प्रिय तुषारदा,
तुला कदाचित हे आवडणारं नसेल, किंवा ह्यात तुझा काहीसा अधिक्षेप ही होत असेल. तुला असं एकेरी संबोधणे योग्य आहे की नाही, ह्याचा ही विचार मी केलेला नाही. पण या सगळ्या प्रमादांसाठी तुझ्याकडे क्षमा ही आहेच, हा विश्वास आहे; म्हणून हे धाडस करतोय.
धाडस यासाठी म्हणतोय की, तुझ्यावर लिहावं इतकी तुझ्याविषयी माहिती नाही. पण माहितीचा संबंध डोक्याशी असतो आणि मी मनाने लिहितोय. खरं सांगायचं तर, कालपर्यंत तुला लिखाणाचा विषय करावा हे कल्पित नव्हते, पण या क्षणी तुझ्यावर लिहावं वाटतंय आणि मी लिहितोय. हे इतकं सरळ आहे. ‘Pulse’ पेक्षा ‘impulse’ वर जगण्याची जुनी सवय. शिवाय, आपली परंपरा आहे गणेश-पूजन सर्वात प्रथम! आणि ‘सुरपाखरू’ विश्वात तू आद्य आहेसच, त्यामुळे……….
साधारणतः पंधरा वर्षापूर्वी तुझ्या कविता वाचल्या फेसबुकवर. आणि तुझ्या शब्दांच्या प्रेमात मी! एक तर नागपूर माझा विकपॉइंट. धनवटे, जगत भेळ, दिलीप कुल्फी या ठिकाणी जगलेले क्षण म्हणजे आयुष्याचा मधुमास! नागपूरकर कायम माझ्या आवडीचे, त्यातून तुझ्या प्रेमकविता म्हणजे गझब. तू तेंव्हा ‘तुष्की’ नव्हता, ‘तुषार सीमा’ होतास आणि ते नाव ही त्या काळाच्या पुढचं होतं. या सगळ्या कॉम्बिनेशन मुळे तू जास्तच आवडायला लागला.
काही माणसं मोगऱ्याच्या जातीची असतात. मोगरा स्वतः सुगंधी असतोच, पण त्याला स्पर्शून येणारा वारा देखील सुगंधाची उधळण करीत असतो. तू ही त्याच जातकुळीतला!! नंतर कळलं तू ही अभियंता आहेस आणि त्यामुळे अधिकच जवळचा झालास. अर्थात हा सगळा माझाच प्रवास होता, तुला याचा गंध ही नसणार. आणि खरं सांगायचं तर, त्याची आवश्यकता ही नव्हती. पण कधी नागपूरला आलोच, तर तुला भेटणार हे मात्र नक्की ठरवलं होतं.
नंतर तुझं लेखनासाठी/साहित्यासाठी धडपडणारे रूप पाहिलं आणि तेही भावलं बघ! पण त्या भावण्या सोबतच एक अनामिक भीती ही मनाला स्पर्शून गेली, की या सगळ्या प्रयासात तुझ्यातील तो गोड भावकवी हरवणार तर नाही ना…
माझ्यासाठी तू सद्या तरी हिमनागचं टोक आहेस. An Iceberg!! केवळ एक दशांश च माहीत असलेला. खरं सांगू, मला हा एक दशांश देखील पुरेसा आहे आयुष्य अधिक समृद्ध करायला. त्यामुळे उर्वरित तुषारचा मी विचारच करत नाही. माझ्या नेणिवेतील त्या तुषारावर मी तृप्त आहे. त्यामुळे या लेखनाचं, तुला माहीत झालेल्या या नवीन फॅनचं कसलही ओझं बाळगू नकोस. किंवा माझ्याशी अकारण मृदू ही होऊ नकोस. तू जसा आहेस, जेवढा आहेस तेवढा ही मान्य आहे मला.
पण एक रसिक म्हणून त्या अधिकाराने एक सांगणं आहे तुला. आम्हाला तुझ्या मधाळ भावकविता अधिकाधिक हव्या आहेत, तेवढा हट्ट पुरव बघ!
बाकी क्षेम!
तुझाही,
मधुसूदन डोड्या