चलबिचल म्हटलं की, अर्जुनच आठवायला हवा असं नाही. असं म्हटलं तर 'आपण सारे अर्जुन' आयुष्यात कधी ना कधी!
असते, चलबिचल अगदी शुल्लक गोष्टींवरून, नाही तर असते चलबिचल, घ्यायला लागणाऱ्या मोठ्या निर्णयाबाबतही.
'चल' गती दर्शविते तर 'बिचल' शंका, आशंका! स्तब्ध राहायचं ठरवलं तरी ते सोपं वाटत नाही, त्या क्षणी.
ज्ञान उपयोगी पडत असतं निर्णय घ्यायला, पण यावेळी तो तोकडं पडत किंवा भावनांचा गदारोळात विचार करण्याची क्षमताच गोंधळात सापडलेली असते. हे? की ते?, काहीही ठरवणं कठीण वाटतं असतं. हीच ती चलबिचलता.
कुणीतरी म्हटलं आहे, आजकाल माणूस चालतो कमी आणि धावतो जास्त, अर्थात मनानं. थोडीही उसंत नसते पहा! विचारांचा गुंता वाढत जातो. विचार नवा विश्वास निर्माण करून चालणं, धावणं सोपं करीत असतील तर छानच, पण बऱ्याचदा विचाराबरोबर एखादी चिंता डोकावते, आयुष्याची न सुटलेली कोडी परत डोकं वर काढतात. कुठल्यातरी निर्णय घेण्याची निकड भासू लागते. विचारांचा गुंता वाढत जातो. आणि परत हे? की ते?…. ही आवर्तनं अविरत. आणि याची तीव्रता वाढते, संभ्रम पराकाष्ठेला पोहचतो आणि माणूसाचा अर्जुन होतो…
मग कुणीतरी सांगतं, अरे मनाकडे लक्ष दे, त्याच्या चित्तवृती समजायचा प्रयत्न कर. भावना समजून घे, त्या स्वीकारही. भावनांचा स्वीकार केल्यावर, विवेकनिष्ठ विचार करणं थोडं सोपं होईल. विवेकनिष्ठ विचारांचा आधार घेत, आपलं वर्तन ठरव.
या संदर्भात आणि 'चल बिचल' या जोडीवरून डॉ आनंद नाडकर्णींचं पुस्तक आठवलं, “स्वभाव-विभाव” ह्या शीर्षकाचं. यातला विभाव 'अक्कल-बिक्कल' मधल्या 'बिक्कल' निरर्थक नाहीय.
*'विभाव'मध्ये* *विवेकनिष्ठ-विचारसरणी*, *भावना* आणि *वर्तन* या तीन गोष्टी सामावल्या आहेत.
डॉ नाडकर्णी, डॉ अल्बर्ट एलिस यांच्या विवेकनिष्ठ विचार पद्धतीवर आधारित असणाऱ्या उपचार-पद्धतीचा परिचय, या पुस्तकात करून देतात. ही पद्धती एकूण सामान्य जीवनातही किती महत्त्वाचा भाग असतो. हेही पटवून देतात, अनेक उदाहरणे देत. काही वाचकांना हे पुस्तक जड वाटतं, हेही खरंच.
तर 'चलबिचल' वरुन या पुस्तकाची आठवण झाली. माझ्यामते, खरंच वाचण्यासारखं आणि संग्रही ठेवण्यासारखं आहे हे पुस्तक. तसं हे पुस्तक नवीन नाही, बऱ्याच जणांनी वाचलं असावं. चलबिचलच्या निमित्ताने परत चाळायला हरकत नाही.
१५ जुलै २०२६
#सुरपाखरू
#३०दिवसात३०
#प्रयोग२०२६
#जुलै२०२६