
आमचा एक नऊ जणींचा ११-१२ वी पासूनचा मैत्रिणींचा ग्रुप आहे. जसं सगळ्या मुलींबरोबर होतं, तसंच आमचंही झालं, मधल्या काळात आम्ही आप-आपल्या संसारात गुंतून गेलो, भेटी नाही की फोन नाही. फेसबुकने आम्हा सगळ्यांना परत एकदा जोडलं आणि आम्ही २७ वर्षांनी भेटलो, धमाल मस्ती केली, गप्पा केल्या, एकमेकींना समजून घेण्याचा प्रयत्न केला, आणि मधली काहीवर्षं जणू नव्हतीच आमच्या आयुष्यात परत तितक्याच घट्ट मैत्रिणी झालो. आता दरवर्षी भेटतो अगदी न चुकता….आता आम्ही सासवा होतोय, आमच्या ग्रुपमध्ये माझ्या लेकीचं लग्न झालं, सगळ्या सहकुटुंब आल्या, आम्ही अजूनच प्रेमाने बांधलो गेलो.
मैत्री – हा शब्द ऐकला की मनात एक उबदार भावना जागृत होते. रक्ताचं नातं नसतानाही जीवापाड जपलेलं, समजून घेतलेलं, साथ लाभलेलं एक गहिरं नातं. मैत्री म्हणजे आनंदातल्या हास्याचा साक्षीदार, दु:खातल्या अश्रूंची सावली. आणि जसं मैत्रीच्या आठवणी मनात घर करतात, अगदी तसंच त्या आठवणींचं स्वरूप अनेकदा एखाद्या सुरेल गाण्याच्या रूपात डोळ्यासमोर तरळतं. बॉलिवूडने आपल्याला अशी अनेक सुंदर मैत्रीवरची गाणी दिली आहेत, जी केवळ मनोरंजन नाही, तर काळाच्या ओघात “मैत्री”ची व्याख्या बनून राहिली आहेत.
“ये दोस्ती हम नहीं तोडेंगे” – शोले (१९७५) माझं जन्माच साल…अर्थात शोले हा काळातीत सिनेमा आहे. त्यामुळे प्रत्येक काळातील व्यक्तींनी हा सिनेमा नक्कीच बघितला आहे, सिनेमा बघतांना प्रत्येक व्यक्ती रडला आहे, हसला आहे, त्वेषाने मुठी आवळल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक “जय” अथवा “विरु” नावाचा अवलिया मित्र आपल्यालाही हवा असं प्रत्येकाला वाटलं.
ही जुळ्यांसारखी गुप्त आणि गूढ मैत्रीची शपथ घेणारी जोडी – जय आणि वीरू. ‘शोले’ या सर्वकालीन यशस्वी चित्रपटातले हे गाणं केवळ दोन पात्रांपुरतं सीमित राहिलं नाही. “ये दोस्ती हम नहीं तोडेंगे…” म्हणतांना किशोरदा आणि मन्ना डे यांनी दिलेलं स्वराभिनय मैत्रीचं एक अनोखं प्रतीक बनलं.
हे गाणं चित्रिकरणासाठी रामनगर (कर्नाटक) येथे तब्बल २० दिवस लागले. या गाण्याची जादू अशी काही आहे की मागच्या ५० वर्षांपासून आजही शालेय गॅदरिंगपासून ते कॉलेज farewell पर्यंत कुठेही “मैत्री” म्हटलं की हे गाणं पहिलं आठवतं. आर. डी. बर्मन यांना या गाण्याच्या तालात दणदणीत ढोलकी आणि हार्मोनियमचा वापर करायचा होता, कारण मैत्री ही उत्सवसारखी असते – थेट, उघड आणि भारावलेली!
अमिताभच्या करिअरचा तो चढता काळ होता. अगदी सहा वर्षांनंतर त्याला मैत्रीवर अजून एक सिनेमा करायला मिळाला – याराना. “तेरे जैसा यार कहाँ” – अमिताभ बच्चन आणि अमजद खान यांच्या मैत्रीवर आधारित या गाण्याने ८० च्या दशकातील तरुणाईचं हृदय जिंकलं.
तेरे जैसा यार कहाँ, कहाँ ऐसा याराना…या ओळीतून एका मित्रासाठीचं जिव्हाळ्याचं गाणं तयार झालं. या गाण्यात एक सुंदर समर्पण आहे – आपल्या मित्रासाठी आयुष्य द्यायलाही तयार असलेली भावना. असं म्हणतात की किशोर कुमार हे गाणं रेकॉर्ड करताना स्वतः डोळे पुसत होते, कारण त्यांच्या आयुष्यातील हरवलेल्या मैत्रीवरची आठवण त्यांना झालेली. हे गाणं जिथे चित्रित झालं, त्या कॉलेजचे खरे विद्यार्थीही फिरत्या खुर्च्यांवर बसले होते – त्यामुळे सेट अजून जिवंत वाटतो.
मधल्या काळात बरेच सिनेमा आलेत, आणि मैत्रीवरची गाणी ही त्यावेळी ट्रेंडिंग झालीत. जसं “बने चाहे दुष्मन जमाना हमारा सलामत रहे दोस्तना हमारा”. दुसरे गाजलेले गाणे म्हणजे दोन भिन्न स्वभावाच्या मित्रांची मैत्री. अमिताभला ऍग्री यंग मॅन चा खिताब मिळवून देणारा चित्रपट ‘जंजिर’ आणि त्यातील अतिशय सुदंर गाणं “यारी है ईमान मेरा यार मेरी जिंदगी” मन्नादाचा आवाज, पठाणी पेहेरवतील प्राण या दोघांनी या गाण्यात प्राण फुंकले. अमिताभच्या चेहेऱ्यावरचा आनंद आणि हास्य या गाण्याचे आकर्षण.
हिंदी चित्रपट आता बदलू लागला होता. चित्रपटांचे कथानक त्याचे स्वरूप आता कालानुरूप आकार घेऊ लागले. मानवी भावनांपेक्षा आक्रोश, राग, बदला या भावनांना केंद्रस्थानी ठेवून सिनेमा घडू लागला आणि प्रेक्षकांच्या पसंतीस पडू लागला. २००१ साली प्रकाशित झालेला “दिल चाहता है” – परत एकदा तीन मित्रांची कथा घेऊन आला आणि प्रत्येकाच्या पसंतीस उतरला. तीन मित्र – अक्षय खन्ना, आमिर खान आणि सैफ अली खान यांचं गोव्यातलं ट्रिप-प्लॅनिंग हे ‘urban friendship goals’ बनून गेलं. दिल चाहता है… हम ना रहें कभी यारों के बिन, या गाण्यानं मैत्री आधुनिक काळात कशी दिसते याचं सुंदर रूप दिलं – गप्पा, ट्रिप्स, थट्टा, misunderstanding आणि पुन्हा जुळणारी मैत्री.
गोव्यातील Chapora Fort वर चित्रित झालेलं हे गाणं इतकं प्रसिद्ध झालं की, आता लोक ते ठिकाण “Dil Chahta Hai Point” म्हणून ओळखतात. हे गाणं केवळ मैत्रीचं प्रतीक नाही, तर “urban millennial bonding”चं प्रतिनिधित्व करतं.
त्यानंतर तब्बल ८ वर्षांनी परत एकदा तीन मित्रांच्या मैत्रीवर आधारित सिनेमा आला – थ्री इडियट्स आणि या सिनेमाने धुमाकूळ घातला, थिएटरमध्ये आणि प्रेक्षकांच्या मनातसुद्धा.
मैत्रीचे गाणे म्हणजे आनंद, धमाल, मस्ती, खोड्या, पार्टी याला भेद देणार गाणं म्हणजे “जाने नहीं देंगे तुझे”. हे गाणं म्हणजे मैत्रीची दुसरी बाजू – हळवी, भावुक आणि सोबत राहण्याची आस. रांचीच्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा ‘राजू’ आत्महत्येच्या प्रयत्नानंतर ऍडमिट असतो, तेव्हा त्याच्या मित्रांचा असहाय भाव या गाण्यातून चित्रित केला आहे. मैत्रीचं हे गाणं त्या वेळेस लाखो विद्यार्थ्यांच्या डोळ्यात पाणी आणणारी अमूल्य आठवण ठरली. हे गाणं एका टेकमध्ये सोनू निगमने गायलं. आवाजातली ती थरथर आणि हृदयद्रावकता म्हणजे स्वानंद किरकिरे ह्याच्या शब्दांची खरीखुरी भावना होती. गाणं तयार करताना आमिर स्वतः प्रत्येक शब्द ऐकून स्वानंदशी चर्चा करत होता, भाव पोहचतोय का हे तपासत होता.
एक वेगळ्या धाटणीचा सिनेमा म्हणजे वझीर, २०१६ साली प्रदर्शित झाला. अमिताभ आणि फरहान अख्तर ह्यांच्या अभिनयाने एका वेगळ्याच मैत्रीचे स्वरूप उलगडणारा हा सिनेमा आणि त्यातलं गाणं “अतरंगी यारी” – म्हणजे अनपेक्षित, विचित्र, पण प्रामाणिक नातं. हे गाणं विशेष आहे कारण यात स्वतः अमिताभ बच्चन आणि फरहान अख्तर यांनी स्वर दिला आहे. कभी हँसाए, कभी रुलाए… ये दोस्ती ऐसी है भाई, ही ओळ म्हणजे प्रत्येक ‘imperfect perfect friendship’ चं मनोगत आहे. गाण्यात मैत्रीला दिलेली उपमा – ‘गोड वास असणाऱ्या गुलाबसारखी’, ‘वेडसर पाऊस’, ही प्राचीन भावनिक शैलीत सांगितली गेली आहे.
बॉलिवूड मैत्रीगीतांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यातील काव्यशैलीतील भाव, प्रत्येक गाणं मैत्रीची वेगवेगळी छटा उलगडतं दार्शनिकतेपासून धमाल मस्तीपर्यंत.
दुसरे वैशिष्ट्य म्हणजे सांगीतिक विविधता, आर. डी. बर्मनचा ढोलकीसकट धमाल मैत्रीचा ताल असो, की शांतनू मोईत्राचा पियानोवरचा हळवा सुर बॉलिवूडने मैत्रीला भावनांचा पूर्ण साज दिला आहे.
मैत्री ही केवळ शब्दात मांडता येत नाही, पण संगीताच्या साथीने ती फार सुदंररित्या व्यक्त करता येते. बॉलिवूडने गेली अनेक दशके मैत्रीच्या प्रत्येक पैलूवर गाणी रचली – काही डोळ्यातल्या पाण्याच्यासोबती, काही हसणाऱ्या वाऱ्यांसारखी, काही आठवणीत रेंगाळणारी. या गाण्यांमधून केवळ मैत्रीचं स्वरूप समजत नाही, तर त्या काळातली मूल्यं, संबंध, आणि समाजाच्या अपेक्षाही दिसून येतात. आज सोशल मिडियाने जरी मैत्रीला “लाइक” आणि “फॉलो” पर्यंत मर्यादित केलं असलं, तरीही या जुन्या गाण्यांच्या सुरावटी अजूनही आपल्या मैत्रीत तो जिवंत गंध टिकवून आहेत.
आजचा दिवस खास आहे, मैत्रीचा आहे. एखादा कोणी जुना मित्र आठवला असेल, मधला काळ पुसून परत एकदा मैत्रीचा धागा बांधायचा असेल तर त्याला फक्त “Hi” म्हणण्याआधी, एखादं तुमच्या आवडीचे मैत्रीवरचे गाणं त्याला पाठवा… त्यापेक्षा मोठा प्रेमळ संवाद दुसरा कोणताही नसेल.
सोनाली तेलंग
०३/०८/२०२५