गीत –कवीवर्य राजा बढे
संगीत – पंडित हृदयनाथ मंगेशकर
गायिका -आशा भोसले
चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले
ओंजळी उधळीत मोती हासरी तारा फुले
चांदणे शिंपीत जाशी …॥धृ॥
वाहती आकाशगंगा. की कटींची मेखला
तेजपुंजाची झळाळी तारपदरा गुंफिले
ओंजळी उधळीत मोती..॥१॥
गुंतविले जीव हे . मंजीर की पायी तुझ्या
जे तुझ्या तालावरी बोलावरी नादावले
ओंजळी उधळीत मोती..॥२॥
गे निळावंती कशाला
झाकशी काया तुझी?
पाहु दे मेघाविण सौंदर्य तुझे मोकळे
ओंजळी उधळीत मोती…॥३॥
कवीवर्य राजा बढे यांचे हे अतिशय सुंदर गीत आशाताईंच्या आवाजात ऐकताना खरोखरच असा भास व्हायचा की आकाशातल्या चांदण्या धरेवर उतरल्या आहेत.एखाद्या प्रियकराने प्रेयसीला उद्देशून म्हटलेलं हे गीत असू शकतं.
कवीवर्य राजा बढे यांच्याकडे विपुल शब्दसंपदा होती .प्रतिभासंपन्न असल्याने कल्पनाविलास रम्य होता.आपण सामान्य लोक कल्पनाही करू शकत नाही असा कल्पना विलास या गीतात दिसून येतो.नभोमंडळातील सुंदर उपमा देऊन कवीने रसिकांचे मन मोहून टाकले आहे.त्यांच्या या गीताचे रसग्रहण करण्याइतकी मी थोर नाही, पण मला हे गीत लहानपणापासूनच खूप आवडते.
एखाद्या प्रियकराला भेटायला येणारी सुंदर प्रेयसी पाहून तिच्या चालण्यात, मोहक हसण्यात ,वागण्यात , चालताना त्याला होणारा हा भास कवीवर्यांनी या गीतात सुंदर शब्दांत मांडला आहे.पौर्णिमेच्या रात्री नीरव शांततेत, आल्हाददायक वातावरणात तिचे येणे त्याला मोहित करते.एखाद्या अप्सरेप्रमाणे सुंदर अशी प्रेयसी पाहून प्रियकराला स्वर्गीय उपमा सुचल्या आहेत .म्हणूनच त्याने नभांगणाचा उपयोग आपल्या गीतात केला आहे.खरोखरच चांदणे धरेवर विखूरले आहे इतका तिचा सुंदर पदन्यास.एखादी लावण्यवती नजरेसमोर उभी राहून आपल्या करकमलात मोत्याची ओंजळ भरून धरेवर पसरवत आहे आणि ते मोती म्हणजे जणू नभातील तारकाच आहे.कदाचित शुभ्र मोग-याची फुलांची ओंजळ ती लावण्यवती समर्पित करत आहे .आणि त्यांचा धवल प्रकाश धरेवर पसरला आहे.असेही आपण म्हणू शकतो ती चालते तेव्हा प्रियकराच्या मनाला चांदणे शिंपल्याचा भास होतो.तिचा पदन्यास इतका मोहक आहे की तिच्या चालण्यातून नभीचे चांदणे पसरत जाते.असंही त्याला म्हणायचे आहे.प्रियकरासाठी तिच्या चंचलतेतही सौंदर्य आहे.चंचलता कशी तर रात्रीच्या समयी आकाशातील चंचलता म्हणजे चांदण्याची लुकाछिपी कधी त्या ढगाआड जातात तर कधी चमकत रहातात.ज्याप्रमाणे आपल्याला हा बदल हे लुकलुकणारे तारे पहायला आवडतात तसेच प्रेयसीचे विभ्रम त्याला आवडतात.त्यात तो रंगुन जातो.रात्री तो झोपत नाही तिच्या आठवणीत हरवलेला असतो अशावेळी त्याचे लक्ष नभाकडे जाते आणि मग त्यातील विविध छटा पाहून त्याला आपल्या प्रेयसीची आठवण येते.चांदणे त्याला प्रेयसीची आठवण करून देत असते.
आकाशात चांदण्यांची एक शृंखलाच तयार झालेली पाहून त्याला ती प्रेयसीच्या कटीस बांधलेली मेखलाच वाटते (कंबरपट्टा )जिची नक्षत्रांच्या तेजाची आभारुपी तारच जणू तिच्या पदराला गुंफली आहे असे त्याला वाटते.
पुढे तो तिच्या पायातील नृपूर म्हणजे पैंजण ज्याला कवी मंजीर संबोधत आहे.असे ते पैंजण तिच्या तालावर सूरावर नाचणारे जीव आहे तिच्यासाठी झुरणारे जीव आहे हे कळत नाही.
किती सुंदर उपमा आहे पैंजणाच्या तालावर बेभान झालेले लोक आपण पाहिले आहे, त्यांच्यासाठी झुरणारे पण पाहिले आहेत .
तिच्या प्रेमात आकंठ बुडल्याने आकाशाची निळाई त्याला प्रेयसीत दिसू लागते.त्यात विलक्षण जादू आहे की, तिने त्याला सर्व बाजूंनी, दिशांनी एखाद्या आकाशाप्रमाणे व्यापले आहे हे त्याला कळत नाही.त्याला सर्व जग त्यामुळे नीळे भासत आहे म्हणून तो तिला निळावंती म्हणून संबोधत आहे..ती त्याला त्या आकाशातील निशेसारखीच गूढ रम्य भासत आहे.अचानक ढग आल्यामुळे ती लाजून ढगाआड गेलेल्या निशेप्रमाणे त्याला भासते . म्हणून तो तिला म्हणतो,' गे निळावंती कशाला
झाकशी काया तुझी?' तू कशाला तुझं सौंदर्य
ढगाआड लपवते आहे .?तू जशी आहेस तशीच मला प्रिय आहे.तुझं मेघांविण असलेलं मोकळं सौंदर्य मला पाहू दे .मला तुझ्या सौंदर्याचे रसपान करायचे आहे .तू येते तीच मुळी शुभ्र चांदण्यासारखे शीतल शुभ्र मोती ओंजळीतून उधळत येते.म्हणजेच माझ्या जीवनात सुख शांती घेऊन येते.या रूक्ष जगात मला तुझ्या येण्याने आशेचे दीप प्रज्वलीत होतात.तू मला जणू नक्षत्रांचे देणे देऊन जाते.
कवीवर्य राजा बढे यांची ही रचना पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी अवघ्या सतराव्या वर्षी
अप्रतिम संगीत दिले आणि आशाताईंनी आपल्या मधूर स्वरात प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून त्याप्रमाणे ते गायले . अतिशय उत्कट प्रेमरसात न्हायलेल्या कवितेचं एक सुंदर भावगीत तयार झालं .त्या गीताचं गारूड अजूनही रसिकांच्या हृदयावर आहे. आशाताईंच्या आवाजातील हे गाणं ऐकताना डोळ्यासमोर असंख्य चांदण्यांनी भरलेले आकाश आणि त्यातून पदन्यास करत येणारी एखादी सौंदर्यवती जिच्या हास्यात देखील नक्षत्र चमकताना दिसतात आणि आपल्या ओंजळीत मोत्यांची (मोग-याची)सुंदर ताजी फुले ओंजळीतून धरेवर विखुरताना दिसतात .असा हा दिव्य अनुभव देणा-या आपल्या सूरांची जादू संपूर्ण जगावर पसरवणाऱ्या आशाताईंना माझी
विनम्र श्रद्धांजली!
सौ ऐश्वर्या डगांवकर रावेत पुणे
भ्रमणध्वनी -९३२९७३६६७५.