श्रावणबाळ!
जिच्या हाती पाळण्याची दोरी
जगाची ती उद्धारकर्ती..
सानुल्याना घेऊनी पाठी
रक्षणकर्ती ती झाशीची राणी..
विश्व तिचे मुलासभोंवती
अशक्य तिच्या नाही कोशी..
गडावरून उतरून येणारी
हिरकणी ती तान्हूल्याची..
पेन्सिल हाती तिने देऊनी
गिरवे अ आ ई पाटीवरती..
विद्येचीही देवताच जणू असे
तिचं आम्हासाठी सरस्वती..
अन्न जाणुनी पूर्णब्रम्ह ते
घराघरातील ती अन्नपूर्णा..
अविरत कष्ट सर्वां करीता
विना मोबदला ना मेहनताना..
काळानुरूप दिवस बदलले
अर्थासाठीही ती बाहेर पडली..
संसार नेटका होण्यासाठी,
नाही उसंत सदैव तिज घाई..
आता उंच उंच झेप घेणारी
घार उडणारी निळ्या आकाशी..
दूरदूर जरी ती आज विहरे
चित्त घरट्यात पिलापाशी..
पिलासाठी अभेदय ढाल ती
प्रेमळ खूप.. अथांग सिंधू..
शब्द अपुरे तिच्यासाठी रे,
गुण तिचे मी कसे रे वर्णू..
भाग्यवंत ज्यांची आहे आई,
ईश्वर साक्षात धरतीवरची..
मातृदिन रोज करा साजरा,
ठेवुनी नित्य.. तिजला आनंदी..
मातृदिनानिमित्त ही कविता घरोघरी असलेल्या दैवतावर लिहिली असली तरी मी लेख लिहिण्यासाठी कथा निवडली आहे आजच्या युगातील श्रावणबाळाची!!
प्रिय बंडू , माझा बालमित्र, त्याचे बालपण आठवले की हुशार, बंड पण खेळात खूप रस असलेला आणि स्पष्टवक्ता अस काहीस चित्र डोळयांपुढे येते.
अजूनही हे सर्वं गुण दिसून येतात.आज मी त्याच्या मातृपितृभक्तीवर, सेवाभावी वृत्तीवर लिहिणार आहे.
कालच मदर्स डे आणि काही दिवसापूर्वी फादर्स डे साजरा झाला. काल सिओइपीच्या एका ग्रुप पुण्याच्या मित्राने थकलेल्या वडिलांना घास भरवतांनाचा फोटो बघून मला आठवला, गेले दहापंधरा वर्ष आपल्या आई वडिलांची तन्मयतेंने मनपूर्वक सेवा करणारा माझा बालमित्र बंडू .
पंधरा वर्षांपूर्वी पर्यंत सर्वं काही ठीक ठाक होत…बंडू कडे जायचो तेव्हा काका, काकू बरोबर गप्पा होत असत तेही सर्वं बालमित्रांची विचारपूस करत. बंडू चे घर जेव्हा मी बांधत होतो… तेव्हा खूप काळ संपर्कात होतो.
एकदिवस बंडूच्या वडिलांना अचानक थुंकीद्वारे रक्त जाऊ लागले बंडूनें जवळपास सर्वं मोठ्या धन्वंतरीना दाखवले पण निदान होत नव्हते..जेव्हा वर्षभराने निदान झाले तेव्हा जळगावला त्यांचे एक ऑपरेशन करून हा त्यांचा प्रॉब्लेम कमी झाला तरी पुढचे एक येणार संकट घोंघावत होत.. काकांना डायबेटिस असल्याने त्याची डोळ्यांची दृष्टी कमी होती. एक दोन वर्षातच त्यांना पूर्ण दिसेनासे झाले.. तरी त्यांना मी काकांना आनंदी पहिले कारण त्याच्या सोबतीला काकू आणि बंडू यांचा आधार होता. सौं. वहिनी त्यांच्या सेवेत मग्न होत्या.
दहावी नंतर मुलींच्या शिक्षणासाठी बंडूने वहिनीस मुलीबरोबर कोट्याला पाठवले होते.अर्थात त्याच चीजही झाले त्याची कन्यका आता बँकेत खूप मोठ्या हुद्द्यावर कार्यरत आहे आणि तिच्या संसारात सुखी आहे.
त्यावेळी घरात बंडू व काकूच घरात होते , वडिलांची सर्वं जबाबदारी त्याने घेतली होती…बंडू वडिलांचे डोळे बनला होता.
अचानक एक दिवस सौं. काकूंना पक्षांघाताचा झटका आला त्यांची उजवी बाजू कमजोर पडली वाचाही कमजोर गेली आणि काकू बेड रिडन झात्यात, दिवसापासून बंडूची डबल ड्युटी झाली … आणि आई वडिलांची सेवा करणार्या राजूच्या रूपात मला आजच्या काळातील श्रावणबाळ दिसला.
बंडू ऑफिसमध्ये जाताना माझ्या गल्लीतून जायचा तेव्हा माझी बऱयाच वेळा भेट होत होती…( बंडूच्या निवृत्तीनंतर रोजची ती भेट नाही.) त्यावेळी एकदा मधूनच दुपारी बंडू घरी जाताना दिसला. तेव्हा तू आता घरी का जातो? अशी मी विचारणा केली.तेव्हा म्हणाला, “आई माझ्या शिवाय कोणाला डायपर बदलू देत नाही.सकाळी सर्वं सेवा केली तरी अधूनमधून फोन आला की घरी जावं लागत. ” हे हसत हसत सांगत लगेच तो हिरो होंडावर घराकडे निघुन गेला .
त्याला या सेवेत सौं. वहिनींची अमुल्य साथ आहे. वडिलांना दृष्टी नव्हती तरी राजुची ही कसरत त्यांना दिसत होती. त्यांचे बाकी सर्व व्याधी कमी झाले होते आणि अचानक एक दिवस काळाने घात केला हृदयक्रिया बंद पडून काकांनी बंडूचा कायमचा निरोप घेतला. त्याचे पितृछत्र हरवले.
काकू मात्र हळूहळू खालवतच होत्या काही वर्षांपासून अल्झायमरच्या शिकार झाल्या आहेत आणि आता त्या बंडूस ही ओळखत नाही. “बंडूला ला त्या मुलाने ठेवलेला एक गडी आहे” अस समजतात आणि अजूनही बंडू व सौं वहिनी त्यांच्या सेवेत मग्न आहेत.
कुठं सुख दुःखाच्या कार्यक्रमात जायचे असल्यास दोघांपैकी एकाची हजेरी मात्र आवर्जून असतें.एक जण काकूंच्या सेवेसाठी घरी असतो.
खरं तर अशा राजूच्या अभूतपूर्व मातृपितृभक्ती बद्दल लिहिण्यास शब्द असमर्थ आहेत.नुकताच मदर्स डे साजरा झाला असला तरी ” न ओळखणाऱ्या आईची मनोभावे सेवा करतांनाचा बंडू डोळ्यासमोर आला..” आणि ही बालमित्रातील एका श्रावणबाळाची एक सत्य कथा लिहिली गेली.
✍️हेमंत नाईक