बऱ्याच दिवसांपूर्वीची गोष्ट . एका इंजिनियर-कम-लेखक असलेल्या मित्राची भेट झाली . बोलताना त्याने तो ज्ञानेश्वर माऊलींवरील एका सविस्तर , ससंदर्भ पुस्तकावर काम करत असल्याचे सांगितले . मी अर्थातच आनंद व्यक्त केला .
“पण एका मुद्दयावर गाडी अडलीय”, तो.
“कोणत्या?”
“ज्ञानेश्वरांचं आयुष्य मोठं चमत्कृतीपूर्ण आहे . रेड्याच्या तोंडून वेद वदविले , भिंत चालवली वगैरे . मला असे प्रसंग, जर त्यांचा काही ठोस संदर्भ नसेल, तर वगळायचे आहेत.”
“वगळ की मग”
“अरे पण मग पुस्तकात काही चार्म उरत नाही, यु नो… आणि वाचकही या गोष्टी घेतल्या नाहीत म्हणून टीका करतील.”
मी म्हटले , “भल्या माणसा, सगळ्यात पहिले म्हणजे तू आधी ठरव की तू एक भक्त म्हणून त्यांच्या लीला वर्णन करत आहेस कि एक ऐतिहासिक संदर्भग्रंथ लिहीत आहेस .
दुसरे म्हणजे – ज्यांच्या आईवडिलांनी तत्कालीन सनातन्यांच्या जाचाला कंटाळून जलसमाधी घेतली, ज्याने अतोनात हालात बालपण काढूनही आपल्या लिखाणात कुठेही कटुतेचा लवलेश येऊ दिला नाही , ज्यांनी अगदी कोवळ्या वयात भगवदगीतेसारख्या अद्वितीय ग्रंथावर तेवढ्याच तोलामोलाची टीका लिहिली आणि परमोच्च बिंदू म्हणजे – ज्यांनी संजीवन समाधी घेतली… अशा व्यक्तीने अजून कोणते चमत्कार करायला पाहीजे होते?
आणि सत्ययुगातील रेडे वेद म्हणत असतील कदाचित पण या कलियुगात ते होणे नाही . मला वाटतं की वेद वदविणे, भिंत चालवली वगैरे एक रूपक असावं, किंवा ती प्रत्यक्षात काहीतरी वेगळाच घटना असावी .
त्यामुळे तू एक संदर्भग्रंथ लिहिणार असशील तर एक काम कर – पुस्तकाच्या शेवटी एक परिशिष्ट बनवून त्यात या सर्व आख्यायिका संकलित कराव्यास.”
त्याला हे पटले.
त्याच्या पुस्तकापलीकडे जाऊन विचार केला तर आपल्याला दिसते की एकूणच समाजाला चमत्कारांचे फार आकर्षण असते …. आणि ते काही प्रमाणात कमकुवत मनाचे लक्षण आहे.
याउलट अनेक भारतीय व्यक्तींनी अचाट मानसिक, शारीरिक, बौद्धिक क्षमतेची कामे केली असली तरी आपण त्याला म्हणावा इतका मानसन्मान देत नाही…
… कारण त्यांनी त्यासाठी घेतलेले अफाट परिश्रम आपल्याला दिसत असतात आणि नेमकं तेच तर आपल्याला करायचं नसतं !
पुढील पिढी सक्षम घडवायची असेल तर सर्व चमत्कृतीजन्य गोष्टी वगळून – किंवा अगदीच टाळणे शक्य नसेल तर त्याला आवश्यक ती टिप्पणी जोडून – त्या सांगितल्या गेल्या पाहीजेत . जेणेकरून आपले राष्ट्रीय आदर्श हास्यास्पद बनणार नाहीत.
गौतम सोमण