Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

आषाढ पाऊस अंधार ढवळे

डॉ. विनायक भावसार जुलै 19, 2026 1 minute read
0
gumohor-water
पूजा भडांगे, सुरपाखराच्या थव्यातल्या एवढीच ओळख. माझा मित्र श्रीधर जहागीरदार यानं त्यांची एक कविता मला पाठवली (शीर्षक नसलेली) *आषाढ पाऊस अंधार ढवळे* अशी पहिली ओळ असलेली.
मी कविता लगेच वाचली. आवडली, परत परत वाचली, आणि श्रीधरनं सुचविल्याप्रमाणे कवितेवर लिहायचं ठरवलं.
कविता मला जशी उमगली ते रेखाटलं आहे. आवडतं का पहा!
****
आषाढ पाऊस अंधार ढवळे 
कोणती वेदना प्राणास विसळे?
थेंबथेंब जीव साचला देहात 
उरात मावेना विषण्ण एकांत
सैलावला मोह पाण्यात सोडून 
वल्हव दुःखाला हात लांबवून
वाऱ्याच्या उरात वादळी वेदना
मातीच्या पायांना पैंजण सोसेना..
कागदी पाऊस शाईत निथळे 
अशात कविता भलती उजळे.. 
मिटून पापणी आठवू कुणाला? 
दुःखच पुरते एकाकीपणाला..
आषाढ मनाच्या मातीत कोसळे 
त्यातून उमले सुगंधाचे तळे..
वेढून अंधार वेचिला काळोख
अशांत कविते! दाखव ओळख..
– पूजा भडांगे
**********
पंचेंद्रियानं निसर्ग समजतो. ऊन वारा, वादळ, वीज-कल्लोळ, पावसाच्या सरी, धो धो बरसात, हिरवळ, वृक्षवल्लरी, दरवळ… अनुभवत असतो, पण त्याचं खरं उमजणं 'आत' होत असतं. मनात त्याचे तरंग उमटतात, आणि तिथं अर्थघटन उमलतं जातं, अनुभूती घडत असते. आणि ते सारं कवितेतून उतरत असतं.
अशीच एक कविता *पूजा भडांगेंची,* माझ्या समोर आहे. मला ती कशी उमगली, ते असं…
कवि-मानसाला आषाढातला पाऊस वेगळी अनुभूती देत असावा. श्रावणातला पाऊस वेगळं सांगत असावा. 
आषाढ पाऊस अंधार ढवळे 
कोणती वेदना प्राणास विसळे?
  
आषाढातला पाऊस अंधार ढवळून काढत असतो. अंतस्थ वेदनेचा आणि पावसाचं नातं असावं. कवि-मनात कुठली तरी ढवळून काढणारी वेदना जागी होते. वेदनेची तीव्रता दर्शवितांना 'वेदनेनं प्राण विसळून जाणं' ही खरंच अद्भुत मांडणी! स्वयंपाक घरातली ही रोजची प्रक्रिया कवितेत अशी बसू शकते, खरंच स्तुत्य. इथूनचं कवयित्रीचं वेगळेपण जाणवायला सुरुवात होते. मनाच्या कोप-या कोप-यातल्या वेदनेचा ठाव घेणं की! ते प्रत्ययास येणं या आषाढ पावसातून, व्वा!
थेंबथेंब जीव साचला देहात 
उरात मावेना विषण्ण एकांत 
थेंबथेंब जीव साचलं जाणं हे रुपकही वेगळंच! अनुभवाचे थेंब, ते तर साचत जातात… पण तेही (की तेच?) जाणवून देतात एकलेपणा, आणि त्याची विष्ण्णता. 'विषण्ण एकांत' किती अंतर्मुख करणारा शब्द वापरला आहे. व्वा! 
सैलावला मोह पाण्यात सोडून 
वल्हव दुःखाला हात लांबवून
मोहाला बाजूला सारून प्रवाहात वल्ल्व्हत राहणं भाग असतं. इथंही दुःखाला वल्हवणं ती कल्पनाच किती बोलकी! दुःखातूनही मार्ग निघेल, दुःखाचा स्वीकार आणि त्या सहाय्यानं चल पुढे, हा वेगळाच विश्वास डोकावतो आहे, कवितेतून. 
वाऱ्याच्या उरात वादळी वेदना
मातीच्या पायांना पैंजण सोसेना..
वेदना कशी सार्वत्रिक आहे हेच जाणवतं या ओळींतून. किंबहुना कवयित्रिचं संवेदनशील मन निसर्गातली वेदना टीपतं. वा-याच्या मनातही गडद अशा वादळी वेदना. कदाचित कवयित्री आपल्याच वेदना या वा-यात अनुभवत असेल. मातीच्या पायात पैजणे, तीही वेदना दायक…
निसर्गातही कवयित्रीच्या वेदना घर करून बसल्या आहेत.
कागदी पाऊस शाईत निथळे 
अशात कविता भलती उजळे.
शाईतून निथळणारा कागदी पाऊस, सुंदर कल्पना. किती छान शब्द योजन. यातून येणारी उजळ कविता, एक मोठा आशावाद!
मिटून पापणी आठवू कुणाला? 
दुःखच पुरते एकाकीपणाला.. 
एकाकीपणाचं दुःख आपणच सहन करायचं असतं. आठवणी कुणाच्या? कशासाठी? हा नैराश्याचा सुर निश्चितच त्रास देणारा…
आषाढ मनाच्या मातीत कोसळे 
त्यातून उमले सुगंधाचे तळे.. 
आषाढाचा पाऊस मनाच्या मातीत कोसळतो आणि त्यातून चौफेर पसरणारा मृद्गंध. एरवी दरवळ जाणवत असतो फक्त इथं तर त्याचं रुपांतर दृष्टिगोचर तळ्यात करून हा आनंद अधिक गडद केला आहे.
वेढून अंधार वेचिला काळोख
अशांत कविते! दाखव ओळख.. 
अंधारा वेढून काळोख गोळा करणं हे किती सखोल वर्णन आहे त्या अनुभवलेल्या तिमिराचं, तेही अशांत चित्तातून अवतरलेल्या कवितेतून. 
कवयित्रीची ओळख पटते आपल्याला. एक संवेदनशील मनाच्या धनी, निसर्गाशी गुंफलेल्या, आषाढाच्या पावसातून व्यक्त होणा-या!
पूजाजींचे शब्द, हळुवार, मोजून मापून मांडलेले, चपखल आणि कवितेत गहिरा अर्थ भरणारे!
 
अभिनंदन, पूजाजी.
१९ जुले २०२६#सुरपाखरू
#३०दिवसात३०
#प्रयोग२०२६
#जुलै२०२६

लेखक

  • डॉ. विनायक भावसार

    सूरतच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधून निवृत्त प्राध्यापक, फाॅरमॅकोलाॅजी विषयाचा; वयाच्या ७१ वर्षापर्यंत वेगवेगळ्या मेडिकल कॉलेजमध्ये कार्यरत.

    सूरत, इंदौर आणि मंडी ( हिमाचल प्रदेश) इथं आलटून पालटून वास्तव्य.

    वैज्ञानिक विषय आणि मराठी साहित्यात आवड आहे, थोडं फार लिखाणही करीत असतो. काही रचना पुरस्कृत. मागच्या वर्षी 'संस्कृतीचे अवशेष' हा अनुवादित कवितासंग्रह (अष्टगंध प्रकाशन ठाणे) प्रकाशित.

    संपर्क 8889500322
    bhavsarvinayak4@gmail.com

Post navigation

Previous: पुस्तकाचे सौंदर्य
Next: वृत्तांत
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.