समूह-स्वकीय,
पाऊस सगळ्यांनाच भिजवून जातो आहे, अनेक प्रकारे. 'सुरपाखरू'तही साहित्य-बरसात अनुभवतोय पूर्ण जुलै महिनाभर.
मीही भिजलो पावसात; कसा ते, या दोन अनुभूतींतून…
काही थेंबांचा शिडकावा पोहचतो का तुमच्यापर्यंत?… पहा!
__________________
पाऊस
१.
रात्रभर बरसणा-या पावसांनं सगळंच चिंब झालं होतं. मोठ्या तावदानी खिडकीच्या जवळच असलेलं झाड अजून ही पानापानातून ठिबकत होतं आणि ओघळणारा थेंबानं पान शहारून जात होतं आणि तिकडे लक्ष जातं न जातं तर दुस-या बाजूला दुस-या थेंबानं आणखी एक पान थरथरून जात होतं. परत एक, परत तिथं, आता इकडे…
माझ्या मनाच्या अस्थिरतेचं चित्र यापेक्षा अधिक ठळकपणे कुणीही रंगवलं नसतं.
पानांचा हिरवेपणा ओला झाला की अधिक बोलका होत असावा. अंगावर पावसाचे थेंब यायला लागले तर इकडे तिकडे निवा-याची जागा शोधायला सुरुवात होते. ती सापडली नाही तर ते थेंब अंगावर घ्यावेच लागतात, मग अंग भिजायला सुरुवात होते, तरी प्रयत्न असतो कमीतकमी भिजण्याचा, पण एकदा चिंब ओलं भिजल्यावर मात्र भिजायची भीती पार पळून जाते, मग भिजण्याचा आनंद काय ते कळायला लागतं…
आयुष्यात अनेक बाबतीत हे होत असावं! प्रत्येक नवा अनुभव थेंब म्हणून टाळायचा प्रयत्न… पण अपरिहार्य म्हणून अनुभवायचं… मग कळतं खरं काय ते… उगाच असलेली भीती संपतेच… आणि अनुभवाचा अर्थ उलगडतो आणि मग त्यातच रमतो आम्ही…
__________________________
२.
पावसाळा जवळ आला की चर्चा सुरु होते. यावेळी लवकर सुरू झाला, नाही तर अजून पत्ता नाही पहा!
पुलंना आठवायची छत्रीची दुरुस्ती. मला आठवतात त्या मागच्या पावसाळ्यात हरवलेल्या दोन छत्र्या आणि त्यावरून घरात निर्माण झालेलं वादळ.
एवढ्या वर्षांपासून सांभाळत वापरलेली छत्री कशीही हरवलीत तुम्ही? नीट आठवून बघा कुठे कुठे गेला होता परवा, छत्री नेली होती तेव्हा? खरं म्हणजे परवाच लक्षात यायला पाहिजे होतं छत्री परत आणली नाही ते. आल्या बरोबर वस्तू जागच्या जागी सवयच नाही ना. त्या ऑफिसच्या किल्ल्या, रोजची शोधाशोध, आणि मोज्यांचं तर विचारुच नको. रोज नव्या नव्या जागा मोजे काढून ठेवायच्या. आणि मोजे धुवून वाळल्यावर नेमका दुसरा मोजा तुम्हाला सापडत नाही, काय हा धांदरटपणा…
तरी बरं, मोबाईल हातातून सुटत नाही क्षणभरही, नाही तर त्याचीही शोधाशोध ( शेवटी हे सगळं माझ्या 'सदैव हातात असलेल्या' मोबाईलवर येऊन थांबतं, थांबलं तर!).
दुसरी नवी छत्री तर दुसऱ्या दिवशीच हरवून आलात! शोधायची म्हटली तर काळी की गोरी हेही आठवणार नाही! आता कशाची कशाचा संबंध, कुठले मुद्दे कुठल्या दिशेने वार करतील सांगणं अशक्य!
हरवलेल्या 'छत्रीवर' किती प्रकारचा आणि किती वेळ पाऊस बरसत राहतो! आणि माझ्या किती किती अवगुणांचे थेंब टपकत राहतात, बराच काळ!
हे घरातलं झालं, सार्वजनिक ओरडा होतो तो पहिल्या जोरदार पावसानं तुंबल्याजाणाऱ्या रस्त्यांच्या. शहरात कुठे किती पाणी साचलं, कुठल्या रस्त्यावर किती खड्डे, किती दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहन अडकली… कुठे शाळेच्या बसेस अडकल्या…
पूर्वी दुसऱ्या दिवशी वर्तमान पत्रातून हे कळायचं, आता तर मोबाईल वरची रिळं या बातम्या पुरवत असतात.
मग राग निघतो, खापर फोडलं जातं नगरपालिका ते सरकारपर्यंत….
नेमेची येतो हा पावसाळा!
३० जुलै २०२६
#सुरपाखरू
#३०दिवसात३०
#जुलै२०२६
#प्रयोग२०२६