आमची प्रतिक्रिया अर्थातच- 'हॅ ! यात काय एवढं विशेष?' अशी. मधल्या सुट्टीत फुटबॉलच्या मैदानावर पाऊल ठेवणारा पहिला मुलगा कोण असेल, यात आम्हाला अधिक रस होता.
पुढे इयत्ता सातवीत असताना, जेव्हा मी पीटर रायन यांचे The Story of Apollo 11 हे पुस्तक वाचायला सुरुवात केली, तेव्हा कुठे मला चांद्रमोहिमेचे महत्त्व आणि भव्यता उमजू लागली.
चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला माणूस म्हणून नासाने (NASA) मुद्दाम नील यांची निवड केली होती, असा एक सर्वसाधारण समज आहे; पण त्यामागची कारणे अधिक व्यावहारिक होती. ते 'अपोलो-८' मोहिमेच्या 'बॅकअप क्रू'मध्ये (पर्यायी पथकात) होते आणि मोहिमांच्या रोटेशन पद्धतीनुसार ते 'अपोलो-११'चे कमांडर बनले; योगायोगाने हीच मोहीम चंद्रावर उतरण्याची मोहीम ठरली. आर्मस्ट्राँग स्वतः नेहमीच म्हणत की, चंद्रावर उतरण्याचे काम कदाचित 'अपोलो-१०' किंवा 'अपोलो-१२'च्या पथकानेही केले असते.
आर्मस्ट्राँग यांच्याबद्दल मला आदर वाटण्याची आणखी दोन कारणे होती.
पहिले म्हणजे, ते अत्यंत शांत स्वभावाचे (ice-cool guy) होते. एक 'टेस्ट पायलट' म्हणून, अंतराळाच्या सीमेवर 'X-15' जेट विमानांची चाचणी करताना त्यांनी अनेकदा आपल्या जीवाची बाजी लावली होती.
'जेमिनी-८' (Gemini 8) मोहिमेदरम्यान, त्यांचे अंतराळयान एका धोकादायक स्थितीत सापडले आणि एका सेकंदाला एक फेरी या वेगाने गरगर फिरू लागले. बेशुद्ध पडण्याच्या स्थितीत असतानाही, आर्मस्ट्राँग यांनी अत्यंत कौशल्याने अंतराळयानावर नियंत्रण मिळवले.
चंद्रावर उतरण्याची मोहीमही काही सोपी नव्हती. सुरुवातीलाच, चांद्रयानाच्या संगणकावर कामाचा अतिताण (ओव्हरलोड) आला आणि त्याने धोक्याचे इशारे (अलार्म्स ) देण्यास सुरुवात केली. आर्मस्ट्राँग यांनी खिडकीतून बाहेर पाहिले आणि त्यांच्या लक्षात आले की, यानाची मार्गदर्शक प्रणाली (गाइडन्स सिस्टम) त्यांना थेट एका भल्या मोठ्या विवरात घेऊन जात होती. चांद्रयानाचे नियंत्रण स्वतःच्या हातात घेऊन, आर्मस्ट्राँग यांनी यान सुरक्षित जागेकडे नेले. असे करत असताना आणखी एक समस्या उद्भवली: इंधन संपत आले होते. काही अत्यंत तणावपूर्ण मिनिटांनंतर, इंधन संपायला अवघे १५ सेकंद शिल्लक असताना आर्मस्ट्राँग यांनी यान चंद्रावर सुरक्षितपणे उतरवले, आणि मानवी इतिहासातील ते अजरामर उद्गार काढले: Eagle has landed.
चंद्रावर चालणे (मूनवॉक) पूर्ण केल्यानंतर, जेव्हा आर्मस्ट्राँग आणि आल्ड्रिन चंद्राच्या पृष्ठभागावरून परत उड्डाण करण्याच्या तयारीत होते, तेव्हा त्यांच्या लक्षात आले की इंजिन सुरू करण्यासाठी आवश्यक असलेला 'सर्किट ब्रेकर' तुटला होता. तो उपलब्ध नसल्यास त्यांना चंद्रावरच अडकून पडावे लागले असते! परंतु समयसूचकता दाखवून, सर्किट पूर्ण करण्यासाठी, त्यांनी फाउंटन पेनच्या निबचा वापर केला आणि चंद्रावरून यशस्वीरीत्या उड्डाण केले.
आर्मस्ट्राँग यांच्याबद्दल मला आदर वाटण्याचे दुसरे कारण म्हणजे प्रसिद्धी टाळण्याचा त्यांचा निर्णय.
चंद्रावरील ऐतिहासिक लँडिंगनंतर, आर्मस्ट्राँग यांनी नासा (NASA) मधून निवृत्ती घेतली आणि सिनसिनाटी विद्यापीठाच्या 'एरोस्पेस इंजिनिअरिंग' विभागात अध्यापनाचे काम स्वीकारले. त्यांनी क्वचितच मुलाखती दिल्या आणि फार कमी सार्वजनिक भाषणे केली. अंतराळवीर म्हणून मिळालेल्या प्रसिद्धीचा झोत आर्मस्ट्राँग यांना अजिबात आवडत नसे.२००९ मध्ये अमेरीकन सिनेटचा सर्वोच्च बहुमान स्वीकारल्यानंतर आर्मस्ट्राँग यांनी केलेले भाषण हे त्यांच्या प्रचंड अभ्यासू बुद्धीचे आणि नम्रतेचे उत्तम उदाहरण आहे.
अशा या अंतराळवीराचे २०१२ मध्ये निधन झाले. आपल्या प्रसिद्धी-पराङ्मुख स्वभावाला साजेसे वर्तन ठेवत त्यांनी स्वतःचे आत्मचरित्र लिहिले नाही. परंतु आपल्या सर्वांसाठी सुदैवाची गोष्ट म्हणजे, जेम्स हॅन्सन यांना त्यांचे अधिकृत चरित्र लिहिण्याची परवानगी दिली.
नील आर्मस्ट्राँग आज माझ्या घरच्या लायब्ररीत या पुस्तकाच्या रूपाने आहेत असेच मी मानतो.