पाल्हाळ हे माझ्या लिखाणाला मिळणारं, वाचकांचं आवडतं विशेषण झालंय. पसरट झालं आहे, लांबलं आहे, थोडं संपादित असतं तर बरं, असे प्रतिसाद; तीन तास लागले, आणि संपवलं एकदाच, असाही अभिप्राय असतो.
….आणि मी विचार करता झालो.
आणि आठवला मला प्रवास हिमाचलातला. इन मिन तीन तासांचा रस्ता पण चक्क पाच तास घेतलेत, परवा.
रस्ता वळणावळणाचा, अनोळखी. अरुंदही ब-याच ठिकाणी. आजूबाजूला दाट हिरवं जंगल, दूर पर्यंत पसरलेला विविध रुपानं नटलेला हिमालय, हिरव्या पिवळ्या रंगाच्या असंख्य छटा. दूरपर्यंत एका मागून पसरलेल्या हिमालय पर्वताच्या रांगा, उंच शिखरे स्पर्धा करीत एकमेकांशी, उंचीतच नव्हे तर सौंदर्यातही.
काही पांढरी शुभ्र बर्फाच्छादित. काही सूर्यकिरणात भिजलेली सोनेरी, आणि क्षणाक्षणाला रंग छटा बदलणारी, काही परावर्तित होणा-या सूर्यप्रकाशामुळे डोळे दिपवणारी. काही ठिकाणच्या हिरवळरहीत, शुष्क हिमालयाच्या रंगीबेरंगी पर्वतराशीही तेवढ्याच आकर्षित, अशीन असंख्य रूपं मनात साठून राहणारी. कुठं खालच्या खो-यात ढगांचा आणि धुक्याचं विलोभनीय महासागर.
मधेच डोंगरातून येणारे झरे. अगदी थांबून ते ओघळणारं गार, नितळ पाणी पिण्याचा मोह टाळणं कठीण.
कितीदा थांबून, निसर्गात हरवून, परत मूळ रस्त्यावर यायला विसरायलाच व्हायचं. पोहचलो मुक्कामाला थोडं उशीरा, काय बिघडतं!
जीवनातही, जीवन-प्रवास हेच सुख असतं (गंतव्य स्थान नव्हे) असं गुलजार म्हणतात, तथागतही असंच सांगून गेले आहेत.
लिखाणात असंच होत असावं. इथून निघून पटकन शेवटा पर्यंत पोहचता येईलही, पण आजूबाजूचं जे बोलावत असतं, हाका मारत असतं, त्याचं काय?
मूळ लेखाशी, असेल संबंध अगदी थोडाच त्याचा. पण थोडा विचार केला तो बळकट करायला हरकत नाही असं वाटतं आणि इथून पाल्हाळाला सुरुवात होत असावी, चूक की बरोबर माहीत नाही!
झाडाच्या एका फांदीतून दुसरी फांदी निघावी, त्यातून दोन अजून. असं होत होत झाड चहुकडे पसरायला लागतं, डेरेदार व्हायला लागतं. बुटकंच पण टुमदार, दाट हिरवंगार, छान सावली देणारं, भर उन्हातही.
विचा-यांच्या फांद्याही अशाच पसरत असाव्या, असतील दोन फांद्यांमध्ये कोंब, नवीन कल्पनांचे. कधी झाडाला हवेतली मुळही फुटतात, पुढं त्याच्या पांरब्याही होतात, झाड आणखी मजबूत बनतं, खंबीर होतं.
हो, असतात वृक्ष उंच. आकाशाला भिडणारे “सुरू” सारखे, त्यांची गोष्टंच निराळी. फांद्या छाटून, उंची वाढलेली दाखवण्यात-काही हशील असेल? वाटतं, आपली जातच बुटक्या, दुमदार झाडाची असेल, तर त्याचा उंच देवदार वृक्ष कसा होणार! असो.
हो, आपल्या या बुटक्या झाडाची थोडी काट छाट करून त्याला टुमदार पण जास्त आकर्षक करता येईल, एवढं खरं.
अरे, कुठल्या पाल्हाळात शिरलो मी! परत हरवतोय शब्दांच्या जंगलात.
प्रपंचापासून परमार्थापर्यंतचा प्रवासही असाच पाल्हाळात अडकलेला असतो का ? असा प्रश्न आज या आषाढीच्या दिवशी जाणवतो आहे…
२५ जुलै २०२६
आषाढी एकादशी
#सुरपाखरू
#३०दिवसात३०
#जुलै२०२६
#प्रयोग२०२६