समूह-स्वकीय
नमस्कार,
आज शांता शेळकेंच्या 'जाणता अजाणता' ह्या ललित संग्रहातील 'कोशातली कातरवेळ' हा लेख वाचतांना जे उमगलं, भावलं ते
__________________________
“कोशातली कातरवेळ”
शांताबाई शेळके यांचं शब्दाच्या 'अर्था'वरून केलेलं हे विचार मंथन फार आकर्षक वाटलं, त्यातून त्या एक महत्वाचा संदेश देत आहेत.
विषय साधाच आहे शब्दाचा अर्थ. शांताजी एका शाळकरी मुलीला शब्दाचा अर्थ समजावून सांगत होत्या, शब्द होता 'कातरवेळ.' मुलीच्या चेहऱ्यावरुन शब्दार्थ तिला किती समजला असेल ह्या बद्दल शांताजी साशंक. आणि इथं शांताजींच्या ध्यानी येतं की तो अर्थ तिला कळणंही शक्य नाही (तिनं समजलं म्हणत मान डोलावली तरी).
इथंच गंमत आहे, शब्दाचा शब्दकोशातला अर्थ कळणे म्हणजे खरंच अर्थ कळणे असतं का? शांताजी शब्दकोशातल्या अर्थाविषयी म्हणतात “अनुभवातल्या अर्थाचे केवळ कलेवर”.
सवयी प्रमाणे पुढचं वाचायच्या आधी मी विचार करायला लागलो (वाचता वाचता असंच काहीसं होत असतं): शब्द कानी पडतात काही अर्थ समजतो, अगोदरच्या अनुभवाशी जुळवाजुळव होते, काहीतरी विचार निर्माण होतात… भावनांचे तरंग निर्माण करतात. अगोदरच्या तरंगांशी नवीन तरंगाची जुळवाजुळव… आणि शब्द उमजतो… आत 'काहीतरी' होऊन 'बसतो' … एक नवा अनुभव. परत ऐकला तो शब्द की हा अनुभव परत उभारून येतो आपल्या भावनांना बोलकं करीत… थांबायला हवं मला इथं.
चला पुढं बघूया, शांताजी काय म्हणतात ते. हो त्या 'कातरवेळे'विषयी बोलत आहेत. त्यांच्यामते शहरात कातरवेळ अशी असतंच नाही. शहरात रात्र आणि दिवस या दोघांमधली संध्याकाळ (शांताजींनी इथं 'सांध्यसमय' असा छान शब्द वापरला आहे) नसतेच. सांध्यसमय मन उत्कंठित, भयचकित कातर करणारा. त्याचं अस्तित्व शहरांपुरतं तरी पार पुसून गेलं आहे. 'शहरी वातावरणात भावनाकुल मन:स्थितीला फारसे संवादी नसेल' हे शांताजींच निरीक्षण. (शहरातलं आयुष्य यंत्रवत, घड्याळाच्या काट्याबरोबर धावणारं, कुठं वेळ आहे इतर काही विचार करायला… 'डेड लाइन' किती योग्य शब्द, 'मृत्यू' समोर असल्याचं दर्शवणारी ही रेषा).
शांताजी म्हणतात, कातरवेळेचा अर्थ कळण्यासाठी आयुष्यातील काही दिवस तरी खेडेगांवात गेलेले असले पाहिजेत, त्या अनुभवातून गेल्यावरच कातरवेळ हा शब्द आपल्याला वेगळ्याच वातावरणात नेऊन सोडू शकतो.
इथं 'शब्दात प्राण भरला जातो, रूप, रंग, गंध प्राप्त होतात त्याला … ' 'सहस्त्रावधी अनाकलनीय संवेदनांचे फवारे उडू लागावेत, तसे काहीसे होते.' किती छान वर्णन केलंय् शांताजींनी ह्या अवस्थेचं, शब्दात प्राण भरण्याचं.
शब्दाचा अर्थ शिकवता शिकवता शांताजी पोहचतात अंधुकशा आठवणाऱ्या आपल्या शैशवात… आजोळ, तिथलं अंगण, झपाटत काळवंडत जाणाऱ्या दिशा, अंगणातल्या प्रचंड कडुलिंबाचा पूर्णसंभार, काळाकभिन्न झालेला. घरट्याकडे परतणाऱ्या पाखरांची किलबिल, अंगणातल्या तुळशीवृन्दावनात आजीनं उजळवलेली पणती, संथपणे तेवत, पिवळा उजेड भोवती सांडणारी… त्यावेळच्या खेळातल्या गाण्याचे शब्द आणि सूरही परत सजीव होत जाणं…आठवणींच्या साखळीत एक एक दुवा परत जुळत येणं… संध्याकाळचं अंगणातलं खेळणं, भोवतालचा काळोख गूढ आणि रहस्यमय… सारे खेळ तुळशीवृंदावनाच्या आसपास, पणतीच्या उजेडाच्या आसऱ्यानं… आजी भोवती जमलेले मुलांचे वेटोळे… आजीच्या गोष्टीनं, भयकंपित अवस्थेतला जीव पऱ्यांच्या, यक्ष, राक्षस, चेटकिणींच्या रोमांचकारी सृष्टीत शिरणारा… आजीजवळ सरकणं, कधी गोष्टीतल्या उत्कंठेनं तर कधी भीतीनं… मग भाकरीचा खरपूस वास… भुकेची जाणीव… जेवायला चला अशी मामीची हाक…
तर शांताजींनी लहानपणी अनुभवलेली ही कातरवेळ ही अशी होती (एका शब्दाबरोबर आठवणींची किती मोठी साखळी!)
ती मनाला उदास करणारी होती; भाबड्या आणि संवेदनशील शैशवातील उदासीनता! शांताजी सांगतात: मनाला बोच फारशी जाणवली नाही त्यावेळी. तर जाणवतं होते ते अंगणातले खेळ, मित्र-मैत्रीणी आणि भावंडांबरोबर घातलेला धांगडधिंगा, आजीच्या रोमांचकारी गोष्टी आणि ती रुचकर बाजरीची भाकरी. कातरवेळेची हुरहूर तेव्हा जाणवली नाही.
आजोळ सुटल्यावर, अभ्यासासाठी पुण्यात राहायला लागल्यावर तिथल्या परक्या आणि पारख्या जागी मन फारसे रमत नसल्याचं आणि आजोळची उत्कट ओढ लागून राहिल्याचं, आजीची खंत येण्याचं वर्णन शांताजी करतात. पुढं त्या जे सांगतात त्यातून कातरवेळ म्हणजे काय ते आपल्याला जाणवतं.
सुटीत आजोळी जाणं व्हायचं. अर्धी सुटी आनंदात जायची गप्पागोष्टीत, हसण्या खेळण्यात, हमखास होणाऱ्या कौतुकात हे आजोळचे दिवस भरभर जायचे. निम्मी सुटी गेली की मग मात्र मन उदास व्हायचं. दिवसाची उलट मोजणी सुरु व्हायची आणि दिवसागणिक मनाची खिन्नता वाढायची. ( मला वाटतं ही उलट मोजणीच व्याकुळ करणारी असते). संध्याकाळ व्हायला लागली, सावल्या दाट व्हायला लागल्या की अबोध उदासीनतेनं काळीज पिळवटून निघण्याचा अनुभव शांताजी सांगतात आणि कातरवेळेची हुरहूर त्यावेळी प्रथम जाणवल्याचं शांताजी म्हणतात. पुढंच्या वर्णनात हा अनुभव आपल्या पर्यंत खोलवर पोहचवतात शांताजी.
एका बाजूला, काळोख एक प्रचंड अजगरासारखा भासणारा, उरला सुरला प्रकाश आपल्या जिभांनी चाटून घेणारा, पुढेपुढे सरकत असणारा.. तिकडे वृंदावनात तेवणारी पणती, तिच्या पिवळ्या उजेडानं मनात खोल कुठेतरी तरी विचित्र कालवाकालव होत असल्याचं आणि वातावरणात विलक्षण एकाकीपणा जाणवल्याचं शांताजी सांगतात. घरात माणसं होती, पण विलक्षण एककीपणा जाणवल्याचं आणि त्या एकट्याच स्वत:च्या आपल्या व्यथेत चूर होत राहण्याचंही शांताजी सांगतात. त्या आर्त कातरवेळेचा अजूनही विसर न पडल्याचा शांताजी उल्लेख करतात. आणि त्यावेळी त्यांचं वय होतं बारा तेरा वर्षाचं. त्या संवेदनशील वयातला हा अनुभव.
(संवेदनशील वय ते, बरेच अनुभव त्या वेळी आयुष्यभरासाठी कोरले जातात; कुठल्याही कारणानं खपली निघाली की ते अनुभव ओघळायला लागतात, वेगवेगळ्या रूपानं.)
कातरवेळी आपलं मन इतके उदास का व्हावे? का भयभीत व्हावे?
शांताजी एक वेगळाच मुद्दा मांडतात.त्यांना वाटतं की अशा वेळी आपल्या काही फार गूढ, अबोध, प्राचीन स्मृती चाळवल्या जात असाव्यात. जेव्हा मांस खाणाऱ्या आणि गुहेत निवारा घेणाऱ्या आदिमानवाला रात्र ही गोष्ट भयंकर वाटत असावी. काळोख, हिंस्त्र श्वापदांच्या किंकाळ्या, दाट अरण्यातले गूढ ध्वनी, वर आकाशाचा घुमट, लक्षावधी तारकांनी भरलेला, अलिप्तपणे खाली बघत असलेला… मानवाने हे जेव्हा बघितले असावं आणि अनुभवलं असावं, तेव्हा त्याला विलक्षण एकाकी आणि असहाय्य वाटलं असावं. स्वत:च्या क्षुद्रतेची, नगण्यतेची जाणीव होत असावी. ती रात्र नकोशी वाटली असावी. संध्याकाळ येणाऱ्या येणाऱ्या रात्रीची सूचना देत असावी, आणि मग मनात एक अबोध हुरहूर दाटून येत असावी त्या आदिमानवाच्या मनात…
शांताजी म्हणतात, आपलं मन अज्ञात पूर्वजांशी गूढ संवेदनेनं जोडलं जात असावं आपण अनुभवत असलेल्या कातरवेळी.
शांताजी असंही निदर्शनात आणून देतात की ही कातरवेळ, हे पूर्वजांबरोबरीचं नातं शहरी वातावरणात जाणवणार नाही. ती फक्त जाणवेल खेडेगावात, त्या अनुभवासाठी खेडेगावात काळ्या मातीच्या ढेकळांनी भरलेल्या शेताचा स्पर्श… निळं आकाश, वाहतं पाणी, वारा,झाडं, गवत सारं सारं अनुभवलं पाहिजे.
आज होतय काय?
झाडाचं झाडपण, फूलाचं फूलपण… शब्दांना अर्थच राहिला नाही असं वाटतं… सारं लुप्त होतय… असंच चालत राहिलं तर कशाचंच काही वाटेनासं होईल, अशी भीती त्या व्यक्त करतात. शब्द फक्त शब्द-कोशातल्या अर्थापुरतेच परिचयाचे राहतील.
शांताजींच हे विचार मंथन हे एका शब्दापुरतंच आहे असं नव्हे, असं मला वाटतं.
अनेक शब्द, शब्द-समूह, ज्यांनी गहिवरून जायला व्हायचं, आत काहीतरी हलल्यासारखं वाटायचं ते आपण आपल्या बदलत्या जीवन पद्धतीत विसरायला लागलो आहोत हे खरंच! शांताजींनी ह्याचं भान करून दिलय 'कातरवेळे'वरून.
आपल्या संवेदना सजग ठेवण्याचं किती मोठं आव्हान आपल्यासमोर शातांजी मांडता आहेत!
माणसातला माणूस आणि त्याचा पूर्वजांशी थोडासा तरी संबंध राहणार आहे फक्त संवेदनशील अनुभव किंवा अनुभवातील संवेदना याविषयी जागरुकता असली तरच!
तसं नाही झालं तर काय उरणार आहे? कुठला निरर्थक शब्द वापरायचा त्यासाठी?
शांताजींना त्रिवार सलाम!
२९ जुलै २०२६
#सुरपाखरू
#३०दिवसात३०
#जुलै२०२६
#प्रयोग२०२६