पत्र रूपात हा समारोप पाचा लेख लिहित आहें.
ll श्री ll
सर्व सुरपाखरांना आदरपूर्वक
सप्रेम नमस्कार,
एखादी गोष्ट पूर्ण झाली की पूर्णत्वाचे समाधान नक्की असते आणि पूर्ण होण्याची क्रिया थांबणार या बद्दल मनाला थोडी रुखरुख ही वाटते. समारोपाचे भाषणे बरीच ऐकली असली तरी लेखात नेमके काय लिहावं? हा प्रश्न मनात आहे.
तीस दिवसाच्या या लेखनाच्या आणि वाचनाच्या वारीत काय मिळालं? किंवा अनुभूती कशी होती? या बद्दल लिही तो आहें
“खरा आनंद हा पूर्णत्वाचा नसून पूर्ण होणाऱ्या प्रक्रियेत दडला आहे. ” हे मात्र मी या लेखनपर्वात नक्की अनुभवलं.
यावेळी एखादा शब्द घेऊन लिहिण्याचा प्रयत्न केला शब्दावरून लेख कथा कविता असा लेखन प्रवास होता,
स्फूट लेखनाचा प्रयोग केला. आपल्या सर्वांचे चांगले प्रतिसाद वाचून काठावर का होईना मी पास झालो असल्याचे समाधान मिळाले.
“प्रतिसाद सुंदर लेखासम हो
स्फूर्तीचे ते कारण असता
आजाणते जर चुकता
चूकही अचूक सांगता ”
सर्वांचे लेखावराचे प्रतिसादही भरभरून होते एकच आवड असलेली अनोळखी मंडळी नकळत खूप ओळखीची झाली होती.
सुरपाखरांच्या जानेवारी जुलैच्या दोन्ही पथकात एकूण लेखाची एकसष्टी गाठली असली तरी या लिहिण्याने अजून खूप काही लिहू शकतो हा आत्मविश्वास आला. हे सामूहिक लिहिण्याच्या प्रयोगामुळे शक्य झाले आहे. नाहीतर एकसष्ट काय एकही लेख कदाचित माझ्याकडून लिहिला गेला नसता.
ही लेखनाची प्रक्रिया वेळेत लिहिली जाणे हेही महत्वाचं आहे.लेख सर्वांनी वेळेत लिहिण्याचा प्रयत्न नक्की केला आहे.
साप्ताहिक मिटिंग हे एक आकर्षण आहे सुरपाखराच्या थव्याचे. तुषारजींचे मार्गदर्शन नेहमी अनमोल असते.
” घडून गेले कधी वेळेवर
वेळे आधी… कधी ते नंतर
तीस दिवस पटकन गेले
लेख प्रकाशे अचूक वेळेवर..
वेळ आज ही समारोपाची
कठीण कराया सिंहावलोकन
एकापेक्षा एक खूप सुंदर
प्रतिसादही दिले ते वेळेवर..
वेळ असावी घटिका शुभ ती
अवेळ ती कधीच न यावी
वांछील सर्वं ते सहज सुचावे
अचूक तेही अगदी वेळेवर..
वेळही आपुले धन ते असते
कळते पण क्वचितच वळते..
लेखनास वेळ सदैव हो ठेवा ..
जाणून घ्या सर्वं हे वेळेवर..”
“वेळ ही मुठीतल्या वाळू प्रमाणे निसटून जात असते म्हणून कोणतीही गोष्ट वेळेत करण महत्वाचे आहे.”
सर्व लेख उत्तम वाचनीय होते. प्रत्येकाच्या लेखनातून आपण काही तरी नविन शिकलो आहे. अनेकदा मला दुसऱ्यांचे लेख वाचून विषय सुचले किंवा त्यांचा लेखाचा उत्तरार्ध लिहिण्याचा मी प्रयत्न केला.
पावशा पक्षी पावसाळ्याची सुचना देताना “पेरते व्हा पेरते व्हा ” अशी सुचना आपल्या विशिष्ट आवाजाने शेतकऱयांना देतो. तसंच काहीस हा आपला हा थवा सुरपाखरांना ‘”*लिहिते रहा..लिहिते रहा*” अशी साद घालत असतो.
सर्व लेखांचा शेवट यावेळी कवितेतून केला गेला. आज ही समारोपाची शब्दरचना लिहून थांबतो.
समारोपास हे सांगणे
लक्षात नेहमी ठेवा
लिहीणे हा धर्म मानूनी
नित्य सर्व लिहीते रहा..
जे विचार मनात येता
विसरून लगेच जातो
टिपण लिहून ठेवता
कागदी तो चिरंतन राहतो..
अनुभव जीवन पर्यटनाचा
प्रत्येकाचा असे तो वेगळा..
लिहिलेला पुन्हा वाचता
भूतकाळही परत फिरतो..
सुख दुःखाची एकत्रित हो
जीवन एक आहे गाथा..
नायक तिचे तुम्हीच आहे
लिहून ती पुनः वाचा..
खूप लुटा हो नित्य सारा
आनंद हा लिहिण्या मधला ..
वाटताना कंजुषी नको ती
लेख सर्वाना द्या वाचायला..
तीस दिवस कसे सरले
ते कळले आम्हा नाही..
लेखांची माला प्रकाशे
साहित्याच्या दिंडीवरती ..
जुलै सोहळा साजरा झाला
वाट पाहतो नववर्षदिनाची ..
लेखाची होईल शतकी खेळी
आमंत्रणाची ती गरज नाही..
“चरैवेति चरैवेति” हा श्लोक सर्वाना माहिती आहे चालत राहणं म्हणजे जीवन आणि हे विविधता असलेले जीवनअनुभव, विचार लिहिणंही तेवढंच महत्वाचे आहे.
कळावे लोभ असावा.
🙏🙏🙏
आपला,
हेमंत नाईक
9422781665