गेल्या तीन नदी शोधयात्रेत काही कारणास्तव सहभागी व्हायचे राहूनच गेले होते; परंतु यावर्षी सर्व अर्थाने नियोजन करून मी वर्धा नदी शोधयात्रेला जाण्यासाठी सज्ज झालो.
नदी ही खरोखरच 'लोकमाता' आहे. नदीच्या किनारी अगदी पुरातन काळापासून आजपर्यंत मानवी जीवन आणि संस्कृती बहरली अन् विकसित होत गेली. मानवाच्या जीवनाच्या सर्वच अंगांना नदीचा स्पर्श असतो. मानवाची अत्यंत महत्त्वाची गरज म्हणजे पाणी, ही गरज अनादिकालापासून या जलप्रवाहानेच पुरवली आहे. आजच्या काळात नदी संदर्भात परिचय असणे अथवा तिच्या संवर्धनासंबंधी आस्था असणे, हा फक्त एका विशिष्ट पिढीचाच भाग झाल्याचे जाणवते. एकंदर समाजमनात नदी संदर्भात तिचे पाणी वापरण्यापुरतीच आस्था उरली आहे, किंवा काही धार्मिक विधींपुरतीच उरली आहे, असे खेदाने म्हणावेसे वाटते.
नदीवर साहित्यात आणि चित्रपटात अनेक अजरामर गीते झाली आहेत. त्या गीतांच्या माध्यमातून कधी प्रियकर-प्रेयसी, कधी आई-वडील, कधी बाप-मुलगी, तर कधी मुलगा-बाप असे भावनिक नातेसंबंध नदीच्या पात्राप्रमाणे अगदी सहजपणे चितारताना आणि आळवताना दिसून येतात.
'वर्धा नदी शोधयात्रा' आणि त्यामध्ये सामील व्हायचे माझे कारण अर्थातच या जलदायिनीला जवळून जाणून घेणे हे होते. आमच्या 'वेद प्रतिष्ठान, नागपूर'चे अध्यक्ष व सर्वेसर्वा डॉ. मनोहर नारायणजी यांच्या नेतृत्वात आम्ही नऊ गडी या शोधयात्रेसाठी सज्ज झालो. यामध्ये विठ्ठलाच्या वारीत जाणाऱ्या वारकऱ्यांसारखा आमच्यासोबत असलेला आमच्या गाडीचा ड्रायव्हरही या मांदियाळीत सहभागी झाला. किंबहुना, त्याला आता या शोधयात्रेत आमच्यासोबत येण्याची सवय झाल्यामुळे तोही आमच्या प्रवासाचा एक अविभाज्य भाग झाला आहे.
खरं म्हणजे शोधयात्रा किंवा नदी संदर्भात माहिती जाणून घेणे, त्यासाठी स्वतःच्या खिशाला खार लावून जाणे आणि जंगलात-पहाडात पायपीट करून या प्रक्रियेचा एक भाग होणे, हे काही सामान्यपणाचे लक्षण आहे असे बहुतेकांना वाटत नाही. कारण आज आपल्यासाठी नदी म्हणजे नदीऐवजी फक्त पाणी उरले आहे; आणि तेही पाणी पिकनिक स्पॉट्स, वॉटर पूल्स, स्विमिंग टँक्स आणि जास्तीत जास्त कोरड्या होऊ घातलेल्या विदर्भाच्या विहिरी, एवढ्यावरच येऊन थांबते. विशेषतः आजच्या तरुण मुला-मुलींना नदी उगवते कुठून, तिची उपनदी कोणती आणि ती जाते कुठे, या जलप्रवासा संदर्भात जाणून घेण्याची फारशी उत्सुकता नसते. अर्थात, याला काही सन्माननीय अपवाद आहेत. जी मुले स्पर्धा परीक्षांची तयारी करतात किंवा ज्यांना नदीबद्दल जाणून घ्यायचे असते, असेही काही सन्मानित ग्रुप्स आहेत जे या संदर्भात सातत्याने भारतभर काम करीत आहेत.
आमची ही शोधयात्रा तीन टप्प्यांत होऊ घातली आहे. यापैकी पहिला टप्पा, जिथे वर्धा नदी उगम पावते, अर्थात मध्य प्रदेशातील 'खैरवानी' नावाच्या गावी सुरू झाला. तिच्या उगमस्थानापासून आम्ही 'कौंडण्यपूर'पर्यंतचा तिचा प्रवास पहिल्या टप्प्यात अनुभवला. यादरम्यान आलेल्या अनुभवांनी मला केवळ आश्चर्यचित केले नाही, तर रोमांचितही केले आणि माझे ज्ञानवर्धन तर झालेच.
आमची टीम ही बरीच मजबूत होती. यामध्ये एक फुलपाखरू तज्ञ, एक पक्षी तज्ञ, एक पुरातत्त्वाचा अभ्यासक, एक ग्रामगीताचार्य, एक गांधी विचाराची व्यक्ती आणि माझ्यासारखा एक छोटासा निसर्गप्रेमी जीव… आम्ही असे सगळे वर्धा नदीच्या शोधयात्रेला निघालो. काटोलचे आमचे सर्पमित्र शिक्षकही आमच्यासोबत होते, जे आमचे 'बल्लवाचार्य' (आचारी) देखील होते.
या शोधयात्रेदरम्यान आम्ही वडाची चिचोली, खैरवानी, वरखेड, चीचांडा अशा महत्त्वपूर्ण गावांना भेटी दिल्या. नदीकिनाऱ्याने आम्ही जसा मार्गक्रम केला, तसे पुढे जात स्थापत्यांना, मंदिरांना, मशिदींना आणि जुन्या वस्तूंना भेटी देत आम्ही समोर गेलो. वर्धा नदीचा जवळजवळ १०० किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर एक धडधडीत वास्तव आमच्या डोळ्यांसमोर आले, ते म्हणजे वर्धा नदीचे पात्र अगदी कोरडेठाक पडले आहे! निदान पहिल्या ५० किलोमीटरवर काही ठिकाणी नावाला फक्त थोडेसे पाणी दिसते. 'मारूद' नावाच्या गावी आम्हाला पाण्याच्या प्रवाहाची थोडी झलक आढळली. त्यानंतर महाराष्ट्रात अर्थात 'तुगाव देव' येथे पोहोचल्यावर आम्हाला नदीचा प्रवाह थोडाफार दिसला. पण मागच्या जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आम्ही केलेल्या या यात्रेमध्ये बहुतांश नदीचे पात्र कोरडेठाकच दिसत होते.
नदीपात्र कोरडे असल्यामुळे काही भूगर्भीय गोष्टी प्रकर्षाने जाणवायला मिळाल्या. नदीच्या सुरुवातीपासून अगदी मारूदपर्यंत दगडांचे प्रकार बदलत गेले; तिथे बारीक रेती हा प्रकार दिसला नाही. नदीपात्रात मोठमोठे दगड होते आणि मग जसजशी ती महाराष्ट्रात प्रवेश करती झाली, तसतसे आम्हाला दगडांचे बारीक बारीक कण अर्थात रेतीचा भाग तयार होताना निदर्शनास आला. अशी काहीशी निरीक्षणे नोंदवत, सरतेशेवटी आम्ही अमरावती जिल्ह्यातील 'मोझरी' येथे येऊन मुक्काम केला व दुसऱ्या दिवशी आम्ही 'कौंडण्यपूर' येथे गेलो. कौंडण्यपूरच्या त्या परिसरात आम्ही नदीचे विस्तीर्ण रूप बघितले. तिथे धरणामुळे पाणी अडल्यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणात जलसाठ्याचे दर्शन झाले, हा त्यातल्या त्यात एक आनंदाचा भाग होता.
मोझरीमध्ये मुक्कामी* येण्यापूर्वी आम्ही मोर्शी तालुक्याच्या किनाऱ्यावर, अर्थात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या अगदी बॉर्डरवर स्थित असलेल्या 'भिवखुंडी देवीच्या' मंदिरात गेलो होतो. या मंदिराच्या बाजूला ज्या सातपुडा रांगांच्या गुफा आणि पहाडी टेकड्या आहेत, तिथे (आमच्यासोबत पुरातत्त्वशास्त्राचे अभ्यासक असल्यामुळे आम्हाला माहिती मिळाली) जवळपास २७२ गुफा आहेत आणि त्यात बरीचशी गुफाचित्रे चितारलेली आहेत. ही माहिती आणि त्यातली काही गुफाचित्रे आम्ही प्रत्यक्षात जाऊन बघितली.
एवढ्या उंचावर त्याकाळचा मानव कसा राहत असावा आणि का? अशा विविध प्रश्नांनी आमच्या डोक्यात थैमान घातले होते. परंतु, जेव्हा आम्ही प्रत्यक्ष त्या जागी जाऊन बघितले, तेव्हा तिथून वरून दिसणारा हा नदीचा विस्तीर्ण परिसर आणि निसर्ग पाहून मानव त्याकाळी तेवढ्या उंचावर का राहत असावा, याची थोडीशी कल्पना आली.
असा एकंदरीतच वर्धा नदीचा फार सुखकर प्रवास, नदीच्याच आशीर्वादाने आणि “जय मा वर्धा वरदायिनी” या घोषणेने आम्ही संपन्न केला.
प्रशांत चित्रा जानराव बठ्ठे
#सूरपाखरू#30दिवसात30# जुलै 2026
दिनांक: 03.07.2026