पराधीन आहे जगती
दैव जात दु:खे भरता,दोष ना कुणाचा
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा।
ग.दि.मा.
गीत रामायणातील हे काव्य आयुष्याचे मर्म सांगणारे,जगण्याला बळ देणारे आणि संपूर्ण रामायणाचे सारच या काव्यात सामावले आहे.ग.दि.माडगुळकरांनी लिहीलेल्या या काव्याचा सारांश असा आहे की ,या जगात मनुष्य नशिबाच्या अधीन आहे आणि स्वतःच्या सुखदुःखासाठी तो पूर्णपणे स्वतंत्र नाही.मानवी जीवनातील दु:खे , परिस्थिती आणि घटना या पूर्वसंचितावर किंवा दैवावर अवलंबून असतात, त्यामुळे घडणाऱ्या वाईट गोष्टींसाठी कोणालाही दोष देण्यात अर्थ नसतो.पराधीनता चा अर्थ हेच सांगतो की माणूस जगामध्ये स्वतंत्र नसून परिस्थिती,दैव किंवा नियतीच्या अधीन आहे.
दैवजात दु:खे म्हणजे आयुष्यात मिळणारे दुःख हे नशिबाने ठरवलेलं असतं. पूर्वसंचिताचा अर्थ जीवनातील सुखदुःख हे आपल्या मागील कर्माचे फळ आहे.नश्वरता म्हणजे जगातील सर्वच गोष्टी नाशवंत आहेत त्यामुळे क्षणभंगुर गोष्टींसाठी शोक करणे व्यर्थ आहे.भरत भेटीच्या वेळी श्रीरामांनी भरताला धीर देताना हे सारगर्भीत तत्वज्ञान सांगत आहे.
माता कैकयी ना दोषी नव्हे तात
राज्य त्याग कानन यात्रा ,सर्व कर्मजात
खेळ चाललासे माझ्या पूर्व संचिताचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा
माता कैकयीही दोषी नाही आणि आमच्या वडिलांचीही चूक नाही .राज्य,काननयात्रा, सर्व कर्मजात राज्य सोडून जंगलात जाणे हे माझ्या पूर्व कर्माचे फळ आहे. यात कुणाचाही दोष नाही कारण नियतीने माझ्या नशिबात तेच लिहिले आहे.आपल्या सर्व तिच्या अधिन आहोत.
' अंत उन्नतीचा पत्नी होई या जगात
सर्व संग्रहाचा वत्सा नाश हाच अंत
वियोगार्थ मीलन होते ,नेम हा जगाचा
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा
जन्म, जन्म आणि जन्म एकत्र येणे भासते सारे विश्व नाशवंत .या विश्वात जे काही पाहते ते शेवटी निघून जाते त्याचा काय शोक करिसी वेड्या?जे केवळ भ्रम आहे त्याबद्दल कशाला शोक करता ?हा सर्व भ्रम आहे.एक स्वप्न आहे वियोग होण्यासाठीच आपण एकत्र येतो हा जगाचा नियमच आहे त्यात तू वाईट वाटून घेऊ नकोस.कुणालाच दोष पण देऊ नकोस म्हणूनच,जिवासवे जन्मे मृत्यू,जोड जन्मजात दिसे भासते ते
सारे विश्व नाशवंत काय शोक करीसी वेड्या स्वप्निंच्या फळांचा?'
' तात स्वर्गवासी झाले,बंधु ते वनात
अतर्क्य ना झाले काहीं,जरी अकस्मात
मरण कल्पनेशी थांबे तर्क जाणत्यांचा '
आपले वडिल गेले आणि तुझा बंधु या जंगलात भेटला हे जरी अकस्मात घडले असले तरी अतर्क्य मुळीच नाही .परंतु चांगले चांगले मोठे लोक या घटनांनी बावचळून जातात.परंतु तू हे जाणून घे या जगात मानव पराधीन आहे त्यांच्या हातात काही नाही.
' जरा मरण यांतून सुटला कोण प्राणिजात?
दु:खमुक्त जगला का रे कुणी जीवनात?
वर्धमान तें तें चाले मार्ग रे क्षयाचा '
म्हातारपण आणि मृत्यू यातून कुणी सूटला आहे का?कुणाची दु:खातून सुटका झाली आहे का?
जन्माला येतो तो अखेर हे शरीर भिरकावून परत जन्म घेतो त्यासाठी दु:ख ते कशाला जर हे शरीरच नाशवंत आहे प्रत्येक गोष्ट नाशवंत आहे त्यासाठी दु:ख करू नये यातून सर्वच दिवस सारखे नसतात सुखानंतर दु:ख आणि दु:खानंतर सुख हे निश्चित आहे . सदासर्वकाळ टिकून राहिल असं काहीच नाही.त्यातून आपण नियतीच्या हातातील भावलं !
' दोन ओंडक्याची होते सागरात भेट
एक लाट तोडी त्यांना, पुन्हा नाही गांठ
क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसांचा
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा '
दोन ओंडके सागरात एकमेकांना भेटतात काही काळ बरोबर चालतात पण एक लाट येते आणि त्यांना दूर करते तसेचं या जीवन रुपी सागरात दोन लोक भेटतात परंतु नियती त्यांना वेगळे करते कारण मनुष्य हा तिचा गुलाम आहे.
' नको आंसू ढाळु आता पूस लोचनास
तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास
अयोध्येत हो तू राजा,रंक मी वनीचा
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा '
तू दु:खाश्रू आवर आणि डोळे पूस कारण तुझा आणि माझा यापुढे वेगवेगळा प्रवास आहे.तुला अयोध्येचा राजा होशील आणि मी मात्र एक गरीब वनवासी.कारण नियतीनेच ते ठरवले आहे ,आपण सर्व तिचे गुलाम आहोत.
' नको आग्रहाने मजसी परतवूस व्यर्थ
पितृवचन पाळून दोघे होऊ रे कृतार्थ
मुकुट कवच धारण करि कां वेष तापसाचा
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा '
तू उगाच मला परतण्याचा आग्रह करू नकोस त्यापेक्षा पित्याला दिलेल्या वचनाचं आपण दोघेही पालन करू आणि त्यातच धन्य होऊ.मस्तकी मुकुट धारण कर हा काय तपस्वीचा वेष धारण केला आहे.आपण सर्व नियती ठरवेल त्याप्रमाणेच वागणं उचित आहे.
' संपल्याविना ही वर्षें दशोत्तरी चार
अयोध्येस नाही येणे सत्य हे त्रिवार
तूच एक स्वामी आता राज्य संपदेचा
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा '
जोपर्यंत १४वर्ष पूर्ण होणार नाही तोपर्यंत मी अयोध्येला परत येणार नाही हे त्रिवार सत्य तू जाणून घे .आता तूच राज्याचा स्वामी आहे आणि हाच नियतीचा निर्णय आहे आपल्या हातात काही नाही.
' पुन्हा नका येऊ कोणी दूर या वनात
प्रेमभाव तुमचा माझ्या जागता मनांत
मान वाढवी तू लोकी अयोध्या पुरीचा
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा '
परत परत इतक्या दूर या वनात मला भेटायला येऊ नको .तुझं प्रेम माझ्या हृदयात बसलं आहे.त्यापेक्षा अयोध्येत राज्य करून तिचं वैभव वाढव आणि न्यायाने राज्य करून लोकप्रिय हो.जा आता आपल्या हातात काही नाही.हे समजून घे आणि नियतीच्या इच्छेनुसार आपण जीवन व्यतीत करत असतो .हेच सत्य आहे त्यात कुणाचाच काही दोष नसतो.हा संदेश सर्व मानव जातीला पण मार्गदर्शन करणारा आहे !
वडिलांच्या मृत्यूची वार्ता ऐकून,माता कैकयीची निर्भत्सना करून जीवापाड प्रेम असलेल्या ज्येष्ठ भावाची भेट घेण्यासाठी ,त्यांना अयोध्येत परत नेण्यासाठी भरत आर्जव करत आहेत.त्याची समजूत काढताना श्रीराम म्हणतात,जे घडलं त्याचा दोष कोणालाही देऊ नकोस.प्रत्येकाला आपले प्रारब्ध भोगावेच लागतात.जन्म मृत्यू आपल्या हातात नाही, परंतु जन्म आणि मृत्यू यामधील मिळालेलं आयुष्य सार्थकी कसं लावायचं ते आपल्या हातात आहे.तू शोक करू नकोस.
विचार करण्यासारखी गोष्ट आहे ज्याच्या हाती सा-या विश्वाची सूत्रे आहेत ती दूस-याच्या हाती सोपवून स्वतःला पराधीन मानणं 'हे किती प्रेरक आहे.खास करून या कलियुगात केवळ खुर्चीवर प्रेम करणारे आणि सत्तेसाठी लढणारे लोक ! संपूर्ण विश्वात जणू शत्रूत्वाची आग पसरली आहे. वास्तव स्वीकारणे अतिशय अवघड आहे.' रामाचं नुसतं नाव घेतलं तरी पाप हरण होतं 'अस जे म्हणतात ते उगाच नाही.!
भ्रमणध्वनी -९३२९७३६६७५