प्रत्यक्ष घटनेवर लिहिण्यासाठी मराठीच्या पेपरात “वृत्तांत” लिहीण्याचा एक प्रश्न असायचा त्याचा अनुभव आज तो कामी आला, आजचा लेख लिहिताना मात्र अधूनमधून माझे विचारही त्यात मिसळतो आहे. “आज शाळेत काय झालंय?” हा आईचा नेहमीचा प्रश्न सर्वानाच लहानपणी विचारला जातो, तेव्हा जे घडलं ते सविस्तरपणे सांगायची सवय मला तेव्हापासून लागली होती .
*माझे तिसरे लग्न!!*.
इगतपुरीच्या रेंन फ़ॉरेस्ट रिसॉर्टला सुंदर वातावरण होते अधून मधून पडणारा पाऊस आणि ढगाआडून डोकावणारा सूर्य. त्यामुळे निळ्या आकाशात पूर्वेला सुंदर सप्तरंगी इद्रधनुष्याचे तोरण सजले होते. दुपारी चार ते सहा दरम्यान सर्व वर वधुनी स्विमिंग पुलच्या पाण्यात व अंब्रेरेला फॉलमध्ये DJ वर दीड तास पुंल डान्स व आणि मधूनच आकाशातून रिमझिम पडणाऱ्या पावसात रेन डान्स केला. हळदीचे लग्नात विशेष महत्व असतें, हा समारंभ वधू आणि वराच्या घरी स्वतंत्रपणे केला जातो. घरातील विवाहित स्त्रिया वधू/वराला आंब्याच्या पानाने हळद लावतात. त्यानंतर त्यांना वडिलधाऱ्या मंडळीकडून आशीर्वाद दिला जातो आणि आंघोळ घातली जाते. असे हळदीचे स्नान लग्नाच्या आधी करतात. आज मात्र या स्विमिंगपूल मध्ये आम्ही सर्व सूर्य नारायणाच्या पिवळ्या किरणात हळदीचे स्नान एकत्र जणू आम्ही अनुभवत होतो.. फक्त आज त्यावेळी आशीर्वाद देणारे हात आता काळाच्या पडद्याआड गेले होते.
सर्वंजणं आधीच नाचले होते आणि पार थकूनही गेले असल्याने नाचत वरात काढण्याचा कार्यक्रम रद्दबादल करण्यात आला.
एका मित्राच्या सुचनेवरून नासाडी नको म्हणून या सामूहिक लग्न सोहळ्यात अक्षतांना तिलांजली दिली होती त्या ऐवजी प्रेमाचं प्रतिक असलेल्या नाजूक गुलाब पाकळ्यांचा वापर करावा असं सर्वानुमते मान्य करण्यात आले होते.
बासष्ठाव्या वर्षी पुन्हा त्या सुखद क्षणाची पुनरावृत्ती होणार होती.वरांनी रेशमी झब्बा पायजमावर जाकीट घालून तय्यार होते आणि वधूमात्र नटण्यात व्यस्त असल्याने उशीर होत होता . रंगीत पैठणी कांजीवरम, शालू अशा भारी साडया परिधान करून डोक्यावर मोगऱ्याचा गजरा माळून गळयांत ठेवणीतले दागिने घातलेल्या वधू , “उशीर झाला तर चालेल लग्नाला उभी राहतेय एवढा वेळ लागेलच नटायला!”असे ठासून बोलून वरस गप्प बसवीत होत्या. एकीनी तर आज आपली नऊवारी साडी घालण्याची हौस पूर्ण केली होती आणि तिला अनुरूप तिच्या नवऱ्यास चक्क धोतर घालायला लावले होते. अगदी शाळा भरते तसें वेळेवर सर्वजण ठीक सात वाजता हॉल मध्ये आले
प्रथम प्रेमाचे प्रतिक असलेले गुलाबपुष्प देऊन वराने प्रेमाची मागणी केल्यावर वधूकडून रीतसर होकार आल्यावरच लग्न सोहळा सुरु होणार होता. जवळपास बावीस बालमित्र मैत्रिणींची जोडपी या सामूहिक विवाह कार्यक्रमांची उत्सव मूर्ती होती.
जे मित्र अपरिहार्य कारणामुळे एकटे आले होते त्यांना वऱ्हाडी व मामाची भुमिका देण्यात आली होती ती त्यांनी उत्कृष्ठ निभावलीही.
आपल्या सौभाग्यवतीस दुखणाऱ्या गुडघ्यावर बसून प्रोपोझ करणारे हिम्मतवान मित्र, त्यांच्या वेगवेगळ्या शैलीत पण प्रेमाने मागणी घालत होते. पण बऱयाच जणांना उठण्यासाठी सौभाग्यवतीच्याच हाताची गरज पडत होती. काहींची फजितीही झाली. हा पुढचा धोका ओळखुन काही हुशार स्वावलंबी मित्रांनी मात्र उभे राहूनच मागणी घालणे पसंत केले .
असा अद्वितीय *कामसू*??? नवरा शोधून सापडणार याची प्रत्येक वधूस मनोमनी खात्री असल्याने सर्वं अगदी तत्परतेने, “*हो बर हो!!*, तुमच्याशीच लग्न करण्यास अगदी तय्यार आहे.” असा सुस्पष्ट खणखणीत तोंडी होकार दिल्यावरच मंचावरचे फरची टोपी घातलेले लाल झब्बा घातलेले गृहस्थ (अस्मादिक ) ध्वनी मुद्राकीत मंगलाष्टकांची सुरुवात करण्यास परवानगी द्यायचे. मंचावर गर्दी नको आणि पुढे गर्दी हवी म्हणून फक्त्त पाच सहा जणांना मंचावर येण्यास परवानगी देण्यात आली होती.
हार नेमका केव्हा आणि प्रथम कुणी घालायचा याची पूर्ण सुचना दिली असली तरी काही मित्रांनी प्रथम हार घालून स्त्री शक्तीस अभिवादन केले असले तरी सभागृहात असलेल्या महिला वर्गाने त्यांना त्वरित सुधारणा करायला लावली आणि रूढी जपण्याचा प्रयत्न केला. स्त्रीच स्त्रीला मागे खेचते! असो.
वारकरी संप्रदायात एकमेकांना माउलीचेच रूप मानतात, म्हणून संबोधनही माऊली म्हणूनच करण्याची प्रथा असल्याचे स्पष्टीकरण देऊन एका वारकरी देवभक्त मित्रांने, ” माऊली तू मला संसारात साथ देशील का? हा संसारसागर सोबतीने पार करशील का?” असे प्रेमाने म्हणून बायकोला प्रपोझ केले होते.
माझ्या मनात मात्र वेगळाच विचार आला. “जेव्हा नवरा जेव्हा चुकीचे वागतो जसं बायकोचा वाढदिवस विसरणे, तिने केलेल्या व्यंजनाचे कौतुक न करणे, लवकर येईल असे सांगून उशिराने घरी येणे, तेव्हा ती जो रौद्र अवतार घेते, त्यास पाहून तो नतमस्तक होतो आणि तिच्यात साक्षात जगदंबेचे रूप त्यास दिसते तेव्हा नतमस्तक होऊन तो म्हणतो,
“आई जगदंबे नारायणी तू दया कर..तुझ्यावर निस्सीम भक्ती असलेल्या भक्तांस माफ कर.”
अशा क्वचित प्रसंगी बायकोला देवी स्वरूप मानून आई म्हणल जात असलं तरी प्रत्यक्षात तिही खरोखर आईसारखीच नवऱ्याची काळजी करत असतें.”
तदैव लग्न… सुरु झाल्यावर तीन वेळा सावधान असा इशारा दिल्यावरही ही मंडळी लग्न कसे करतात ? याच कोडं आयुष्यात ब्रम्हचारी राहिलेल्या एका मित्रास पडला होता.असो..
एकमेकांच्या गळ्यात सुंदर टवटवीत फुलांची माळा घालताना त्या दोघांना आनंदाच्या स्मृति आठवत होत्या. काहींना आनंदाश्रुही आलेले दिसले. या अश्रूबाबत खाजगीत ते खरे की खोटे वा सुखाचे की दुःखाचे यावर शाब्दिक कोट्या करत हास्याची कारंजी उडत होती.
वरवधुवर गुलाबाच्या कोमल पाकळ्यांचा वर्षाव होत होती.
सुखद भूतकाळ हा आनंद देणारा असतो तो पुन्हा अनुभवता यावा यासाठीच हा आगळा वेगळा कार्यक्रम या आमच्या शाळेच्या स्नेहमिलनाच्या सोहळ्यात आयोजित केला होता.
हार घातल्यावर खरी कसोटी होती उखाण्यात नाव घेण्याची!!!! प्रत्यक्षात अग आणि आहो ही दोन संबोधन वापरणारी ही मंडळी नाव घेताना पाहून मज्जा येत होती.यात सर्वं जण विशेष प्राविण्यात पास झाले महिलावर्ग यात सरस ठरला असला तरी हम किसीसे कम नही!! हे वराराजांनी दाखवून दिले.अर्थात पुलंच्या असामी असामीतील बेमट्याच्या बायकोने घेतलेले त्याच्या तोडीस तोड उखाणे काही मित्रांनी घेतले आणि ते मुक्तछंदात असल्याचा त्यांचा दावा होता त्यांनाही टाळ्या मिळाल्यात.
जे उखाणे अर्थपूर्ण आणि गेय होते त्या बद्दल आतल्या गोटाच्या सूत्रांकडून हे उखाणे त्यांच्या सौभाग्यवतीनी रात्रभर पाठ करून घेतल्याची अफवा पसरली होती.
काही उखाणे इतके अप्रतिम होते की त्याचे कॉपी राईट्स नक्की उंच भावात विकले जातील.याची खात्री आहे. या सर्वांसाठी उखाणे झाल्यावर जोरदार टाळ्या होत होत्या.
मी लिहीता झाल्यापासून गेली दोन तीन वर्ष माझ्या कविता ऐकून कंटाळलेल्या माझ्या बायकोने कवितेत उखाणा घेऊ नको असा मला सज्जड दम दिला असला तरी माझेकडून क्वचितच होणारी तिची अवज्ञा तिच्याच कौतुकासाठी करून तीन कडव्याचा, स्वाती याच शब्दावर श्लेष साधतं उखाणा मी कवितेत घेतलाच!!
“स्वाती नक्षत्राच्या पावसात
शिंपल्यात भरतो
तेजस्वी शुभ्र मोती..
स्वाती माझे सरकार,
आजी झाली तरी
नक्षत्रासम देखणी..”
या कडव्याने सांगता केली होती. खरं सांगतो, बासष्ट वर्षाचा झाल्यावरच बायकोचे सर्वासमोर कौतुक करण्याचे धैर्य आले आहे. नाहीतर “बायकोचे ताटाखालचे मांजर” या शब्दप्रयोगाचा धसका तमाम नवरे मंडळींनी घेतला असल्याने कौतुकास पात्र असल्या तरी सर्वासमोर बायकोचे कौतुक टाळले जात असे. मी ही त्यास अपवाद नव्हतो असो.
काहीजण मात्र डायरेक्ट नाव सांगून फ्री होत असले तरी त्यांच्या ते उच्चारण्याच्या पद्धतीवरून संसारात कोण बॉस आहे? ती की तो? हे सुजाण प्रेक्षक मित्र अचूक ओळखून होते.
मी बायकोला उखाण्यात सर्वा समक्ष तू आजी झाली असे म्हणून अप्रत्यक्ष तिच्या वयाचा उल्लेख करण्याची हिम्मत दाखवली याबद्दल सर्वसमक्ष माझे मित्रानी मंचावर केलेले विशेष कौतुक व बायकोला न घाबरणारा वीरपुरुष संबोधून केलेल्या सत्काराने निर्माण झालेले वादळ रूममध्ये आल्यावर मला चांगलेच महागात पडले. शेवटी दोन गोड नातवाच्या आजीस नेहमी प्रमाणे शरण जाऊन माझा वीर असल्याचा दावा किती खोटा आहे हे तिला समजावत शरण गेलो.
😄😄😄
असा हा तेवीस जोडप्यांचा अद्भुत अभूतपूर्व सामूहिक विवाहसोहळा सर्वं मित्रांच्या साक्षीने पार पडला.मलाही काहीतरी लिहिण्यास विषय मिळाला.
*आनंद नाचला!!*
(चाल: लग्नाला जातो मी)
स्नेहमिलना गेलो आम्ही
इगतपुरीच्या रिसॉर्टला llधृll
मित्रांनी घातला घाट
त्यांच्यामुळे पुन्हा परत
सुंदर क्षण तो सुदिन
तो मनी आठवला.. १
मस्तकी पगडी लाल
झब्बा शोभे लाल छान
साठीचा तोच राजकुमार
तिज परत भावला.. २
तिच्यामुळे तो भाग्यवंत
मागे उभी म्हणुनी यशवंत
उंचसखल जीवन प्रवास
आनंदी सुखी जाहला.. ३
नटून थटून ती आज
गजरा माळे गळा साज
घेऊनी उखाणा गेय
यमक अचूक साधला ..४
धरा सारी हिरवीगार
श्रावणाची मधून सर
सप्तश्रुंगीचे दर्शनाचा
योग तो जुळला.. ४
मागे फिरे कालचक्र
तरुण सर्वांचे मन
सर्वांच्या मनोमनी
थुई थुई आनंद नाचला.. ५
सर्वीकडे आनंद ओसंडून वाहत होता होता…. अगदी बालकविच्या कवितेतील वर्णन केलेला निर्मळ आनंद इगतपुरीला रेनफ़ॉरेस्ट मध्ये मुक्कामी होता.
*”आनंदी आनंद गडे*
*इकडे तिकडे चोहीकडे!!!”*
टीप : आधीच्या लेखातील हु. हु.ची पू. पू. झाली म्हणजे “हुजूर हुकमाची पूर्तता पूर्ण” झाली.