एक दिवस आईच्या टेबलवर एक जाडजूड पुस्तक दिसलं. सहज कुतूहल म्हणून उघडलं आणि पहिल्या पानानेच मनाचा ताबा घेतला… इतका की आईची बोलणी खाऊनही मी ते पुस्तक माझं वाचून झाल्यावरच तिला परत दिलं .
“स्वामी” ही मी वाचलेली पहिली मराठी कादंबरी, आणि लेखक रणजित देसाई यांचीही पहिलीच ऐतिहासिक कादंबरी. नंतर त्यांनी कर्णावर “राधेय”, शिवाजी महाराजांवर “श्रीमान योगी” यांसारख्या उत्तमोत्तम कादंबऱ्या आणि “गंधाली” सारखे सुंदर ऐतिहासिक कथासंग्रह लिहिले, पण आजही जनमानसात त्यांची प्रामुख्याने ओळख आहे ती “स्वामी”कार म्हणूनच!
अगदी कोवळ्या वयात पेशवे पंतप्रधान या अतिशय मोठ्या आणि जोखमीच्या पदाची जबाबदारी अंगावर पडलेल्या थोरल्या माधवरावांची ही जीवनकहाणी. यात आपल्याला माधवरावांचा करारीपणा, कर्तव्यनिष्ठा, दूरदृष्टी, प्रखर गणेशभक्ती यांचे दर्शन घडते. त्यांना अगदी साजेशा सहचारिणी असलेल्या रमाबाईंचा भावूक स्वभाव, पतिवरील निर्लेप प्रेम हे गुण ठळकपणे समोर येतात. या दोघांतील भावपूर्ण प्रसंग वाचताना आपणही मोहून जातो; तर दुसऱ्या बाजूला राघोबादादांचा सत्तेवरील मोह, राजकारणातील कुटील डावपेच यांचा एक विलक्षण खेळ या कादंबरीत आपल्याला दिसतो. नाना फडणीस, राघोबादादा, रामशास्त्री, सखारामबापू, हैदर-अल्ली, निजाम आदी, या आधी केवळ इतिहासाच्या पुस्तकातच वाचलेली, नावे आपापल्या गुणा-अवगुणांसह आणि स्वभाववैशिष्ट्यांसकट आपल्यासमोर उभी राहतात.
अर्थगर्भ संवाद हा तर या कादंबरीचा आत्मा. मनावर कोरली जावीत अशी अनेक वाक्यें अक्षरशः पाना -पानावर आहेत . मी त्यातील बरीचशी माझ्या डायरीत लिहून ठेवली होती.
शिवाजी सावंत , ना स इनामदार इत्यादी अनेकांनी अप्रतिम कादंबऱ्या लिहिल्यात पण या सर्वांत मला रणजित देसाई यांची शैली प्रामुख्याने भावली – तेव्हाही आणि आताही .
१९६२ मध्ये प्रकाशित झालेली ही कादंबरी तेव्हां अगदी अल्पावधीत लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोचली होती . आज ६० वर्षांनंतरही प्रत्येक मराठी वाचकाच्या पुस्तक संग्रहात “स्वामी”ची उपस्थिती अत्यावश्यक आहे.