आपल्या घरच्या झाडाच्या पालापाचोळ्याला आपण कचरा समजतो का? तो पालिकेच्या कचऱ्याच्या गाडीत टाकून देतो का?
खरं तर निसर्गाच्या दृष्टीने तो कचरा नसतो.
आपण जर असे करत असू, तर त्यामुळे त्याचा भार पालिकेवर तर वाढतोच आणि कचऱ्याचे मोठमोठाले डोंगर सुद्धा तयार होतात.
आम्ही स्वतः जेव्हा तो झाडांमधे टाकायला लागलो तेव्हा हा काय कचरा झाडांमधे टाकताय म्हणून माळी म्हणायचा आणि ते सर्व तो काढून टाकायचा. मी पुन्हा पुन्हा झाडांची पडलेले पाने झाडांच्या आजूबाजूला टाकायला लागलो. नंतर माळीसुद्धा कंटाळला आणि त्याने ते जैसे थे राहू दिले.
उगाच झाडाचे पाने गळत नाहीत. तर ते निसर्गाचे कामच आहे. पानगळीच्या वेळेस तर ते पूर्णच गळतात. आणि नंतर झाडांना नवीन पालवी येते. ते जे सर्व गळलेले पाने असतात त्यामुळे रणरणत्या उन्हाळ्यात सुद्धा झाडांना खुप जास्त पाण्याची गरज नसते. त्या पालापाचोळ्यामुळे जमिनीचा ओलावा टिकून तर राहतो. आणि ती पाने मातीशी एकरूप होऊन मातीचा दर्जा सुद्धा वाढवितात. आपण जर शेतकऱ्याकडे बघितल तर असेच काही बघायला मिळेल. तो सुद्धा उन्हाळ्यामध्ये जमिनीचा ओलावा टिकून राहण्याकरिता हे सर्व करतो.
प्रत्येकाला त्या पानांपासून खत बनविणे वेळेअभावी शक्य नसते. पण निसर्गाचा चमत्कार कधी जर आपण लक्षात घेतला तर, जेव्हा त्या पानांवर पाऊस पडतो त्याच्या काही दिवसात ती पाने मातीशी एकरूप व्हायला लागतात. ती कुजायला लागतात. आणि त्यामुळे विविध प्रकारचे घटक मातीला मिळून ते झाडांना उपयोगी पडतात. एरवी आपण झाडाला पाणी टाकतांना ती पाने कुजायला बरेच दिवस लागतील. शेवटी पाणी हे पाणीच. मग पावसाच्या पाण्यात असे काय असते हा मोठा प्रश्न आहे.
फक्त पाऊसपाणी एवढेच नाही तर पाऊस म्हणजे पाणी, सततचा ओलावा, हवामान, पावसाळ्यातील मृदाजीव, बऱ्याच प्रकारचे सूक्ष्मजीव यामुळे झाडांमधे टाकलेला पालापाचोळा लवकर कुजतो.
शेवटी काय तर झाडे, माती, त्यांना चांगले पोषण देणारे त्यांचीच पाने, विविध प्रकारचे मृदाजीव, सूक्ष्मजीव ही एक साखळी आणि एक सभ्यता आहे जी एकमेकांना पूरक असे आहे. हे सगळे एकमेकांवर अवलंबून आहे. फक्त आपण मनुष्याने ही जाणीव ठेऊन वागले तर भले मनुष्याचेच आहे.