती रोज एक आणि दुसर्या दिवशी त्यांचे
मनोगत देण्याचा विचार केला होता.परंत काही कारणाने ते होऊ शकले नाही.मग तुषार सरांनी मार्गदर्शन केल्यानंतर शक्यतोवर वेगवेगळ्या विषयांवर लिहीले.काही आपोआपच सुचत गेले.
काही रसग्रहण पहिलेच लिहीलेले दिले.
मागील एक महिना कसा निघून गेला हे कळले नाही असंही मी म्हणणार नाही कारण
म्हणतात ना ' नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न
असाच काहीसा प्रकार माझ्या बाबतीत घडला.
व्हायरल झाल्याने उठायची पण शक्ती नव्हती.माझ्यानंतर मिस्टरांना पण झाला आठ दहा दिवस त्यातूनच कसेबसे लिहीले.त्यातच मला कमरेचा त्रास झाला .खूप वेळ उभं रहाणं
बसणं सर्वावर बंधन आलं.सर्व ठीक होता नातवाला डेंगू झाल्याने तो हास्पीटल मध्ये चार दिवस अॅडमिट होता.जवळपास पंधरा वीस दिवस तब्येतीच्या तक्रारी होत्या मला अजूनही फिजिओथेरपिस्ट कडे जावे लागते.
इतकं असूनही मनात सुरवंटासारखी जिद्द होतीच की हाती घेतलेला उपक्रम पूर्ण करायचाच !आज मी या उपक्रमाचे समापन
पसायदानाचा शब्दश: अर्थ लिहून करत आहे.आजपर्यंत आपण माझे लेखन गोड मानून घेतले त्यासाठी आपल्या सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद !त्याचप्रमाणे माननीय तुषार सरांचे आभार मानते की त्यांनी मला लिखाणाची संधी दिली .सर्वांचे लेखन अतिशय सुंदर होते .काही
लेखकांना प्रकृतीअभावी रोज प्रतिसाद देऊ
शकले नाही याची खंत वाटते.!
पसायदान हे केवळ एका धर्मासाठी किंवा जातीसाठी नसून संपूर्ण मानवजातीच्या आणि विश्वाच्या कल्याणासाठी असलेली एक विश्व प्रार्थना आहे.निर्मळ मनाने अखिल विश्वाच्या कल्याणासाठी,एका भक्ताने हात जोडून प्रत्यक्ष जगत् नियंत्याकडे केलेली विश्व प्रार्थना म्हणजे पसायदान.मनात यत्किंचितही आपपरभाव न ठेवता शुद्ध आणि निरागसतेने परमेश्र्वराकडे विश्व कल्याणासाठी केलेले आर्त मागणे म्हणजे पसायदान.आपले इवलेसे हात पसरून त्या ओंजळीत परमेश्वराकडे असं देणं मागणं की ज्यामुळे अखिल विश्वात शांती, समृद्धी,ज्ञान आणि समाधान कायमस्वरूपी नांदावे यासाठी केलेली प्रार्थना म्हणजे पसायदान ज्याची आज संपूर्ण विश्वाला गरज आहे.
पसायदान म्हणजे संत ज्ञानेश्वरांनी 'ज्ञानेश्वरी'
ग्रंथ पूर्ण झाल्यावर संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी आणि शांततेसाठी ईश्वराकडे पसायदान (प्रसाद )मागण्याची विश्वप्रार्थना आहे.याच् शब्दश: अर्थ ' प्रसादाचे दान '
असा होतो.यात त्यांनी म्हटले आहे ते असे..
” हे विश्व ज्याचे रुप आहे अशा देवा,मी केलेल्या
या वाणीरूपी यज्ञाने तू संतुष्ट हो आणि मला प्रसाद म्हणून हे पसायदान दे.”
” वाईट प्रवृत्तीच्या लोकांचे दुष्टपण नष्ट होवो त्यांना चांगल्या कर्म करण्याची आवड निर्माण होवो.सर्व प्राणीमात्रांचे परस्परांवर प्रेम जडून
त्यांच्यात मैत्रीचे संबंध निर्माण होवोत.”
“पापाचा आणि अज्ञानाचा अंधार नष्ट होवो.हे विश्व स्वधर्मरुपी सूर्याचा प्रकाश पाहो म्हणजेच सत्याच्या मार्गावर चालो.या पृथ्वीवरील सर्व
प्राणीमात्रांना त्यांना हवे ते चांगले सुख समृद्धी
मिळो.”
” या भूतळावर ईश्वरावर निष्ठा असणा-या संतांची व सज्जनांची भेट घडो ज्यांच्यामुळे जगात सतत कल्याण व मंगल वर्षाव होईल”
” हे संत म्हणजे जणू कल्पवृक्षांची वने आहेत,
जिवंत चिंतामणी गावे आहेत आणि त्यांचे शब्द
हे प्राणीमात्रांना जीवन देणारे आहेत.”
यावर सर्वेश्वर भगवान ज्ञानेश्वरांना म्हणाले,
” हा तुझा मागितलेला वर मी तुला देतो.”
त्यामुळे संत ज्ञानेश्वर महाराज तृप्त झाले सुखी झाले आणि त्यांनी समाधी घेतली.